गुलाबाची आत्मकथा निबंध • Gulabachi Atmkatha Nibandh •

प्रस्तावना –

आपल्या सर्वांना गुलाबाचे फूल परिचित आहेच. गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि महत्त्व ओळखूनच मानवाने त्याला फुलांच्या राजाची उपमा दिलेली आहे. प्रस्तुत लेख हा गुलाबाची आत्मकथा या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

गुलाबाचे अस्तित्व हे अत्यंत कमी कालावधीसाठी असले तरी ते अत्यंत जिवंत व समग्र असे भासत असते, अशा आशयाचा हा निबंध आपल्यातील संवेदना जागृत करणारा आहे.

गुलाबाच्या फुलाची आत्मकथा मराठी निबंध | Gulabachya Fulachi Atmkatha Nibandh Marathi |

सभोवताली घडलेल्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. अशा घटनांतून आपल्याला जे अनुभव मिळतात तेच आपले जीवन घडवत असतात. अशाच घटनांचा समावेश आणि माझी असलेली समज या आत्मकथेत मी सांगणार आहे. मी कोण? अहो मी फुलांचा राजा गुलाब!

जुन्या गुलाबांनी मला सांगितले त्याप्रमाणे श्री. अभ्यंकर यांनी गुलाबाचे झाड कुंडीत लावले आणि काही दिवसांनी त्याला बागेत जागा मिळाली. बागेत लावल्यानंतर गुलाबाला खरेखुरे जीवन लाभले असे म्हणावे लागेल. लागवडीनंतर माझा जन्म हा एक वर्षानंतर झाला.

मी सर्वप्रथम कळी म्हणून अस्तित्वात आलो तेव्हा माझे डोळे मिटलेले होते. परंतु अत्यंत आल्हाददायक असे स्वतःचेच बंद असलेले अस्तित्व मला जाणवत होते. हवेच्या माऱ्याने मी फक्त इकडेतिकडे डोलत होतो. कळी कधी खुलते फक्त याचीच वाट मी पाहत होतो.

पहाटे – पहाटे कळी खुलली अन् मी फूल म्हणून अस्तित्वात आलो. अगदी कोवळे असे फूल जसे छोटेसे मूल! सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मी उबदार झालो आणि जीवनाची सुरुवात झाली असे वाटू लागले. मी सर्वत्र कुतूहल दृष्टीने पाहू लागलो.

माझ्या शेजारी माझे अनेक बंधू देखील उमललेले मला दिसले. त्यांना पाहून अत्यानंद झाला. माझ्या झाडाशेजारी मोगरा आणि जास्वंद देखील अगदी दिमाखात उमललेले मला दिसत होते. तेव्हा एक माळी आला आणि आम्हाला जल प्रदान केले. तो माळी मला छान मनुष्य वाटला.

सकाळ निघून गेल्यानंतर बागेतील श्री गणेशाच्या मंदिरात लोक दर्शनासाठी येऊ लागले. सोबतच लहान मुली देखील येत होत्या. मुली फुलांशेजारी येऊन फुले तोडण्याचा प्रयत्न करत होत्या. मी उंचीवर असल्याने त्यांच्या हाताला लागत नव्हतो. जी फुले थोड्या कमी उंचीवर होती त्यांना त्या मुलींनी तोडलेच!

मुली निघून जाताच मला शांत – शांत वाटू लागले. काही वेळाने मंदिरातील पुजारी येऊन बागेतील अनेक फुलांना तोडून घेऊन गेला. मी थोडा लहान असल्याने त्याने मला तोडले नाही. परंतु काल जन्मलेल्या फुलांना त्याने अगदी निर्दयीपणे तोडून नेले. मला आणि बागेतील इतर फुलांना असह्य अशा वेदना जाणवल्या.

आपल्यासोबत देखील उद्या असेच होणार आहे याची जाणीव मनात खोलवर रुतली. तरीही मी सौंदर्याने भारलेल्या अशा बागेत जिवंत आहे ही भावना खूपच छान होती. दुपारचे ऊन झेलत आणि बागेतील मोठ्या झाडांना न्याहाळत असताना मला सर्व प्रकृती मंगल भासू लागली.

प्राकृतिक औदार्य आणि मनुष्याची हिंसा या दोन्ही भावना खूपच विपरीत अशा जाणवल्या. जीवनाचा अधिकार निसर्गाने बहाल केलेला असताना मनुष्य अगदीच संवेदनहीन होऊन कशी काय अशी हिंसा करू शकतो, या प्रश्नाने देखील माझे मन दुखावले.

सायंकाळ होताच अगदी रम्य असा अनुभव आला. सकाळी उडून गेलेले पक्षी निवाऱ्यासाठी आपापल्या घरट्यात परतत होते. त्यांचे बोल मनाला खूप प्रसन्न करत होते. मावळत्या दिनकराला पाहताना आपलेही जीवन असेच समाप्त होईल यावी जाणीव तीव्र झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बागेतील प्रवेश बंद होता. बागेतील रस्त्याचे काम होणार असल्याने इतर लोकांना प्रवेश नव्हता. हे समजताच मी अगदी आनंदाने हेलकावे घेऊ लागलो. माझा गुलाबी रंग हा अजूनच खुलला आहे असे शेजारील फुलेच बोलू लागली. मी त्या दिवशी स्वच्छंदपणे जगलो, डोललो आणि अगदी कोमेजलो देखील!

माझे शारिरीक अस्तित्व हे कितीही सुंदर असले तरी ते मला कधीकधी पूर्णतः जगता येत नाही. जर मी पूर्ण जगलोच तरी माझा जिवंतपणा हा अत्यल्प असतो. असे असले तरी पूर्ण समग्रतेने जगण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी अस्तित्वाचा ऋणी राहीन.


तुम्हाला गुलाबाची आत्मकथा हा मराठी निबंध (Gulabachi Atmkatha Nibandh Marathi) आवडला अशी आशा…संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल खूप – खूप धन्यवाद!

Leave a Comment