Shri Swami Samarth Information in Marathi | श्री स्वामी समर्थ !

( स्वामी समर्थांचे कार्य आणि त्यांचा इतिहास हे जास्त लिखित स्वरूपात नाही. ऐकीव आणि कथित स्वरूपाचा इतिहास त्यांच्याबद्दल सांगितला जातो. या लेखात त्यांच्याबद्दल माहिती ही संदर्भ स्वरूपाची आहे. )

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे आपल्या भक्तांना दिलासा देणारे शब्द हे श्री स्वामी समर्थांचे आहेत. श्री स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे एक अपूर्व अनुभव होता. श्री स्वामी समर्थांना भगवान श्री दत्तात्रेय यांचे अवतार समजले जाते. त्यांचा प्रकटकाल हा इ.स. १८५६-१८७८ असा समजला जातो. स्वामी समर्थांना श्री अक्कलकोट स्वामी असेदेखील म्हटले जाते. हे १९ व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत, अशी मान्यता आहे.

“मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार आहेत असे सांगतात. नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे मानले जाते.

इतिहास व त्यांचे कार्य –

इ.स. १४५९ मध्ये, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे अनेक वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्या आणि ध्यानात लीन असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत होता. लाकडे तोडता तोडता त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे तर फक्त निमित्त होते. ते निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच एक दिव्य मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होते. आपल्या हातून या व्यक्तीला जखम झाली म्हणून उद्धवला दुःख झाले परंतु महाराजांनी त्याला आशिर्वाद देऊन गंगा तीरावर भ्रमण करण्यासाठी गेले. त्यानंतर कलकत्त्यात जाऊन महाकालीचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते दक्षिणेस आले.

सुमारे इ.स. १८५६ मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले. मंगळवेढ्याहून प्रथमतः जेव्हा त्यांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला. तो दिवस रविवार दि. ०६ एप्रिल १८५६ हा होता. इसवी सन १८७५ च्या सुमारास जेव्हा महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. असा घटना सांगितली जाते. तेव्हा समर्थांनी “सध्या लढायची वेळ नाही” असे सांगितले होते.

दिक्षा –
श्री स्वामी समर्थांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिल्याचा इतिहास आहे. दीक्षा दिल्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. तेथील लोकांना व भक्तांना आपल्या तऱ्हेने मार्गदर्शन व
दुःखमुक्त केले.

इ. स. १८५६ मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे बावीस वर्ष वास्तव्य केले. या बावीस वर्षात त्यांनी आपले अवतारकार्य सुरू ठेवले. अनेक लोकांच्या आणि भक्तांच्या समस्या सोडवत त्यांनी मी सतत पाठीशी असल्याचा मोलाचा सल्ला दिला. स्वामींनी इ.स. १८७८ मध्ये वटवृक्ष समाधी मठ या स्थानी अवतारकार्य संपवले.

Leave a Comment