Rabindranath Tagore information in Marathi | रवींद्रनाथ ठाकूर – गुरुदेव !

रवींद्रनाथ हे एक थोर साहित्यिक, कवी, नाटककार, संगीतकार व चित्रकार होते. त्यांचा साहित्य क्षेत्रात नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला होता. बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व ठेवणारे रवींद्रनाथ यांच्या “गीतांजली” व “जन – गण – मन” या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे, सृजन साहित्यिक म्हणून ओळख असणारे आणि भारतीय आणि बांगलादेशी राष्ट्रगीताचे रचेते म्हणून देखील रवींद्रनाथ प्रसिद्ध आहेत.

रवींद्रनाथ टागोर संक्षिप्त जीवनपट –

कोलकात्याच्या जोरशंका ठा़कूरबाडी येथे पिराली ब्राह्मण कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा ७ मे १८६१ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते. त्या दोघांच्या १४ अपत्यांपैकी रवींद्रनाथ हे १३ वे अपत्य होते. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहली. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत कलकत्ता सोडले व भारतभ्रमण सुरू केले. भारतातील अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. याच काळात त्यांनी खगोलशास्त्र, विज्ञान, संस्कृत, इतिहास या विषयातले अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली. अनेक महान व्यक्तींची आत्मचरित्रे अभ्यासली. इतका दांडगा व्यासंग व वाचन असल्याने वयाच्या फक्त १६ व्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केले. त्यांनी रचलेल्या प्राथमिक कविता या सतराव्या शतकातील भानूसिंह नामक वैष्णव कवीच्या आहेत असे प्रथम सांगितले परंतु नंतर त्या स्वतःच रचलेल्या आहेत असे मान्य केले. या कवितांमुळे ते प्रसिद्ध झाले होते. नंतर त्यांनी “संध्या-संगीत”, बंगाली भाषेत “भिकारिणी” ही लघुकथा तर सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” इत्यादी प्रसिध्द रचना केल्या.

पुढे बॅरिस्टर होण्यासाठी लंडन येथे युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला. परंतु पदवी न मिळवताच ते परतले. १८८३ मध्ये त्यांनी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह केला. त्यांना एकूण पाच अपत्ये झाली. त्यापैकी दोघांचा बालमृत्यू झाला. १८९० पासून त्यांनी टागोर घराण्याची मालमत्ता सियाल्दा येथे सांभाळण्यास
सुरुवात केली. नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा साथ मिळाली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या लिखाणाला आता सृजनता लाभली होती. गल्प – गुच्छ ( म्हणजेच मराठीत कथा – गुच्छ ) हे ८४ कथा असलेले ३ खंडी पुस्तक प्रकाशित केले. बंगालची संस्कृती आणि ग्रामीण जीवन यात सुरेखरित्या रेखाटले आहे. जीवनातील विरोधाभास या पुस्तकातून झळकतो.

१९०१ साली ते सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. त्यांच्या सृजनशील आणि कलात्मक व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला शांतिनिकेतन येथे राबवलेल्या उपक्रमातून कळून येते. पारंपारिक शिक्षणाला असलेल्या विरोधात्मक विचारातून शांतिनिकेतन येथे एका आश्रमाची स्थापना करून प्रार्थना गृह, प्रयोगशील शाळा व ग्रंथालयाची निर्मिती केली. याच काळात त्यांच्या कविता, त्यांचे लेखन रसिकांचे लक्ष्य वेधून घेत होते.” नैवेद्य ” (१९०१) व ” खेया “(१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या.

” गितांजली ” या महान रचनेसाठी १९१३ मध्ये त्यांना नोबेल हा जागतिक कीर्तीचा सन्मान स्वीडिश अकॅडमी तर्फे जाहीर झाला. त्याचे भाषांतर स्वतः टागोर यांनीच केले होते. पुढे १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली परंतु जालियनवाला हत्याकांड झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून त्यांनी सर ही पदवी सरकारला परत केली.

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे ” श्री – निकेतन ” नामक ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. विविध देशांतील विद्वान लोक, अधिकारी या संस्थेत आणि उपक्रमात सामील करून घेतले. शिक्षणातून आणि ज्ञानप्राप्तीमुळे ग्रामीण भाग सुधारू शकतो असा उद्देश या संस्था निर्मितीमागे होता. १९३० पासून त्यांनी जातीयतेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या लेखनाने, नाटकाने जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

अखेरच्या काही वर्षात ते खूपच लोकप्रिय झाले होते. त्यांचा सामाजिक, राजकीय दृष्टिकोन विचारात घेतला जाऊ लागला होता. त्यांनी बंगाल आणि कोलकाता येथील भयावह दारिद्र्य आणि सामाजिक असमतोल यांबद्दल चिंता व्यक्त केली. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) असे स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. चंडालिका (१९३८),चित्रांगदा, श्यामा (१९३९) यासारख्या नृत्य-नाटिका सादर केल्या व त्यावर विविध प्रयोग देखील केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच(१९३४), आणि चार अध्याय (१९३४) इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. विज्ञानात विशेष रुची ठेवत विश्वपरीचय नावाचा निबंधसंग्रह त्यांनी निर्मिला. आयुष्यात शेवटी शेवटी त्यांनी निसर्गवाद, खगोलशास्त्र, विज्ञान, अध्यात्म अशा विविध छटा असलेल्या कविता लिहल्या. शेवटची चार वर्षे त्यांनी आजारपणात काढली. त्यात ते बराच काळ कोमात होते. त्यांच्या शेवटच्या काही रचना मृत्यूचे गूढ तत्वज्ञान सांगतात. ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचा कोलकात्यातील जोरशंका ठाकूरबाडी येथे मृत्यु झाला.

Leave a Comment