Preethi Srinivasan information in Marathi | प्रीती श्रीनिवासन – जिद्द आणि चिकाटी!

अखंड प्रदीप्त आशेने एखादी कल्पना करावी आणि ती सत्यात उतरावी असेच काही घडले आहे प्रीती श्रीनिवासन या युवतीबद्दल ! आपल्या शारीरिक क्षमता रुंदावल्या असताना देखील यशाची शिखरे पादाक्रांत करणारी ही युवती असंख्य लोकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या संघर्षमय जीवनाबद्दल या लेखात आपण जाणून घेऊया.

प्रीती श्रीनिवासन ही ” सोल फ्री ” या सामाजिक संस्थेची जननी आहे. तिच्या प्रेरणादायी कार्याबद्दल तिला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ती प्रेरणादायी भाषणेदेखील देते. अनेक गरजू आणि विकलांग व्यक्तींसाठी आधार म्हणून सोल फ्री ही संस्था कार्य करते. स्वतःवर आलेल्या शारीरिक व्याधिरुप संकटाचा धैर्याने सामना करत आज ती तरुणी अनेक लोकांचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी झटत आहे. हा सर्व तिचा वर्तमान आहे. तिचा भूतकाळ तेवढाच सुवर्णमय आणि संघर्षमय होता त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया.

प्रीती श्रीनिवासन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला. प्रीती लहानपणापासून शिक्षण आणि खेळ असे दोन्ही छंद जपून होत्या. या दोन्हीही क्षेत्रात अतुल्य यश प्राप्त करत होत्या वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. प्रीती श्रीनिवासन यांनी अपर मेरियन एरिया हायस्कूल,
पेनसिल्व्हानिया, यूएसए मधून पदवी प्राप्त केली आहे. तल्लख बुद्धीची ही विद्यार्थिनी बारावीत असताना अमेरिकेत गुणवत्तेच्या पहिल्या दोन टक्के विद्यार्थ्यांमध्ये होती आणि तिला ” व्हूज व्हू अमंग अमेरिकन हायस्कूल स्टुडंट्स” या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले. प्रीती श्रीनिवासन या वार्षिक गुणवत्ता यादीतील अग्रस्थानी असायच्या. १९ वर्षांखालील तामिळनाडू महिला क्रिकेट संघाच्या त्या कर्णधार होत्या. त्यांनी स्वत: राज्य संघाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व देखील केलेले आहे. त्याशिवाय त्या राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूही होत्या. त्यांनी ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

त्या आत्ता “सोल फ्री” सह कार्यरत आहेत .

अशी उत्तुंग यशे प्राप्त करत असताना एकदा पाँडिचेरीत समुद्रकिनाऱ्यावर त्या खेळत असताना अचानक त्यांना शारीरिक आघात झाला ज्यामुळे त्यांचे मानेखालील शरीर लुळे पडले. त्यांना हालचाल करता येत नव्हती. अशातच त्यांनी श्वास रोखून धरल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. त्यांचा इलाज होत नव्हता. परंतु चेन्नईतील दवाखान्यात त्यांना “स्पायनल कॉर्ड इंजूरी” झाल्याने त्यांचे शरीर लुळे पडले असे निदर्शनास आले. एका खेळाडूसाठी हा किती मोठा धक्का असेल याचा विचार आपण करू शकतो. काहीही हालचाल यापुढे करता येणार नव्हती. काही कॉलेजेसनी त्यांना शिक्षणाला नकार देखील दिला. परंतु परिस्थितीशी दोन हात करत, झगडत त्यांनी बी. एस. सी. ( वैद्यकीय समाजशास्त्र ) आणि एम. एस. सी. ( मानस शास्त्र ) असे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वतःला जो आजार झाला तसेच कितीतरी लोक अशा आजाराने झगडत असतील आणि त्यांना देखील आधाराची गरज असेल अशा विचारातून आणि आईच्या प्रेरणेतून त्यांनी सोल फ्री ही संस्था स्थापन केली. काही वर्षांतच सोलफ्रीसाठी असंख्य मदतीचे हात पुढे येऊ लागले. बघता बघता सोल फ्री कुटुंब मोठे होऊ लागले होते. असंख्य निराधार आणि गरजू लोकांना आर्थिक मदत आणि स्वावलंबी कार्य या संस्थेने देऊ केले. स्पायनल कॉर्ड इन्जुरी या आजाराबद्दल जनजागृती करण्याचे कामदेखील ही संस्था करते. अशा निमित्ताने हा आजार झालेले लोक या संस्थेशी जोडले जात आहेत. त्यांनादेखील आर्थिक सहाय्य व आवश्यक असलेली मदत केली जाते. अशी ही वीरांगना आपल्या कर्तुत्वाने आसमंत गाजवत आहे. तिला तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा !

प्रीती श्रीनिवासन यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान –

टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीने “अमेझिंग इंडियन्स २०१५” म्हणून म्हणून नामित केले.

बेटर इंडिया समूहाने संकलित केलेल्या “दररोज आम्हाला प्रेरणा देणारे अपंग असलेले १६ प्रसिद्ध भारतीयांच्या” यादीमध्ये स्थान दिले.

विजय टीव्हीचा “सिगारम थोता पेंगल – रे ऑफ होप” पुरस्कार प्राप्त आहे.

रेन्ड्रोप्सचा “वुमन अचिव्हर ऑफ द इयर २०१४ ” पुरस्कार

फेमिना “पेन सक्ती” पुरस्कार २०१४ तामिळनाडूमधील पहिल्या दहा सर्वात प्रभावशाली महिलांना देण्यात आला.

एन्विसेज एबिलिटी अवॉर्ड २०१४

सुदेसी मासिकाचा सामाजिक कार्यात उत्कृष्टतेसाठी “ध्रुव पुरस्कार”

रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार “सेक ऑफ ऑनर”

जिल्हा रोटारक्ट कौन्सिल (रोटरी इंटरनॅशनल जिल्हा) कडून “एजंट ऑफ चेंज” पुरस्कार सन २०१४-१५ साठी.

बीबीसी हिंदीने निवडलेल्या पहिल्या १०० महिलांमध्ये यशस्वी ठरलेल्यांपैकी एक.

नॅसकॉम, एनएचआरडी, टीसीएस, गोल्डमॅन सॅक्स, व्हीएमवेअर, टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस, आयएसबीआर, रिअल इमेज मीडिया टेक्नॉलॉजीज, टोस्टमास्टर्स, रोटरी, आयडब्ल्यूए अशा नामांकित संस्थांद्वारे मान्यता प्राप्त आहे.

Shri Swami Samarth Information in Marathi | श्री स्वामी समर्थ !

( स्वामी समर्थांचे कार्य आणि त्यांचा इतिहास हे जास्त लिखित स्वरूपात नाही. ऐकीव आणि कथित स्वरूपाचा इतिहास त्यांच्याबद्दल सांगितला जातो. या लेखात त्यांच्याबद्दल माहिती ही संदर्भ स्वरूपाची आहे. )

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे आपल्या भक्तांना दिलासा देणारे शब्द हे श्री स्वामी समर्थांचे आहेत. श्री स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे एक अपूर्व अनुभव होता. श्री स्वामी समर्थांना भगवान श्री दत्तात्रेय यांचे अवतार समजले जाते. त्यांचा प्रकटकाल हा इ.स. १८५६-१८७८ असा समजला जातो. स्वामी समर्थांना श्री अक्कलकोट स्वामी असेदेखील म्हटले जाते. हे १९ व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत, अशी मान्यता आहे.

“मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार आहेत असे सांगतात. नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे मानले जाते.

इतिहास व त्यांचे कार्य –

इ.स. १४५९ मध्ये, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे अनेक वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्या आणि ध्यानात लीन असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत होता. लाकडे तोडता तोडता त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे तर फक्त निमित्त होते. ते निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच एक दिव्य मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होते. आपल्या हातून या व्यक्तीला जखम झाली म्हणून उद्धवला दुःख झाले परंतु महाराजांनी त्याला आशिर्वाद देऊन गंगा तीरावर भ्रमण करण्यासाठी गेले. त्यानंतर कलकत्त्यात जाऊन महाकालीचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते दक्षिणेस आले.

सुमारे इ.स. १८५६ मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले. मंगळवेढ्याहून प्रथमतः जेव्हा त्यांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला. तो दिवस रविवार दि. ०६ एप्रिल १८५६ हा होता. इसवी सन १८७५ च्या सुमारास जेव्हा महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. असा घटना सांगितली जाते. तेव्हा समर्थांनी “सध्या लढायची वेळ नाही” असे सांगितले होते.

दिक्षा –
श्री स्वामी समर्थांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिल्याचा इतिहास आहे. दीक्षा दिल्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. तेथील लोकांना व भक्तांना आपल्या तऱ्हेने मार्गदर्शन व
दुःखमुक्त केले.

इ. स. १८५६ मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे बावीस वर्ष वास्तव्य केले. या बावीस वर्षात त्यांनी आपले अवतारकार्य सुरू ठेवले. अनेक लोकांच्या आणि भक्तांच्या समस्या सोडवत त्यांनी मी सतत पाठीशी असल्याचा मोलाचा सल्ला दिला. स्वामींनी इ.स. १८७८ मध्ये वटवृक्ष समाधी मठ या स्थानी अवतारकार्य संपवले.

Subhashchandra bose information । सुभाषचंद्र बोस – देशभक्तांचा देशभक्त !

Subhashchandra bose speech in Marathi
सुभाषचंद्र बोस –

स्वातंत्र्यलढ्यात असे काही मोजकेच नेते होते ज्यांनी आपले कर्तृत्व इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले. सुभाषचंद्र बोस हे देखील त्यापैकीच एक होते. त्यांना
नेताजी या नावाने ओळखले जात होते. पूर्ण आयुष्यात स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्यात असलेली तळमळ आपल्याला जाणवते. जेवढे कर्तुत्व तेवढेच दातृत्व ही असलेला हा नेता स्वातंत्र्यपूर्व काळ गाजवून गेला. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली. “जय हिंद” ,”तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” या दोन्ही नाऱ्यांचे जनक सुभाषबाबू आहेत. अशा या महान नेत्याचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटक (ओडिसा) या ठिकाणी झाला.

“आझाद हिंद सेना” ही पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. प्रत्येक भारतीय तेव्हा स्वातंत्र्याची आस धरून होता. सुभाषचंद्र बोस यांनी याच महत्त्वाकांक्षेचा उपयोग करून अनेक चळवळी उभ्या केल्या. “चलो दिल्ली ” अशी गर्जना करत असलेली सेना आणि देशासाठी प्राण देऊ इच्छिणाऱ्या भारतीय स्त्रीयांची “झाशी राणी पलटण” असे दोन मोठे सैनिकी बळ सुभाषबाबूंनी एकवटले होते. अनेक चळवळी व उठावात स्वतःला झोकुन देणाऱ्या या दोन्ही सेना इतिहासात अजरामर झाल्या. देदीप्यमान कर्तुत्व आणि अंगाऱ्यासारखे शब्द यांनी अखिल भारताला नवीन ऊर्जा देऊ केली होती. इंग्रजांशी लढताना आपल्याला एक सैनिकी बळ देखील आवश्यक आहे याची जाणीव सुभाषबाबूंना होती. सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते.

महात्मा गांधीजींनी एकदा अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना नेताजींचा “देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव भारतीयांवर खूप होता, काही जाणकार आणि इतिहासकार असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर त्यांनी अखंड भारत शाबूत ठेवला असला. भारताची फाळणी झालीच नसती.

सुभाषबाबूंच्या जीवनात अनेक चढउतार पाहायला मिळतात. त्यांचे जीवन एवढे अस्थिर असताना स्वातंत्र्याची धग तेवढी मनात कायम होती. १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा येथील काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. यानंतर नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली. असे बंड सरकारविरुद्ध असल्याचे भासवून त्यांना १९४० मध्येच नजरकैदेत ठेवण्यात आले. जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन करण्यात ते यशस्वी झाले व पेशावर – मास्कोमार्गे ते जर्मनीला गेले. कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

भारताबाहेर नेताजी आझाद हिंद सेना स्थापन करण्याच्या उद्देशाने झपाटलेले होते. भारतात परतायचे असल्यास पूर्ण ताकतीनिशी उतरायचे आणि परकियांचा दारुण पराभव करायचा असे एकमेव उद्दिष्ट असणारे नेताजी पूर्ण तयारीत होते. आपल्या सेनेने आक्रमण केल्यावर भारतीयांचा, सामान्य जनांचा देखील पाठिंबा तेवढाच आवश्यक आहे हे नेताजी ओळखून होते. आक्रमण झाल्यानंतर भारतीय नागरिकांचा उठाव देखील तेवढाच महत्त्वाचा आहे याचे नियोजन व पूर्ण आकलन सुभाषचंद्र बोस यांना होते. यासाठी देशवासियांना आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. हे खूपच कठीण काम होते.

इंग्रजांनी आझाद हिंद सेना बाबत खूपच अपप्रचार केला होता. आझाद हिंद सेना ही जपानच्या मदतीने भारतावर आक्रमण करण्यास सज्ज आहे आणि त्यांना सत्तेची लालसा आहे असा प्रचार इंग्रजांनी भारतात चालवला होता. भारतीय लोक विश्वास कसा ठेवतील याचीच काळजी बोस यांना होती. भारतात तर आझाद हिंद सेना ही घरभेदी सेना आहे असेच सांगण्यात आले होते. एक नकारात्मक भावना पसरवण्यात मिश्किल सरकार व्यस्त होते.

आपले जागतिक स्थान काय असेल आणि अशी परिस्थिती राहिल्यास आझाद सेना आपला उद्देश्य गमावून बसेल व बाकीची राष्ट्रे सहकार्य करणार नाहीत हे सुभाषबाबू जाणून होते. आपली सेना ही भारताचे सैनिकी नेतृत्व करत आहे हे सर्व आशियाई देशांना कळले पाहिजे असे सुभाबाबुंना मनोमन वाटत होते. आझाद हिंद सेना स्थापनेमागे स्वंतत्र भारताचे स्वप्न होते. एक काल्पनिक पण सेनेतच कार्यरत असलेली कार्यप्रणाली होती. या सर्वांचा विश्वास रास्त ठरत गेला पाहिजे. मित्र राष्ट्र म्हणुन आम्हाला जे पाठिंबा देत आहेत त्यांचा सारासार विश्वास हा वाढत गेला पाहिजे, मिळणारे स्वातंत्र्य हे आझाद हिंद सेनेचे असेल आणि त्यासाठी कुठलेही मित्रराष्ट्र कसलीही कुरघोडी करणार नाही याबद्दल सुभाषबाबू आग्रही होते.

• आझाद हिंद सेनेची थोडक्यात माहिती –

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले. तसेच सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे नेतृत्व नेताजीकडे देण्यात आले. आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ४ ब्रिगेड होत्या. आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व “माऊडॉक” येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. नेताजी इंग्रजांवर दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले होते.

• नेताजींचा मृत्यू –

असा हा हरहुन्नरी नेता १८ ऑगस्ट १९४५ रोजी बेपत्ता झाला, नंतर त्यांचा कुठेच पत्ता न भेटल्याने अनेक तर्क वितर्क करण्यात आले. त्यांचा मृत्यू हे भारताच्या इतिहासातील एक अनुत्तरित रहस्य आहे. त्यांच्या मृत्युचे ठोस पुरावे कुठेच नसल्याने काही जण तैवान येथे झालेल्या विमान अपघातात सुभाषचंद्र बोस मरण पावले असे सांगतात.

Swami Vivekanand Information in Marathi । स्वामी विवेकानंद – ज्वलंत व्यक्तिमत्त्व !

Swami Vivekanand Speech
स्वामी विवेकानंद :

भारतीय इतिहासाला आपल्या कर्तुत्वाने गाजवून सोडणारे तसेच पूर्णपणे अध्यात्म क्षेत्रात प्रगती साधणारे देदीप्यमान व ज्वलंत व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेले विचार आणि जीवनातील मार्ग आजच्या पिढीला खूप मौल्यवान आहेत. मनुष्य जीवनात जेवढे उन्नत होता येऊ शकेल तेवढे होण्याचा प्रयत्न तेवढे उन्नत होण्याचा प्रयत्न करणारे, हिंदू धर्माची निष्ठा शेवटपर्यंत पाळणारे, हिंदू धर्माचा प्रचार पूर्ण विश्वात करणारे असे हे स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. स्वामी विवेकांनद यांचा खरं नाव होतं नरेंद्र विश्वनाथ दत्त. लहानपणापासून विवेकानंदांना सद्सद्विवेकबुद्धी आणि अध्यात्माचे संस्कार मिळाले होते.

प्रत्येक गोष्टीला सहजासहजी न मानता त्याच्यावर सारासार विचार करून, बुद्धीला पटेल असेच कर्म स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. सत्याच्या शोधात असताना विवेकानंदांना अनेक प्रश्न पडायचे. या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वतःमध्ये शोधण्याचा सल्ला रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना दिला. यानंतर खरी त्यांची अध्यात्मक प्रगती झाली. रामकृष्ण परमहंस परमोच्च शिखरावर असले तरी त्यांना ज्ञात असलेले सत्य आणि हिंदूधर्म जगापर्यंत पोहोचवायचा होता, याचे खरे काम विवेकानंदांनी केले. ” रामकृष्ण मिशन ” स्थापन करून पूर्ण भारतात आणि विश्वात सत्याचा व धर्माचा प्रचार केला. योग आणि वेदांचा प्रचार खऱ्या अर्थाने पूर्ण जगात खूपच कमी वेळेत स्वामी विवेकानंदांनी केला. हिंदूधर्म म्हणजे नुसते पारंपारिक ग्रंथ नसून अखिल मानव जातीने अनुभवलेले अध्यात्मातील परमोच्च शिखर आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते.

विवेकानंदांचे वक्तृत्वावर बऱ्यापैकी प्रभुत्व होते त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एक अपूर्व अनुभव असे. शिकागो मध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषद परिषदेत हिंदू धर्माची नव्याने व्याख्या देऊन स्वतःची व भारताचे पूर्ण जगावर छाप उमटवली. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी कोलकाता येथे बेलूर मठाची स्थापना केली. स्वामी विवेकांनद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान सर्वांनाच श्रुत आहे. त्यांचा तरुणांवरील प्रभाव दांडगा होता. त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये ” राष्ट्रीय युवा दिवस ” म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यात स्वामी विवेकानंद यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांना भारताचे राष्ट्रभक्त संत म्हणून ओळखले जायचे. त्यांची धर्मावरची पकड एवढी मजबूत होती की जीवन जगण्यातच त्यांनी धर्म दाखवून दिला. तरुणांना विशेष मार्गदर्शन ते करत असत. भारतातील व परदेशातील तरुण वर्ग हा त्यांनी दाखवलेल्या समाज उभारणीच्या आणि राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला होता. त्यांच्या अध्यात्मिक आणि जीवन सत्कर्मी लावण्याच्या कार्यावर सर्व भारतीय विश्वास ठेवून होते.

स्वामी विवेकानंद आपले कार्य करत असताना अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांना चहाविषयी प्रचंड प्रेम होते. त्यांनी आपल्या आश्रमामध्ये चहा सुरूच ठेवला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांना अनेक व्याधी आणि आजारांनी ग्रासले व अखेर ते ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. असा हा युगपुरुष, कर्मयोगी, धर्मयोगी, प्रखर हिंदुत्ववादी स्वामी विवेकानंद या महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन !

Chhatrapati Shivaji Maharaj Information | युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज !

संपूर्ण जगभरात ज्यांचे गुण गायले जातात, कुठलाही प्रशासक अगोदर ज्यांना वंदन करून कार्यभार स्वीकारतो, महाराष्ट्रात तर ज्यांना देवाप्रती पुजले जाते असे युगपुरुष शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Shivaji Maharaj speech Introduction –
प्रस्तावना :

अखंड स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत, रयतेचा राजा, स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे नाव कोण ओळखत नाही! इ. स. १८१८ पर्यंत मराठा साम्राज्य जवळजवळ पूर्ण भारतभर पसरले होते त्याची पायाभरणी शिवाजी राजांनी केली होती. पूर्ण भारतवर्ष मोगलांच्या, आणि काही अफगाण सम्राटांच्या ताब्यात असताना आपला महाराष्ट्र हा स्वराज्य बनला पाहिजे असे स्वप्न आयुष्यभर जगणारे आणि प्रत्येक माणसाच्या मनात तेच स्वप्न रुजू करणारे असे छ्त्रपती पुन्हा होणे नाही. आपल्यातील स्वाभिमान, आकांक्षा गहाण ठेवून गुलामगिरीत हा महाराष्ट्र कधीपर्यंत जगणार! स्वतः सरदार असूनदेखील सत्तेविरुद्ध बंड करून स्वतः मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची ज्योत अखंड तेवत ठवणारे असे छ्त्रपती पुन्हा होणे नाही. छत्रपती संभाजी रूपात दुसरे छत्रपती घडवणारे असे शिवाजी राजे एक महान योद्धा, उत्तम प्रशासक, युद्धनितीकार, सदैव जनतेचे भले योजणारे महाराज होते. हे गुण ज्यांनी हेरले ते मावळे त्यांच्यासाठी व स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण देण्यास देखील तयार होते. इ. स. १६७४ मध्ये त्यांनी ” छ्त्रपती ” म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. रायगड ही राजधानी बनवून स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली. महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी यांना शिवाजी महाराज, शिवाजी राजे, शिवबा, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी संबोधले जाते.

काटेकोर प्रशासन व संघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. साम, दाम, दंड , भेद अशा अनेक नीति त्यांनी प्रत्येक वेळी वापरल्या. शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने आक्रमण करणे अशी युद्ध कौशल्ये महाराजांना अवगत होती. स्वराज्याची सुरुवात होती तेव्हा पुरेसे मावळे सोबती नसताना देखील मोठमोठ्या राजांना आणि त्यांच्या सेनेला पराभूत करण्याचे धाडस आणि धमक शिवाजी महाराजांकडे होती. अनेक गडकिल्ले राज्याची कमान असल्याची जाण त्यांना होती. स्वराज्याचे चारी दिशेने सुरक्षा करण्याचे अद्भुत तंत्र त्यांच्याकडे होते. विश्वासू सरदार आणि मावळे यांना सोबत घेऊन अनेक गडकिल्ले जिंकत स्वराज्याची सीमा त्यांनी अटकेपार पोहचवली. मराठी भाषा आणि चलन विकसित केले.

Shivaji Maharaj Birth
शिवाजी महाराजांचा जन्म –

शिवाजी राजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गड हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. महाराजांची जन्मतारीख याबद्दल इतिहासकार व पंचांग जाणकार यांच्यात मतभेद होते. तो वाद मिटवून आता महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३० ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. हा निर्णय २००१ साली घेण्यात आला. इतर काही तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जाते. महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अजून देखील ६ एप्रिल ( वैशाख शुद्ध तृतीया ) याच दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती मानतात. एका आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की शिवनेरी गडावरील शिवाईदेवीला राजमाता जिजाऊंनी, शक्ती युक्तीने श्रेष्ठ असा पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले.

मार्गदर्शक आणि जडणघडण –

अनेक इतिहासकार असे मानतात की शिवाजी महाराजांवरचे संस्कार हे जिजामाता त्यांच्याजवळ असतानाच झालेले आहेत. वडील शहाजीराजे भोसले हे अगोदर निजामशाहीत सरदार म्हणून कार्यरत होते. लढवैय्या सरदार म्हणून ओळख असलेले शहाजीराजे काही काळानंतर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार म्हणून रुजू झाले. यावेळी शिवाजी राजांचा सांभाळ करण्याचे दायित्व संपूर्णपणे जिजाऊंकडे होते. आदिलशहाने पुण्याची जहागिरी दिल्यानंतर शहाजीराजे पुण्याला रहायला आले. शहाजीराजे आणि तुकाबाई यांचा दुसरा विवाह झाल्यानंतर आणि पुढच्या मोहिमेसाठी शहाजीराजे दक्षिणेत निघून आले. तेव्हा जिजाबाईंनी पुण्याची जहागिरी सांभाळली.

जिजाबाई यांनी थोड्याशा सहकारी आणि विश्वासू अधिकाऱ्यांसोबत बाळ शिवाजीचे शिक्षण सुरू केले. दादोजी कोंडदेव यांना सोबत घेऊन पुण्याची जबाबदारी स्वीकारली. पुण्यावर मोगलांचे आक्रमण चालूच होते. तेव्हा जिजाबाईंनी आपल्या कुशल नेतृत्वाने अनेक राजकीय निर्णय सत्यात उतरवून दाखवले. याचाच परिणाम आणि असेच संस्कार शिवाजी राजांवर होत होते. शिवाजी राजे लहान असताना आणि मोठे झाल्यावर देखील अनेक प्रसंगात जिजाऊंचे मार्गदर्शन त्यांना लाभले. रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ आणि त्यातले योद्धे कसे घडले, त्यातला धार्मिक विचार, राजकीय समतोल असे अनेक पैलू आणि कथा याद्वारे बाळ शिवाजीचे शिक्षण चालूच होते.

स्वतःचा फायदा साधून घेण्यासाठी अनेक जणांनी खोटा इतिहास जनतेसमोर आणला. नक्की मार्गदर्शक कोण कोण होते. शिक्षण कसे पूर्ण झाले. युद्धकला, शस्त्रकला, राजकारण, गनिमीकावा अशा अनेक गुणांत पारंगत असलेले शिवाजी राजे कसे घडले? याबाबत दुमत आढळते. अनेक व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याने नक्की एक गुरू इतिहासात मिळत नाही. शहाजीराजे, दादोजी कोंडदेव, राजमाता जिजाऊ, अशी तीन नावे प्रामुख्याने शिवाजीराजांच्या जडणघडणीत आढळतात. अनेक धार्मिक पुरुष आणि संत यांचे विचार जिजाऊंनी बाळ शिवाजीच्या मनावर बिंबवले. यातूनच मग स्वराज्याची, स्वातंत्र्याची ऊर्मी छत्रपती शिवाजींच्या मनात घर करू लागली होती. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरणे हे फक्त द्योतक होते. खरे दान तर त्यांना लहानपणीच अहोभाग्य मिळाले होते.

Jijamata information in Marathi । राजमाता जिजाऊ जीवन परिचय – माहिती !

जिजाबाई शहाजीराजे भोसले –
• जीवन काल –
( १२ जानेवारी १५९८ – १७ जून १६७४ )

जिजाबाई या मराठा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्री होत. राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि त्यांचे जीवन हे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वा वरून कळून येते. जिजाऊंचे वडील सिंदखेडचे लखुजी जाधव हे होते तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. राजमाता जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमा शके १५२०, म्हणजेच १२ जानेवारी १५९८ सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

• जिजाऊंचा करारी स्वभाव –

जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांत एका प्रसंगावरून वैर निर्माण झाले होते. एकदा एका पिसाळलेल्या हत्तीला नियंत्रित व पकडण्यासाठी २ सैन्य पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाचे नेतृत्व लखुजी जाधव यांचा मुलगा दत्ताजीराव जाधव करत होता तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी भोसले हे करत होते. या प्रसंगात दोघांची भांडणे झाली. या भांडणाचा परिणाम म्हणजे संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार मारले. परिणामी लखुजी जाधव यांनी संभाजी भोसले यांस ठार मारले. हे सर्व समजताच शहाजीराजे स्वतःच्या सासऱ्यावर समशेर घेऊन धाऊन गेले. या लढाईत शहाजीराजांच्या दंडावर जखम झाली.

या अशा अवघड प्रसंगानंतर, जिजाऊंनी आपल्या माहेरचे संबंध तोडले. सर्व नात्यांना बाजूला सारत कर्तव्य हाच आपला धर्म समजून शिवाजी राजांना योग्य प्रकारे वाढवण्यास सहयोग दिला. हा असा प्रसंग कुठल्याही स्त्रीसाठी जीवन हेलावून ठेवणारा ठरला असता परंतु जिजाऊंनी आपल्या करारी आणि एकनिष्ठ स्वभावाने त्यावर मात केली.

• कौटुंबिक कर्तव्ये आणि राज्यकारभार –

जिजाबाई यांना पहिला मुलगा झाला त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. नंतरचे ४ मुलगे लहानपणीच दगावले. त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्त समयी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शिवाजी ठेवले. जिजाऊंना एकूण ८ मुलं होती. त्यातील दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. मोठा मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ होता तर लहान मुलगा शिवाजीराजे यांची जबाबदारी स्वतः जिजाऊनी घेतली होती.

पुण्याची जहागीर सांभाळण्याची जबाबदारी जिजाऊंनी घेतली, त्यावेळी शिवाजीराजे १४ वर्षांचे होते. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या आक्रमणामुळे पुणे अस्ताव्यस्त झाले होते. अशा संकटसमयी दादोजी कोंडदेव आणि काही कुशल सहकार्‍यांसोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. यातच शिवाजीराजांचे शिक्षण देखील चालले होते. शिवाजी राजांना कसे घडवायचे याचे संपूर्ण ज्ञान जिजाऊंना होते. रामायण आणि महाभारतातील कथा जिजाऊ बाल शिवाजीला सांगत असत. महाभारतातील अनेक योद्ध्यांचे महात्म्य व त त्यांचे पराक्रम राजमाता जिजाऊ उत्तमरीत्या छत्रपती शिवाजींना समजावून सांगत. राज्यकारभार आणि पुण्याची जहागीर सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात हे गुण राजमाता जिजाऊंचा पुरस्कार करतात. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प, राजकारण, डावपेच, सहकार या सर्व गोष्टी जिजाऊ पद्धतशीर हाताळत होत्या. या सर्व गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्यात देखील पाहायला मिळतात.

राज्य करीत असताना सामान्य लोक, दीन – दुबळे यांचा आधार फक्त राजाच असतो. जात-पात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा राजाच्या निर्णयात समावेश नसला पाहिजे. सर्वधर्मसमभाव, रयतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे अधिकारी आणि सगेसोयरे हे लालसेने जर भांबावले तर खेळावे लागणारे राजकारण आणि कूटनीती हेदेखील राजासाठी किती महत्त्वाचे आहे असे बाळकडू राजमाता जिजाऊंनी राजे शिवाजी यांना लहानपणीच दिले. याव्यतिरिक्त शस्त्रास्त्र अभ्यास, धर्म आणि बुद्धी विकास असे धडे देखील राजमाता जिजाऊंनी आपल्या कुशल सहकार्‍यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत राजे शिवाजी यांना दिले.

• जीवन कार्य –

शहाजीराजे वेगवेगळ्या मोहिमेत आणि कर्तव्यात व्यस्त असत. शिवाजी महाराज देखील राज्यव्याप्ती मोहिमेवर जात असत. अशा वेळी जिजाऊ यांनी आपल्या सूना आणि त्यांची मुले यांची जबाबदारी घेतली. राजे शिवाजी यांच्याप्रमाणे संभाजीराजांना देखील योग्य संस्कार दिले. राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा पूर्ण करण्यामागे राजमाता जिजाऊंचा खूप मोठा वाटा होता. बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला राजांची कन्या सखुबाई यांना देऊन एक राजकीय सोयरिक साधली आणि त्यांना पूर्णपणे धर्मात परत आणले. या संपूर्ण प्रकरणात त्यांची दूरदृष्टी, न्यायभाव, धर्म सहिष्णुता दिसून येते. शहाजीराजांची सुटका, तोरणागड आक्रमण, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका अशा अनेक जीवघेण्या प्रसंगात राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन किती मोलाचे ठरले होते, हा इतिहास सर्वांना माहीतच आहे. छत्रपती शिवाजी स्वतः वेगवेगळ्या मोहीमेवर असताना स्वतः राजमाता जिजाऊ यांनी राज्यकारभार उत्तमरित्या सांभाळला होता.

• जीवन समाप्ती –

“शिवाजी राजांचा राज्याभिषेक” हा विलक्षण सोहळा पाहून, महाराजांना ” छत्रपती ” बनल्याचे पाहून बारा दिवसांनी म्हणजे ज्येष्ठ कृ. ९ , शके १५९६, इ.स. १७ जून १६७४ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाऊंचे निधन झाले.

राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे दोन्ही छत्रपती घडवले. स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ध्यानी मनी सतत तेवत ठेऊन ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अशा या राजमातेस त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!

आचार्य अत्रे यांचा सावरकरांवरील मृत्युलेख !

प्रसिध्द लेखक ” आचार्य अत्रे ” यांनी वीर सावरकर यांच्या मृत्यूनंतर ” दैनिक मराठा ” मध्ये सावरकर यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल एकूण १४ लेख लिहलेले होते. असे लेख लिहणारे अत्रे, यांच्या मनात सावरकरांबद्दल किती आदर होता हे सर्व लेखमाला वाचल्यावर कळून येते. त्यातील एक संदर्भ लेख इथे दिलेला आहे.

• तात्या गेले !

अखेर आज तात्या गेले; आमचे तात्या सावरकर गेले! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की, ‘घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास – निसर्ग माने, जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे, बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !’

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतिकारक नव्हते, ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते. ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्यप्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला, त्या ज्वलज्जहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुलपुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले. इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि त्यांची प्रज्ञा तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहुना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकुंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुजा देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, “देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरेतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची ज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली, ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तुलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहिले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदीराम बोस ह्या अठरा वर्षाच्या क्रांतिकारक तरुणाने मुझफ्फरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतियुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतिकारकांना त्यावेळी बजावले की , ‘१० मे १८५७ रोजी सुरू झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्यसंपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेव्हांच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटकगृहात अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यच नव्हते. अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ‘मोरिया’ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रिखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते.

म्हणूनच ‘भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी’ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर “आझाद हिंद”चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘पाया’ आणि सुभाषचंद्र हे ‘कळस’ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातच नव्हें, पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. काँग्रेसच्या राज्यांत सावरकरांना काहीं किंमत राहिली नाही. उलट गांधीजींचे खुनी म्हणून त्यांना पकडून त्यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण त्या अग्निदिव्यातून ते सहीसलामत सुटले.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘हे कृष्ण, हे श्याम’ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली. तुकोबा ‘आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा !‘ असे म्हणत वैकुंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नव्हते.

धन्योऽहमf । धन्योऽहम् ।
कर्तव्यं मे न विद्यते किंचित्
धन्योऽहम् । धन्योऽहम् ।
प्राप्तव्यम् सर्वमद्य संपन्नम् ।

          - आचार्य अत्रे. दैनिक मराठा 
           ( २७ मार्च १९६६ )

Indurikar Maharaj Information | निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ “इंदुरीकर”

Indurikar Maharaj Kirtan and Information
इंदुरीकर महाराजांचे किर्तन आणि माहिती –

इंदुरीकर महाराजांचं किर्तन आहे रे ! असे म्हटल्याबरोबर आज महाराष्ट्रात जी गर्दी ओसंडते ती विनाकारण नाही. त्यामागे त्यांची अफाट मेहनत आणि ध्यास आहे. देवाकडे सतत शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे, सामाजिक वर्णव्यवस्था आणि कलह, कौटुंबिक नाती, राजकारण या विषयांवर विशेष मक्तेदारी असणारे असे हे इंदुरीकर सर्वांना आपल्या घरचेच वाटतात. किर्तन आणि समाजप्रबोधन हे मूळ मुद्दे त्यांच्या बोलण्यात असतात.

indurikar life. इंदुरीकर यांचे जीवन

इंदुरीकर ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील, इंदुरी हे आहे. त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांना
इंदुरीकर संबोधले जाते. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे शिक्षण B.Sc. B.Ed. आहे. इंदुरीकर महाराजांची ओळख एक विनोदी किर्तनकार म्हणून आहे. विनोद करण्याबरोबरच ते सत्याची आणि अस्तित्वाचीदेखील जाणून जाणीव करून देत असतात. जिल्ह्यात आणि त्या विभागात बोलली जाणारी थोड्या वेगळ्या धाटणीची भाषा यातच किर्तन होत असल्याने त्याला विनोदाचे स्वरूप प्राप्त होते. सडेतोड आणि पारदर्शक बोलणे, स्वतःचे मुद्दे पटवून देणे हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. शेती, कौटुंबिक नाती, आई वडिलांचे कर्तव्य, त्यांच्या प्रती मुला-मुलींचे कर्तव्य हे विषय ऐकणाऱ्याला भावनिक करून सोडतात. शेतकऱ्यांचे प्रश्न, समाजाला लागलेली उतरती कळा, हरवत चाललेली माणुसकी असे मुद्दे ते विविध ओव्या, भारुड, आणि धार्मिक ग्रंथातील संदर्भ देऊन पटवून सांगतात.

पारंपारिक किर्तनकार जसे किर्तन करतात त्यापेक्षा थोड्या वेगळ्या धाटणीचे आणि जीवनातील वास्तविकता पटवून देणारे इंदुरीकर यांचे कीर्तन असते. राजकारण, व्यसन, अहंकारी स्वभाव यावर त्यांचा खूप कटाक्ष असतो. त्यातील उणीवा, तोटे ते व्यवस्थित बोलीभाषेत समजावून सांगतात. अनेक वेळा हे मुद्दे विनोदाचे मुद्दे होऊन जातात. एखाद्या भावनिक विषयाला जर त्यांनी स्पर्श केला तर स्वतः देखील भावनिक होऊन जातात. इंदुरीकर यांचे मन संवेदनशील असल्याचे नेहमीच जाणवते. दारू पिण्यावर आणि व्यसनावर तर ते नेहमी ताशेरे ओढतात. असा हा संवेदनशील आणि भावनात्मक किर्तनकार एखाद्या गूढ, अध्यात्मिक विषयाला स्पर्श करतो तेव्हा इंदुरीकर महाराजांची जीवनावरची खरी समज आणि पकड कळून येते.

Indurikar’s social work
सामाजिक कार्य –

“अनाथाचा नाथ इंदुरीकर महाराज” अशी ओळख अहमदनगर जिल्ह्यात आहे. संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय आहे. हे विद्यालय ओझर बु. या ठिकाणी आहे. या विद्यालयात दोनशेच्या आसपास विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी अनाथ आणि निराधार आहेत. मागील काही वर्षांपासून निवृत्ती इंदुरीकर महाराज ती शाळा स्वखर्चाने चालवतात. काही वर्गांसाठी विज्ञान विषय तेच शिकवतात. याव्यतिरिक्त संगमनेर पंचक्रोशीतील धार्मिक कार्यक्रम, पारायणाचे सप्ताह, मंदिराचे रंगकाम, मूर्तिकाम यासाठी लागणारा खर्च ते स्वतः करतात.

Indurikar Comedy Kirtan इंदुरीकर महाराज तुफान कॉमेडी किर्तन


#१” संक्रांत स्पेशल – मुलींचा मेकअप ” अशा नावाचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर खूप प्रसिद्ध होत आहे. इंदुरीकर महाराजांचे कुठेच ऑफिशियल चॅनेल किंवा अकाऊंट नसल्याने त्यांचे व्हिडिओज सर्रास शेअर केले जातात. एखाद्या किर्तनात असलेला मुद्दा पकडून आज युट्यूबर्स झक्कास व्हिडिओ बनवतात. मुलींचा मेकअप, लग्नात मुलींचे नटने आणि लग्नातला विपर्यास यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच! 

https://youtu.be/SP3CfLM4LRs


आज होणारे सामाजिक बदल, सांस्कृतिक बदल याबद्दल काही घेणेदेणे नाही. परंतु जे शोभेल असे वागावे, लग्नात आणि कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात मुलीने फेटा घालण्याचा प्रकार किती अशोभनीय आहे हा मुद्दा महाराज पटवून देतात. यापुढे सांगताना ते म्हणतात, लग्नात जेवणाची बदललेली पद्धत, आणि त्याची अगतिकता ते मिश्किलरीत्या समजावून सांगतात. वडिलांचे मुलीबद्दल आणि कुटुंबाबद्दल प्रेम, पैशाचा योग्य वापर, आजच्या जीवनात बदललेला आहार व त्याचे दुष्परिणाम ते सविस्तरपणे समजावून सांगतात.