छत्रपती शिवाजी महाराज अप्रतिम निबंध | Shivaji Maharaj Marathi Nibandh |

shivaji Maharaj Marathi Nibandh

छत्रपती शिवाजी महाराज निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) लिहताना त्यांची ओळख, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे लोकहित कार्य मुद्देसूद स्वरूपात वर्णन करायचे असते. तसेच शून्यातून निर्माण केलेले स्वराज्य, आलेल्या संकटांचा धैर्याने केलेला सामना आणि त्यांचा रयतेकडून राजा छत्रपती म्हणून झालेला स्वीकार अशा सर्व बाबींचा उल्लेख देखील निबंधात करायचा असतो.

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले (Chhatrapati Shivajiraje Shahajiraje Bhosale) हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि विश्वाला आदर्शवत असे राजे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित निबंध लिहताना प्रत्येक व्यक्ती तसेच विद्यार्थी आनंदाने आणि अभिमानाने भरून जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज या विषयवार निबंध लिहताना खालील मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करू शकता.

• ओळख आणि प्रस्तावना
• शिवरायांचे बालपण व शिक्षण
• आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग
• राज्यकारभार आणि विस्तार
• राज्याभिषेक
• जीवन निष्कर्ष

छत्रपती शिवाजी महाराज – मराठी निबंध | Shivaji Maharaj Essay In Marathi |

स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.

माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत.

शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.

“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.

शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.

इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.

शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.

शिवरायांचे अखंड कर्तृत्व निबंध स्वरूपात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध (Shivaji Maharaj Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankrant Marathi Nibandh |

makar sankrant marathi nibandh

प्रस्तुत लेख हा मकर संक्रांत या सणाबद्दल सर्व माहिती सांगणारा असा निबंध आहे. वर्षाच्या सुरुवातीस येणारा हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या अति महत्त्वाचा सण मानला जातो. विद्यार्थ्यांना या सणाबद्दल सर्व आवश्यक माहिती मुद्देसूद स्वरूपात लिहावी लागते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh)!

मकर संक्रांत सण – निबंध लेखन | Makar Sankrant Essay In Marathi |

मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व ठेवणारा सण आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यावर इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही दिवसात सूर्य मकर राशीत संक्रमण करत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य पूर्णपणे मकर राशीत प्रवेश करतो.

मकरसंक्रांत हा सण १४ जानेवारी आणि लिप वर्ष असल्यास १५ जानेवारीला असतो. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. ववसा देणे, ओटी भरणे, आणि हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम या सणात साजरे केले जातात.

भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवशी साजरा होणाऱ्या मकर संक्रांत या सणाला महाराष्ट्रात शेतकीय महत्त्व देखील आहे. हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण केले जातात.

संक्रांतीअगोदरचा दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवसांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळ यांची एकत्र अशी मिश्र भाजी बनवली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी आवर्जून खाल्ली जाते.

सुगड पूजन म्हणजेच पाच छोटी मडकी पूजण्याची प्रथा देखील केली जाते. यामध्ये भोगी दिवशी बनवलेले थोडेसे जेवण ठेवले जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला ते जेवण प्रसाद म्हणून सर्वांना वाटले जाते.

संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.

स्त्रियांसाठी मकर संक्रांती दिवसापासून हळदी-कुंकू लावण्यास सुरुवात होते. हळदी-कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काळी साडी नेसण्याची प्रथा देखील आहे.

तिळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून गुळात टाकून तिळगूळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तिळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.

मकर संक्रांत मराठी निबंध (Makar Sankrant Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा… धन्यवाद!

कोरोना – मराठी निबंध | Corona Essay In Marathi | Covid 19 Essay |

Corona Essay In Marathi

कोरोना निबंध (Corona Nibandh) कसा लिहायचा, त्याची प्राथमिक माहिती, विस्तार कसा असू शकतो याचे सविस्तर विश्लेषण या निबंधात केलेले आहे. कोरोना हा विषाणू कसा प्रसारित झाला तसेच त्या विषाणूंमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे, त्याचे दुष्परिणाम, घ्यावयाची काळजी, अशी सर्व माहिती कोरोना किंवा कोविड – 19 या निबंधात लिहायची असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा कोरोना हा निबंध!

कोरोना निबंध | Corona Marathi Nibandh |

कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात सापडले आहे. परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. कोरोना नावाचा विषाणूंचा गट आहे. त्याचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या आजारास कोविड 19 असे नाव दिलेले आहे. 2019 मध्ये हा रोग मनुष्यात आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड 19 (Covid 19) असे नाव देण्यात आले.

1960 च्या दशकात सर्वप्रथम मनुष्याला श्वसन मार्गात संसर्ग होणाऱ्या कोरोना व्हायरसचा त्रास आढळून आला. या आजारात कोरोना विषाणूंचे श्वसन मार्गात भयंकर संक्रमण आढळून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे आढळले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात त्याने थैमान मांडले आहे.

ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या आजारात आढळून येतात. याव्यतिरिक्त इतर दीर्घ आजार ज्या व्यक्तींना असतील त्यांना त्याच आजारात वाढ झाल्याचे आढळून आले. स्वस्थ व्यक्तींना संक्रमण झाले तरी वरील लक्षणे दिसून येत नव्हती परंतु इतरत्र संसर्ग होऊन तोच आजार पसरू नये म्हणून आता सर्वत्र तपासण्या चालू आहेत. स्वयंसेवक, कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत.

रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आणि इतर दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना आजारापासून जास्त धोका संभवतो. त्यांना या आजाराची लागण झाल्यास उपचार घेणे सक्तीचे ठरते. साधारण खोकला, ताप किंवा घशात खवखवणे असे आजार असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने हा संसर्गजन्य आजार आपण काही व्यक्तिगत सवयी पाळल्याने आणि काळजी घेतल्याने आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

कोविड 19 आजार संसर्गजन्य असल्याने आणि आजाराची वेगळी स्पष्ट अशी लक्षणे नसल्याने या आजारात एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना, फिरताना तोंडावर मास्क घालून जाणे अशी व्यक्तिगत काळजी आपण घेऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना तर रुमालाचा वापर करणे अत्यावश्यकच आहे. बाहेर गेल्यावर कोणत्याही पृष्ठभागाला अनावश्यक स्पर्श करणे टाळावे कारण कोरोना हा विषाणू दिसूनही येत नाही आणि लवकर नष्टही होत नाही.

नियमित बोलताना तीन फुटांचे अंतर ठेवावे. आंबट चवीच्या पदार्थांचा, फळांचा आहारात समावेश करावा. कोणतेच औषध शंभर टक्के उपचार देणारे नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच पर्याय आपल्यापुढे आहे त्यामुळे फळे, कडधान्ये, सुका मेवा, आणि जास्तीत जास्त “व्हिटॅमिन सी” चे आहारात सेवन करणे गरजेचे आहे.

कोरोना आजारात सरकारने संचार बंदी लागू केली होती जेणेकरून हा विषाणू पसरला जाऊ नये. निमशहरी आणि शहरी भागात कोविड 19 सेंटर्स उभारून त्यावर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींना उपचार देण्यात आले. सर्व स्तरांवर काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. भारतात जवळजवळ चार महिने सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प पडून होते. रोजच्या लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, सुविधा घरपोच पुरवल्या जात होत्या.

कोरोना काळात संपूर्ण जगभरात माणसांचे राहणीमान बदलले. खूप सारे लोक घरी बसून असल्याने विविध कला आणि मनोरंजन तसेच व्यायाम, योगा शिकण्यात व्यस्त होते. स्वयंरोजगार ही संकल्पना खूप लोकांनी अंगिकारली. कोरोना आजाराच्या सुरुवातीस संचार बंदी असताना पोलिस आणि डॉक्टर्स यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य होता.

कोरोना विषाणूवर लस शोधण्यात यश आले आहे. फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड, स्पूत्निक व्ही, कोवक्सिन अशा काही लसी 90 ते 95 टक्के प्रभावी आहेत. तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणतीही लस ही 100 टक्के उपचार देणारी नाहीये. तरी सर्वत्र मान्यता मिळून योग्य प्रकारे सर्वांना लस मिळेपर्यंत योग्य काळजी घेऊन स्वतःला सशक्त बनवणेच योग्य मार्ग आहे.

तुम्हाला कोरोना निबंध (Corona Essay In Marathi) कसा वाटला? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. तसेच कोरोना निबंध आणखी काही keywords वापरून देखील नेटवर शोधला जातो. त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचा तुम्ही नक्की वापर करा :

Corona Virus Essay for students
Covid – 19 Essay In Marathi
Corona Virus Marathi Nibandh
Corona Nibandh
Corona Marathi Essay
Corona disease Information In Marathi

नेतृत्व मराठी निबंध! Leadership Essay In Marathi

नेतृत्व निबंध (Leadership Essay) विद्यार्थ्यांना खूप काळजीपूर्वक लिहावा लागतो. नेतृत्व सहजासहजी अंगी येत नाही. त्यामुळे नेतृत्व हा गुण काही लोकांतच पाहायला मिळतो. नेतृत्व हा निबंध लिहताना काल्पनिक विस्तार करावयाचा नसतो. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा नेतृत्व हा निबंध!

Essay on Leadership in Marathi | नेतृत्व गुण मराठी निबंध |

आजपर्यंत विश्र्वभरात अनेक राजे, नेते, खेळाडू आणि समाजसेवक होऊन गेले. पण त्यापैकी नक्की कितीजण खरोखर नेतृत्व गुण जोपासून होते? नेतृत्व करताना अशा लोकांना कोणत्या गोष्टी अंगिकाराव्या लागल्या? कोणत्या संकटांचा सामना करावा लागला? त्यांना विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधावी लागतील. तेव्हा खरे नेतृत्व तुम्हाला समजेल.

नेतृत्व हा शब्द फक्त ऐकीव आहे. बहुसंख्य लोक त्याबद्दल आयुष्यात विचार देखील करीत नाहीत. नेतृत्व हे वंशपरंपरेने जर काम म्हणून हाती आले असेल तर तेव्हा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु ते नेतृत्व टिकवण्यासाठी मात्र अविरत प्रयत्न करावे लागतात. आजपर्यंत आपण असंख्य लोक असे पाहू शकतो ज्यांचा वंश हा नेतृत्वाने सजला होता परंतु काळाच्या ओघात त्यांचा वंश मात्र ते नेतृत्व सांभाळू शकला नाही.

नेतृत्व हा गुण सजगतेने आणि समाजसेवेच्या भावनेतून विकसित करता येऊ शकतो. नेतृत्व विकसित करताना सर्वप्रथम आपल्याला असा विचार करावा लागेल की, वास्तविक परिस्थिती आणि लोकांच्या समस्या काय आहेत? त्या कोणत्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात? त्यांचे योग्य निराकरण झाल्यास लोक स्वतः तुम्हाला नेतृत्व सोपवतील.

इतिहासात राजे आणि आत्ता राजकारणी, खेळाडू, विविध व्यावसायिक अशी खूप सारी उदाहरणे देता येतील. अशा लोकांनी स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ न बघता लोकहिताची कामे घडवून आणली आणि लोकांच्या नजरेत विराजमान झाले. अगोदर सत्ता आणि मग नेतृत्व असेच पूर्वीपासून चालत आले आहे त्यामुळे सत्तासंघर्ष हा होतच आला आहे. जो व्यक्ती व्यवस्थित स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन काम करत राहतो, त्यालाच नेतृत्व सोपवले जाते आणि असा व्यक्तीच त्या नेतृत्वासाठी योग्य असतो.

नेतृत्व सोपवले जाणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. एखाद्याला नेतृत्व मिळाले की त्याचे निर्णयच त्याची कुशलता ठरवत असतात. सर्व बाजूंनी मानवता आणि निसर्गाचा समतोल ढळू न देता त्याला सर्वांगी आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात. काहीवेळा विपरीत परिस्थितीचा सामनादेखील करावा लागतो. मग लोकांना त्याचे काम दिसते आणि लोक स्वतः अशा व्यक्तीचे नेतृत्व मान्य करतात.

व्यक्तीला नेतृत्व करत असताना प्रत्येक क्षणी समाज आणि लोकहितच पाहावं लागतं. स्वहित आणि स्वार्थ न पाहता देशहित आणि समाजहित समोर ठेवावं लागतं. प्रत्येक देशासाठी सामाजिक व्यवस्थेअंतर्गत काही नियम आणि अटी लागू केलेल्या असतात. त्या नियमानुसार योग्य ते बदल आणि कार्य नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला करावे लागते.

नेतृत्व काही काळ टिकू शकते पण काळानुसार नेतृत्वगुण विकसित करून ते जोपासायला देखील हवेत. कधीकधी सामाजिक विरोध पत्करून स्वतःच्या हिमतीवर लोकहितासाठी भविष्याला फायदेशीर ठरतील असे निर्णय आणि नियम यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे नेतृत्व मिळणे यापेक्षा नेतृत्व टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.

नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला विरोधकही असतात परंतु त्यांच्याही हिताचा विचार त्याला करावा लागतो. यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आवश्यक ठरतो तो म्हणजे निरहंकारीता. निरहंकारी व्यक्तीच समतोल राहून, थोडेही विचलित न होता योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यासाठी निस्सीम देशभक्ती, आणि समाजसेवेची आवड असावी लागते.

सोन्याला जसे आगीत तापल्याशिवाय झळाळी येत नाही त्याप्रमाणे विपरीत परिस्थिती हीच व्यक्तीला सुधारत आणि घडवत असते. विपरीत परिस्थितीत जो ढळला त्याचे नेतृत्व कोणीच मान्य करीत नाही. विपरीत परिस्थिती आणि त्यामध्ये घेतलेले योग्य निर्णय हेच व्यक्तीला महान बनवत असतात. त्यामुळे नेतृत्व हे कुठल्या सामाजिक किंवा राजकीय संस्थेच्या पदावरून ठरत नाही तर व्यक्तीची क्षमता संकटकाळी आणि विपरीत परिस्थितीत पारखली जाते.

नेतृत्व हे फक्त पदावरून न ठरता व्यक्तीच्या अंगभूत कौशल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्यातही जर नेतृत्व बाणवायचे असेल तर तुम्ही या निबंधाचा नक्की विचार करा व नेतृत्व हा निबंध (Leadership Essay in marathi) तुम्हाला कसा वाटला, याबद्दल नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद!

माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध | My Summer Vacation Marathi Essay |

मी उन्हाळ्याची सुट्टी कशी साजरी केली (How I Spent My Summer Vacation Essay) या विषयावर निबंध लिहताना विद्यार्थ्यांनी मुक्तहस्त लिखाण करावे असे अपेक्षित असते. काल्पनिक विस्तार व घडलेल्या खऱ्याखुऱ्या घटना यांचे योग्य विश्लेषण अशा प्रकारच्या निबंधात करावयाचे असते. उन्हाळ्याची सुट्टी हा निबंध कसा लिहायचा याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला हा निबंध वाचल्यावर मिळेल.

How I Spent my Summer Vacation Essay In Marathi |

उन्हाळा म्हणजे सुट्ट्याच! उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर शाळा आणि क्लासेस करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो. त्याचा कंटाळा जाऊन नवा उत्साह संचारित होण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते. उन्हाळ्याची सुट्टी नुसती झोपून घालवण्यापेक्षा आणि सूर्याला, उन्हाला दोषणे देण्यापेक्षा मी नवनवीन कला आणि खेळ शिकून ती व्यतित करू शकतो, असे मी यावेळी ठरवले.

या उन्हाळ्यात जरा जास्तच खेळायचे, पोहायला शिकायचे आणि खूप मज्जा करायची, असा विचार करतच शेवटचा परीक्षेचा पेपर दिला आणि उड्या मारतच घरी पोहचलो. सर्वप्रथम वेळापत्रक तयार केले. सर्व उन्हाळ्यात काय काय करायचे याचे नियोजन देखील केले. माझा छोटा भाऊ आणि मी दोघे मिळून हे सर्व करत होतो. दोघांच्या सहमतीनुसार आणि वडिलांच्या मान्यतेने आम्हाला दिवसभर खूप ठिकाणी फिरायला मिळणार होते.

एप्रिल महिन्यातच आम्ही मामाच्या गावी गेलो. तेथे मला मामाने पोहायला शिकवले. मी रोज दोन तास मनमुराद पोहायचो. पोहणे मला खूप आवडू लागले. अशातच तेथे रानात फिरणे आणि रोज नवीन गोष्टी ऐकणे असा रोजचा कार्यक्रम होता. मामाच्या गावी गेल्यावर वडील सोबत नसल्याने आमच्यावर बंधन घालणारे कोणीच नव्हते. तेथे आम्ही
खूपच खेळलो आणि बागडलो.

रात्री घराबाहेर झोपण्यात तर खूपच मज्जा यायची. दहा दिवस राहिल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. या उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मी पोहायला शिकलो. मला अगोदर पोहायची खूपच भीती वाटायची पण आता मी पोहण्यात पटाईत झालो आहे. आमच्या शेजारी एक छोटी विहीर आहे तेथे आता आमची दररोज अंघोळ असायची.

क्रिकेट खेळणे हा तर आमचा नित्यक्रम!क्रिकेटमध्ये रोज नवीन बाबी शिकत राहणे एवढेच माझे काम असायचे. मी मोबाईलवर क्रिकेटचे व्हिडिओ पाहायचो. नवनवीन क्रिकेट खेळण्याचे तंत्र आणि कौशल्य विकसित करत होतो. माझे वडील हेदेखील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत त्यामुळे त्यांच्यातर्फे थोडासुद्धा विरोध नसतो.

सकाळी पोहणे, त्यानंतर जेवण झाल्यानंतर कॅरम आणि सायंकाळी क्रिकेट असा संपूर्ण दिवस हा खूपच मज्जा करत निघून जातो. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भरपूर आंबे खाल्ले. दुपारी मी भरपूर जेवत होतो. दुपारी जेवणात दही आणि कोशिंबिरीचा स्वाद तसेच जेवण झाल्यानंतर लस्सी! म्हणजे स्वर्गच प्राप्त झाल्याचा आनंद व्हायचा.

मामाच्या गावी गेल्यावर आणि क्रिकेट खेळताना मी खूप नवनवीन मित्रदेखील बनवले. या वेळी आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे संगणक! आमच्यात संगणक नाहीये पण शेजारी राहणारा नवीन मित्र केतन, त्याने मला थोडा थोडा संगणक वापरायला शिकवले आहे. पोहणे, क्रिकेट, कॅरम, संगणक यातच माझी सुट्टी अत्यंत आनंदात साजरी झाली.

उन्हाळ्याची सुट्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतो. मी माझी उन्हाळ्याची सुट्टी कशी साजरी केली (How I Spent My Summer Vacation Essay) या निबंधाचा तुम्ही संदर्भ घेऊन तुमची सुट्टी योग्य त्या शब्दात मांडू शकता. तुम्हाला हा निबंध आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

संत तुकाराम – मराठी निबंध | My Favorite Saint Essay In Marathi |

माझा आवडता संत - संत तुकाराम

वारकरी संप्रदायातील संत तुकाराम हे थोर संत होते. त्यांचे महात्म्य आणि त्यांची भक्ती दोन्हीही अजरामर झाले. त्यांच्या साधेपणात त्यांचा मोठेपणा होता. अशा या संताबद्दल शालेय विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी माझा आवडता संत – संत तुकाराम! ( Majha Awadata Sant – Sant Tukaram ) या विषयावर निबंध लिहायला लावतात.

संत तुकाराम हा निबंध लिहताना त्यांच्या जीवनावर सत्य कथित करणे अपेक्षित असते. स्वतःचे विचार आणि कल्पना यांचा विस्तार न करता त्यांचे वास्तववादी जीवन स्पष्ट करावयाचे असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा संत तुकाराम हा निबंध ( Saint Tukaram Essay In Marathi )

माझा आवडता संत – मराठी निबंध | संत तुकाराम | My Favorite Saint – Marathi Nibandh |

विठ्ठलाच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे संत तुकाराम हे एक महान अध्यात्मिक आणि वारकरी संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. सतराव्या शतकात भक्ती आणि ज्ञानाने त्यांनी समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य केलेले आपल्याला दिसून येते. त्यांचे अनेक अभंग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत.

संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध ५, शके १५२८ म्हणजेच २२ जानेवारी १६०८ रोजी देहू या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यांच्या
वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई अंबिले असे होते. बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले होती. सर्वात मोठ्या मुलाचे नाव सावजी, मधला तुकाराम तर धाकट्या मुलाचे नाव कान्होबा असे होते.

तुकारामांच्या सुरुवातीच्या जीवनात त्यांना प्रापंचिक विघ्ने सहन करावी लागली. ते किशोर वयात असताना त्यांचे आई वडील वारले. मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. त्यांना एकूण चार अपत्ये होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशातच त्यांचे मन हळूहळू धार्मिक होऊ लागले.

विठ्ठल भक्ती आणि परमार्थ ते साधू लागले. संसारात राहूनच सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत विरक्ती किंवा संन्यास न स्वीकारता ईश्वर भक्ती केली. संत तुकाराम यांनी भंडारा डोंगरावर बसून आत्मचिंतन केले आणि स्वतःचे खूप सारे साहित्य रचले. त्यावेळी समाजातील कटकारस्थानी लोकांनी तुकारामांना वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

समाजातील व्यर्थ गोष्टी, प्रथा आणि परंपरा यांवर त्यांनी परखड भाषेत टीका केली. ईश्वर भक्तीसाठी भक्तीचा सुगम मार्ग त्यांनी दाखवला. संत तुकाराम पंढरीच्या वारीला पायी चालत जाऊन प्रत्येक वर्षी आराध्यदैवत विठ्ठलाचे दर्शन घेत असत. त्यांचे विचार हे सामाजिक आणि वैयक्तिक उन्नती घडवून आणणारे होते.

तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही सर्व साक्षात्कारी अनुभवातून अवतरलेली होती. तरीही त्याचा संदर्भ हा वेद पुराण आणि शास्त्रे यांच्याशी जोडून काही धर्मांध व्यक्तींनी त्यांच्या लिखाणाला आणि साहित्याला मान्यता नाकारली.

तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ बोलीभाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत
बुडवून टाकण्याची शिक्षा पुण्यातील वाघोली येथील रामेश्वर भट यांनी दिली. तुकारामांनी त्याबद्दल दिलेली ग्वाही योग्य असताना देखील वेदांचा अपमान झाला आहे आणि लोकांना भटकवण्याचे काम तुकाराम करत आहेत, असे मानून त्यांना ती शिक्षा देण्यात आली.

सर्व साहित्य बुडवल्यानंतरही हजारो लोकांच्या तोंडी त्यांचे अभंग पाठ होते. आपले लिखित साहित्य लोकांच्या ध्यानी मनी जिवंत आहे हे पाहून तुकाराम सुखावले. त्यांच्या सर्व साहित्याला “तुकारामांची गाथा” असे म्हणतात. त्यांनी सामान्य लोकांनाही खरा धर्म अगदी साध्या सोप्या भाषेत समजवला. भागवत धर्म खऱ्या अर्थाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले.

जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार होत गेला तेव्हा त्यांनी सावकारी आणि संसारातून फारकत घेतली. त्यावेळी भयानक दुष्काळ पडला असता त्यांनी स्वतः घरातील धान्य वाटप केले आणि गरीब लोकांचे कर्ज माफ केले होते. सदेह संसारात असून देखील परमार्थ साधला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम अनंतात विलीन झाले आणि ते वैकुंठाला गेले, असे मानले जाते. त्यांचा निर्वाण दिवस हा “तुकाराम बीज” म्हणून ओळखला जातो.

तुम्हाला संत तुकाराम मराठी निबंध ( My Favorite Saint Essay In Marathi ) कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद!

दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ! Daruche Dushparinam Marathi Nibandh |

दारूचे दुष्परिणाम निबंध

दारूचे व्यसन हे मानवी शरीरासाठी योग्य नसते. दारूमुळे अनेक अडचणींचा सामना तर करावाच लागतो शिवाय स्वतःचा वेळ आणि ऊर्जा देखील वाया जात असते. क्षणिक सुख किंवा स्वतःचा विसर या प्रामुख्याने घडणाऱ्या गोष्टी माणसाला वरवरचं सुख देऊन जातात पण त्यानंतरची येणारी उदासीनता ही कोणीच नाकारू शकत नाही.

दारूचे दुष्परिणाम निबंध लिहताना दारूचा प्रचार, आरोग्याचे नुकसान, कालांतराने न सुटणारी दारूची सवय आणि अन्य तोटे लक्षात ठेवावे लागतात. हा निबंध म्हणजे दारूच्या समस्येचे निरीक्षण आणि निराकरण कसे करावे याचे विश्लेषण करायचे असते. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा दारूचे दुष्परिणाम हा निबंध (Daruche Dushparinam Marathi Nibandh).

दारूचे दुष्परिणाम निबंध | Effects Of Alcohol Essay In Marathi |

माणूस अनेक पद्धतीने स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्याही प्रकारचे व्यसन एकदा का जडले की माणूस त्या व्यसनाचा गुलाम बनत जातो. व्यसन हे अनेक प्रकारचे असू शकते. ज्या ज्या वाईट सवयी स्वतःला जडलेल्या आहेत त्या एकप्रकारे व्यसनच आहेत. अशाच प्रकारचे एक भयानक व्यसन म्हणजे दारूचे व्यसन!

दारूचा संबंध खूप पुरातन काळापासून आहे. ऐतिहासिक साहित्य आणि त्यापेक्षाही पूर्वी राजे महाराजे यांच्या काळात दारूचे संदर्भ आलेले आहेत. आनंद आणि क्षणिक सुख यामधला फरक स्पष्ट होत नसल्याने किशोरवयात किंवा तरुण वयात दारूचे व्यसन जडते आणि आयुष्यभर त्याचा पाठलाग सुटत नाही. आपल्या आसपासचा समाज जर दारूचे व्यसन एकदम सहज करत असेल तर त्याचे अनुकरण करताना किशोरवयीन मुलांना काहीच गैर वाटत नाही. घरीच जर वडील मंडळी कधी दारू पिऊन येत असेल तर मग पुढच्या पिढीला देखील हे व्यसन जडू शकते.

आज तंत्रज्ञान, मोबाईल, आणि संगणक दुनियेत दारूचा प्रसार खूप विलक्षण पद्धतीने केला जातो. आपण जे चित्रपट, मालिका पाहतो त्यामध्ये दारू पिणे, मौजमजा करणे आणि इतरांना त्रास देणे यातच एखादा मनुष्य खरे आयुष्य जगत आहे असे चुकीचे दृश्य उभे केले जाते. कधी प्रेमभंग झाला, कधी संकट उभे राहिले तरी दारू प्यायची आणि खूप आनंदी असल्यावर देखील दारू प्यायची, असा गैरसमज वाढीस लागतो.

दारू पिणे चांगले की वाईट? हे त्याचे परिणाम अनुभवल्यानंतरच कळू शकेल. आनंदाच्या आणि सुखाच्या शोधात आपण आपल्या शरीराची हेळसांड करू लागतो. स्वतःच दुर्बल आणि अशक्त बनत जातो. मग काही काळ लोटल्यानंतर कळू शकेल की मानसिक तणाव, अवास्तव भीती, आणि शारीरिक दुर्बलता याव्यतिरिक्त कशाचीच प्राप्ती झाली नाही. परिणाम जर वाईटच असतील तर मनुष्य दारू पिणे का सोडू शकत नाही? याचा विचार नक्कीच झाला पाहिजे.

ज्या ज्या गोष्टींतून क्षणिक सुख मिळते आणि ज्यांचे भावी परिणाम वाईट असतील अशा गोष्टींकडे मन आकर्षिले जाते. माणसाच्या वासना आणि कामना जर खूपच प्रबळ असतील तर मग व्यसन केल्याशिवाय आणि काही वेळ वेडे बनल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच मग मज्जा, आयुष्य एन्जॉय करणे असे तर्क दिले जातात. पण वेडेपणातून कोणीच प्रसन्न, बुद्धिमान आणि सरस बनू शकत नाही.

दारू पिल्यानंतर मनुष्य स्वतःची सजगता हरपून बसतो. त्याला आसपासचे काहीही भान उरत नाही. असा व्यक्ती सुरुवातीला मौजमजा करीत असल्याचे दाखवत असतो परंतु मानसिक अस्थिरता आणि वैफल्य तो अनुभवत असतो. थोड्या दिवसानंतर पुन्हा तसेच क्षणिक सुख म्हणून पुन्हा दारू पितो. त्यानंतर त्याला सवयच होऊन जाते. त्या सवयीतून बाहेर पडणे मग अशक्य वाटू लागते कारण त्याच सुखाची जाणिव सतत होत राहते आणि मग दारूचे सेवन केले जाते.

दारू पिल्याने वेळ आणि बुद्धी (विचार) यापासून व्यसनी व्यक्तीला काही वेळ सुटका मिळते. परंतु जेव्हा तो नशेच्या तंद्रेतून जागा होतो, तेव्हा मात्र शारीरिक आणि बौद्धिक ताण त्याला जाणवत असतो. त्यामुळे सुरुवातीला वाटणारे सुख हे कायम स्वरूपाचे दुःख कसे काय बनून जाते हे देखील त्याला समजत नाही. कष्टप्रद जीवन आणि सजगतेची कमतरता सातत्याने त्याला जाणवत राहते.

दारूचा प्रसार आणि प्रचार यापासून तरुण पिढीला परावृत्त केले पाहिजे. चित्रपट, टीव्हीमधून दाखवले जाणारे उनाड आणि बीभत्स दारूचे चित्रण किती खोटे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. सवय लागलेल्या व्यक्तीने इतर चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत तरच व्यक्ती आणि समाज दारूच्या व्यसनापासून दूर राहू शकेल. दारूचे फायदे काहीच नाहीत तर दूरवर पसरणारी अशांतताच जास्त आहे. त्यामुळे दुष्परिणाम जाणून घेऊन दारूपासून आणि इतर नशेच्या पदार्थांपासून नक्की दूर राहा.

तुम्हाला दारूचे दुष्परिणाम मराठी निबंध ( Daruche Dushparinam Essay In Marathi ) कसा वाटला? त्याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…

माझा आवडता मित्र मराठी निबंध | My Best Friend Essay In Marathi |

Majha Awadta Mitra Marathi Nibandh

माझा आवडता मित्र (My Friend Essay) हा विषय निबंधासाठी खूप उपयुक्त असा आहे. माध्यमिक किंवा प्राथमिक शाळेत असताना या विषयावर निबंध लिहायला लावतात. मित्राचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण असते ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु तुमच्या मित्राप्रती असलेल्या भावना सोप्या शब्दात व्यक्त करणे अपेक्षित असते.

हा निबंध जास्त काल्पनिक स्वरूपात लिहायचा नसतो. या निबंधात तुमच्या मित्राचे जीवनात असलेले स्थान किती महत्त्वाचे आहे असे भावनिक शब्दात व्यक्त करायचे असते. चला तर मग पाहूया माझा आवडता मित्र हा निबंध.

माझा आवडता मित्र निबंध | Majha Awadta Mitra Marathi Nibandh |

कुटुंबातील नाती ही आयुष्यभर टिकणारी असतात परंतु आपण संपूर्णतः कुटुंबात असताना व्यक्त होत नसतो. आपल्या मनातील भावना व स्वभाव ओळखणारा आणि जाणणारा फक्त मित्रच असतो. रक्ताचे नाते नसले तरी एक अतूट बंध त्याच्याबरोबर बांधलेला असतो. प्रत्येक जण स्वतःच्या स्वभावानुसार स्वतःचे मित्र निवडत असतो.

केदार हा माझा आवडता आणि सर्वात चांगला मित्र आहे. मी लहान असताना शाळेत पाचवीत माझी आणि त्याची मैत्री झाली. आम्ही पुण्यात राहायचो. तो दिवस आजही आठवतो जेव्हा त्याची आणि माझी ओळख झाली होती. शाळेत यायला मला उशीर झाल्याने त्याच्या बेंचवर मला बसवले होते. तो दिवस माझा आणि त्याचाही खूप मजेत गेला. आम्ही दोघांनी खूप मस्तीही केली. त्या दिवसानंतर आम्ही दोघेच एकत्र बेंचवर बसू लागलो.

शाळेत असताना तो मला नेहमी अभ्यासात मदत करत असे. आम्ही दोघे नेहमी एकत्र जेवण करत असू. घरातील आणि खेळातील मज्जा आम्ही दोघे मिळून शेअर करत असू. मला नेहमी क्रिकेट खेळायला आवडायचे तर तो फुटबॉल खेळायचा. मैदानावर आम्ही एकमेकांविरुद्ध कधीच उतरलो नव्हतो याउलट एकमेकांच्या खेळात आम्ही सहयोगच करायचो. शाळेत मी जेमतेम हुशार होतो आणि तो मात्र कुशाग्र बुद्धीचा होता.

त्याच्या आणि माझ्या मैत्रीला आता पाच वर्षे झाली आहेत. त्याच्याबद्दलच्या आठवणी खूप आहेत. आत्ता मी माध्यमिक शाळेत आहे. तो दोन वर्षापूर्वी दुसऱ्या शाळेत शिकायला गेला. त्याच्या वडिलांची कामानिमित्त मुंबईला बदली झाल्याने
त्यालाही शिक्षणासाठी तिकडेच जावे लागले. आता आम्ही एकमेकांना फोन करत असतो. फोनवर शाळेतील आणि आयुष्यातील मज्जा शेअर करत असतो.

मी आजही पुण्यात त्याच शाळेत आहे. तो उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या इकडे येतो. तो यायच्या अगोदरच आमचे सर्व प्लॅन्स ठरलेले असतात. काय काय खेळायचे आणि काय काय मस्ती करायची याचे नियोजनही अगोदरच झालेले असते. आता तो क्रिकेट खेळायला शिकला आहे आणि मीही त्याच्याबरोबर फुटबॉल खेळतो. सुट्टीत दुपारचे जेवण घेऊन आम्ही एकत्र कुठेही भटकत असतो. जेथे आवडेल तेथे एकत्र जेवायला बसतो.

मागच्या वर्षी खेळण्यावरून आमच्या दोघांची भांडणे झाली होती. आम्ही आठवडाभर एकमेकांशी बोलत नव्हतो त्याचा पश्चात्ताप आम्हा दोघांनाही झाला. नंतर मीच माफी मागितली आणि अबोला संपवला. त्यानंतर कधीही भांडणे न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच्या आणि आमच्या घरचेही आता चांगले संबंध तयार झाले आहेत. आमची मैत्री आता दोन कुटुंबात व्यापून गेली आहे.

सायंकाळी एखादे पुस्तक किंवा गोष्ट वाचणे हा आमच्या घरचा नियम आहे. त्यानेही आता पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. काही गोष्टीतून आम्ही दोघे नवनवीन कला आणि गुण अवगत करत असतो. काही वर्षांपूर्वी दोघांच्याही आवडी निवडी वेगवेगळ्या होत्या, आज मात्र तसे नाही. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजू लागलो आहे.

आम्ही एकमेकांच्या मैत्रीची आठवण म्हणून प्रत्येक सुट्टीत एकसारखा शर्ट विकत घेतो. आमच्या गल्लीत अजूनही आमचे काही मित्र आहेत पण केदार असल्यावर मला जो निवांतपणा आणि सौख्य लाभते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. एक वेगळीच ऊर्जा तो असल्यावर जाणवत असते. आज शाळेतही माझे मित्र आहेत पण केदारसारखा दिलदार आणि मनमिळाऊ स्वभावाचा मित्र असणे म्हणजे माझे नशीबच!

तुम्हाला माझा आवडता मित्र मराठी निबंध ( My Best Friend Essay In Marathi ) कसा वाटला? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!

जलसंधारण मराठी निबंध ! Water Conservation Essay in Marathi|

जल संधारण निबंध

जल संधारण किंवा जल संवर्धन निबंध (Water Conservation Essay in Marathi) माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालयात असताना लिहावा लागतो. पाण्याचे महत्त्व सर्वजण जाणतात परंतु त्याचा शब्दात व्यक्त केलेला प्रत्यय म्हणजे पाणी या विषयावरचा निबंध! हा निबंध लिहताना घ्यावयाची काळजी म्हणजे सुयोग्य वाक्यांची आणि मुद्द्यांची मांडणी!

जलसंधारण हा विषय खूप खोल आणि विस्तार पूर्ण असा आहे. त्याचा प्रत्येक समाजात आणि प्रत्येक देशात केला जाणारा उपयोग हा वेगवेगळ्या स्तरावर असू शकतो. चला तर बघू मग नक्की काय आहे जल संधारण आणि त्या विषयावर कसा लिहावा निबंध!

जलसंधारण निबंध ! Jal Sandharan Marathi Nibandh |

पाणी म्हणजे अर्थातच जीवन! अशी उक्ती प्रत्येकालाच अनुभवात देखील आहे. रोज वापरण्यात येणारे पाणी व्यक्ती परत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असेल परंतु त्याचा सुयोग्य वापर करणे आज कर्तव्य बनून गेले आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत एक व्यक्ती जेवढे पाणी वापरतो, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

स्वयंपाकघर, कपडे-भांडी धुणे, अंघोळ, आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर होत असतो. पाणी या सर्व कामांसाठी गरजेचे देखील आहे पण त्याचा अपव्यय होत असल्यास काय करावे लागेल, याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. आज लोकसंख्या आणि जलप्रदूषण या समस्या भेडसावत असल्याने पाण्याचा नियंत्रित वापर ही काळाची गरज होऊन बसली आहे.

प्रत्येक देश आणि त्याचे सरकार हे जल संधारण याबाबतीत विचार करतेच आणि त्याबाबतीत धोरण आणि योजना ठरवत असते. त्याघडीला असलेली लोकसंख्या, उपलब्ध जलस्त्रोत आणि त्याचे नियोजन व पुरवठा या सर्व गोष्टी सरकारला स्वतःच्या धोरणात ठरवाव्या लागतात. पाऊस ज्या क्षेत्रात जास्त पडतो तेथे जल प्रकल्प उभारणे आणि जेथे दुष्काळ किंवा पाणीटंचाई असते, त्या विभागात पाणी पुरवठा करणे अशा धोरणांनी जल संधारण यशस्वी ठरत असते.

मागील दोन दशकात झालेले प्रयत्न उल्लेखनीय असे आहेत. भारतात तरी वीजनिर्मिती आणि पाणी पुरवठा योग्य स्वरूपात पुढे आणला गेला आहे. मोठ्या नद्यांवर उभारलेले वीजप्रकल्प आणि धरणे या दोन्ही मार्फत त्या संपूर्ण राज्यातील वीज समस्या टाळली गेली आहे आणि धरणामुळे शेतीविकास शक्य झाला. त्यामुळे लहान खेड्यातील घटक देखील आज शेतीवर उपजीविका करून एक चांगले आयुष्य जगत आहेत.

जलसंधारण किंवा जल नियोजन करण्यासाठी पाणी बारा महिने उपलब्ध असणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे, या गोष्टीला आपण नाकारू शकत नाही. त्यावरील कारणे शोधताना आपण लोकसंख्या देखील विचारात घेतली पाहिजे. निसर्ग का लयीस चालला आहे? का जंगले तोडली जात आहेत? का हवा आणि पाणी दूषित बनत चालले आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना लोकसंख्यावाढ हा मुद्दा नेहमी मागे सारला जातो आणि नुसत्या उपाय योजना पुढे आणल्या जातात ज्याद्वारे निसर्गाचा नाश होत असतो. जल संधारण करणे आवश्यक आहेच परंतु पाण्याचा प्रवाह रोखणे आणि निसर्ग प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे हे काही मान्य असणार नाही. पाणी समुद्राला जाऊन मिळणे, नंतर पाण्याची धूप होऊन पुन्हा तीच पाऊस स्वरूपात पृथ्वीवर पुन्हा येणे हे जलचक्र सर्वांना माहीत आहे.

जल प्रदूषण आणि नियोजनातील अडथळे दूर सारून जलसंधारण व्यवस्थितरीत्या करता येईल. कोणत्याही राज्याच्या विकासात उद्योगधंदे, शेती, विज्ञान तंत्रज्ञान यांची मोलाची साथ मिळत असते. अशा उत्पन्नाच्या साधनांना पाणी उपलब्ध करून देणे यासाठी जलसंधारण करणे आवश्यक आहे. योग्य जल व्यवस्थापन केल्यास संपूर्ण राज्य आणि पर्यायाने देश सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील यात शंकाच नाही.

जलसंधारण करताना भौगोलिक आधार लक्षात घ्यावा लागतो. निसर्गनिर्मित सरोवरे, तळी, नाले यांचा ही विचार करावा लागतो कारण बारा महिने पाणी पुरवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. अशा प्रदेशात पाणी अडवा – पाणी जिरवा, शेततळे, माळरानावर चऱ्या खोदून पावसाचे पाणी जिरवणे असे प्रकल्प उभारल्यास तेथील क्षेत्र आणखी विकसित होऊ शकते.

भूगर्भातील पाणी यामुळे आपण नेहमीच उत्तम शेती करू शकलो आहे. विहिरी, बोअर वेल याद्वारे सतत पाण्याची उपलब्धता होऊ शकते. पण त्यासाठी त्या क्षेत्रात पाणी जिरवणे खूप आवश्यक ठरते. त्यासाठी जलसंधारण करताना पाणी जमिनीत जिरवणे, पाणी पावसाळ्यात जास्त वाया न घालवता ते साठवणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या
जातात.

एकंदरीत विचार केल्यास असे लक्षात येईल की भूगर्भात जलसाठा वाढवणे, पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करणे, पाणी पुरवठा, पाणी नियोजन, पाणी प्रदूषण प्रतिबंध अशा काही संकल्पना जलसंधारण करताना आवश्यक ठरतात. सरकार अशा योजना आणि प्रकल्प राबवत असते परंतु सामान्यांचा सहभाग आणि सहयोग तेवढाच आवश्यक आहे. पाण्याचा जपून वापर करणे, अपव्यय टाळणे अशी कामे व्यक्ती स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर होणे गरजेचे आहे.

तुम्हाला जल संधारण मराठी निबंध ( Water Conservation Essay in Marathi ) निबंध कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा… धन्यवाद!

बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi |

Child Labor Essay In Marathi

मागील दशकात आणि आत्ताही सर्वात जास्त भेडसावत असलेली समस्या म्हणजे बालमजुरी ! आता त्याचे प्रमाण घटत आहे परंतु काही ठिकाणी त्याचा विपर्यास होतच आहे. बालवयात काम हाती आल्यावर होणारे अंधारमय भविष्य हे काही समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी चांगले नाही. याची समज येण्यासाठी विद्यार्थ्यांना बालमजुरी निबंध ( Child Labor Essay In Marathi ) लिहावा लागतो.

या निबंधात वास्तविकता जेवढी व्यक्त करता येईल तेवढी करावी. बालमजुरीमुळे बालकांचे होणारे नुकसान हे भविष्यातले धोके समोर ठेऊन व्यक्त करायचे असते. चला तर मग पाहूया बालमजुरी (Bal Majuri) हा निबंध!

बालमजुरी एक भीषण समस्या निबंध | Bal Majuri Marathi Nibandh |

भारताप्रमाणे अनेक देश हे मागील शतकात विकासाच्या मार्गावर होते. त्यावेळी कुटुंब नियोजन आणि एक देशभावना नुकतीच विकसित होत होती. त्याचा संबंध सर्व देशवासीयांच्या माथी नव्हता. खेड्याकडे आणि निमशहरी भागात उपजीविकेचे साधन नसल्याने आणि घरातच पालक शिक्षित नसल्याने शिक्षण हा मार्ग उपजिविकेसाठी नव्हताच. तेव्हा शेती उपलब्ध नसली की मजुरी हा पर्याय स्वीकारला जायचा.

अशा परिस्थितीत घरातील लहान मुले देखील कष्टाच्या आणि मजुरीच्या कामात वापरली जायची. सर्व कुटुंब किंवा ओळखीचा कोणी व्यक्ती जर कुठले शारीरिक कष्टाचे काम करीत असल्यास घरातील लहान मुले देखील थोड्याशा पैशासाठी कामाला नेली जात. जेथे देश प्रगतीसाठी मुले शिक्षित असणे खूप गरजेचे होते तेथेच मुले मजुरीच्या अंधारात ढकलली जात आहेत याचा अनुभव हळूहळू येऊ लागला.

देशावर परकीय सत्तांचे आक्रमण सतत होत राहिल्याने भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला होता. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून पुनश्च एकदा भारत खंबीरपणे उभा राहू लागला आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीय शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे. स्वतःचा आणि देशाचा विकास त्याला समजला पाहिजे. परंतु हे घडण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहे ते म्हणजे बालमजुरी हटवून लहान मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

कोणताही देश तेथील जबाबदार नागरिकांनी महान बनत असतो. जबाबदार पिढी घडवण्याची कृती लहानपणापासून होत असते. शिक्षण आणि नंतर उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या तर प्रत्येक व्यक्ती एक चांगला नागरिक बनतोच पण तरीही बाल मजुरी काही ठिकाणी पाहायला मिळतेय. ही बालमजुरी देशासाठी आणि समाजासाठी चांगली नसते. एकीकडे काही मुले उच्च शिक्षित होतात. कला, क्रीडा, व्यवसाय आदी क्षेत्रात नाव कमावतात आणि दुसरीकडे मात्र बाल मजुरिने काही मुले आपले भविष्य अंधारमय करून घेत आहेत.

एक पिढी जर समंजस असली तर पुढची पिढी त्यापेक्षा पुढचा विचार करू शकते. असाच प्रगतीचा मार्ग प्रत्येकाची निवड असली पाहिजे. मजुरी आणि लहानपणीच कष्टाच्या कामाने लहान मुलांचे भवितव्य घडू शकत नाही. प्रगतीचा मार्ग मग ते कसा काय निवडू शकतील. तेवढा बौद्धिक विकास लहानपणीच होणे गरजेचे असते.

स्वतःच्या गरजा भागल्या की समाजाप्रती काही देणे असते, ते दान दिल्यावर आपण उज्ज्वल भविष्य घडवत आहे अशी जाणीव होत असते. बालमजुर, समाज आणि देश या संकल्पना मनात कसा काय रुजवू शकेल? त्याला अक्षर ओळखच नसेल आणि पूर्ण दिवस फक्त तो कामच करत असेल तर तसेच संस्कार आयुष्यभरासाठी त्याच्यावर होतील. मजुरांवर केले जाणारे अन्याय आणि त्यांना दिली जाणारी वागणूक एका मुलाला लहानपणीच मिळाली तर तो दुसऱ्याच्या फायद्याचा कसा विचार करेल?

व्यक्तिगत फायदे आणि पैसा यासाठी तो काहीही करेल. मजुरांना असतात ती सगळी व्यसने त्याला लहानपणीच जडतील. तंबाखू, गुटखा खाणे, दारू पिणे हे त्याचे नित्यनियमाचे काम होऊन जाईल. एकदा का बालमजूर मोठा झाला मग त्याला संस्कारित करणे अवघडच काम आहे. लहान असताना हाती पुस्तकं मिळण्याऐवजी जर फक्त कष्ट मिळाले तर तो इतरांनाही कष्टाचंच जीवन देईल. त्याच्या संपर्कात येणारे लोकही मग त्याच्या असण्याने खुश असणार नाहीत.

त्याची पुढची पिढी, त्याची मुलेबाळे तरी शिक्षणाची वाट धरतील का? हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. याचा सारासार विचार आता प्रत्येक देश करू लागला आहे. बालमजूर कायदा निर्माण करून लहान मुलांना कष्टाचे काम लागणार नाही आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च ही केला जाईल अशी तरतूद सरकार करत असते. प्रत्येक सरकारी धोरणात हा मुद्दा मांडलेला असतो.

भारतभूमी ही अध्यात्मिक आणि वैश्विक सत्य जाणणारी भूमी आहे. संपूर्ण विश्वाला प्रेरित करेल अशी संस्कृती भारताला लाभली आहे. त्याचा विपर्यास आपण भविष्यात करता कामा नये. त्यासाठी लहान मुले अत्याचार आणि बाल मजुरी यापासून मुक्त झाली पाहिजेत. आज बालमजूर कमी पाहायला मिळतात पण त्यांचे प्रमाण काही ठिकाणी आहेच तेही समूळ नष्ट झाले पाहिजे. हॉटेल्स, बांधकाम संस्था, खाजगी कारखाने व सार्वजनिक उद्योगधंदे अशा ठिकाणी बालमजूर पाहायला मिळतात. तसे आढळल्यास सरकारला ते निदर्शनास आणून द्या आणि एक सुजाण नागरिक बना.

तुम्हाला बालमजुरी मराठी निबंध ( Child Labor Essay In Marathi ) कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!