IND vs ENG 2nd Test – शुबमन गिलसाठी आजचा दिवस ठरला शुभ!

कालच्या २८/० या धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने रोहित शर्मा (१३) आणि जैस्वालला (१७) स्वस्तात गमावले. त्यांनतर गिल आणि श्रेयस यांनी भारतीय डावाला सावरले. भारताची दुसरी विकेट गेली तेव्हा भारताचा स्कोअर ३० होता. त्यांनतर ८१ धावांची भागीदारी करण्यात अय्यर आणि गिल यशस्वी ठरले.

अय्यरने या डावात घाई केली आणि वैयक्तिक २९ या धावसंख्येवर हार्टलीच्या गोलंदाजीवर स्टोक्सकडे झेल देऊन बाद झाला. त्यांनतर फलंदाजीसाठी आलेला पाटीदार (९) देखील रेहान अहमदचा शिकार ठरला.

भारताची धावसंख्या १२२/४ अशी कमकुवत असताना अक्षर पटेल आणि गिल यांनी ८९ धावांची भागीदारी रचली आणि भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. २११ धावसंख्या असताना गिलचा (१०४) बळी गेला. गिलचा फॉर्म हा मागील काही कसोटीत तितकासा चांगला नव्हता परंतु त्याने आज शतक झळकावत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली.

श्रीकर भरत या डावात अपयशी ठरला आणि ६ धावा काढून रेहान अहमदचा शिकार ठरला. भारताच्या तळातील फलंदाजांनी जास्त योगदान दिले नाही. त्यामध्ये आश्विन (२९) वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताच्या दुसऱ्या डावात २५५ धावा झालेल्या आहेत तर तब्बल ३९८ धावांची आघाडी घेतली.

३९९ चे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली इंग्लंडची टीम पुन्हा एकदा जलद सुरुवात देण्यात यशस्वी ठरली. अर्धशतकी भागीदारी दिल्यानंतर डकेट (२८) हा आश्विनचा शिकार झाला. दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ६७/१ अशी होती. क्रॉली आणि रेहान अहमद हे नाबाद तंबूत परतले.

उद्या विजयासाठी इंग्लंडला अजून ३३२ धावांची गरज आहे तर भारताला इंग्लंडचे ९ फलंदाज बाद करावे लागतील. दुसऱ्या कसोटीचे अजून दोन दिवस बाकी आहेत तरीही उद्याच कसोटी निकालात निघण्याची शक्यता आहे.

Leave a Comment