अखंड प्रदीप्त आशेने एखादी कल्पना करावी आणि ती सत्यात उतरावी असेच काही घडले आहे प्रीती श्रीनिवासन या युवतीबद्दल ! आपल्या शारीरिक क्षमता रुंदावल्या असताना देखील यशाची शिखरे पादाक्रांत करणारी ही युवती असंख्य लोकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या संघर्षमय जीवनाबद्दल या लेखात आपण जाणून घेऊया.
प्रीती श्रीनिवासन ही ” सोल फ्री ” या सामाजिक संस्थेची जननी आहे. तिच्या प्रेरणादायी कार्याबद्दल तिला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ती प्रेरणादायी भाषणेदेखील देते. अनेक गरजू आणि विकलांग व्यक्तींसाठी आधार म्हणून सोल फ्री ही संस्था कार्य करते. स्वतःवर आलेल्या शारीरिक व्याधिरुप संकटाचा धैर्याने सामना करत आज ती तरुणी अनेक लोकांचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी झटत आहे. हा सर्व तिचा वर्तमान आहे. तिचा भूतकाळ तेवढाच सुवर्णमय आणि संघर्षमय होता त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया.
प्रीती श्रीनिवासन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला. प्रीती लहानपणापासून शिक्षण आणि खेळ असे दोन्ही छंद जपून होत्या. या दोन्हीही क्षेत्रात अतुल्य यश प्राप्त करत होत्या वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. प्रीती श्रीनिवासन यांनी अपर मेरियन एरिया हायस्कूल,
पेनसिल्व्हानिया, यूएसए मधून पदवी प्राप्त केली आहे. तल्लख बुद्धीची ही विद्यार्थिनी बारावीत असताना अमेरिकेत गुणवत्तेच्या पहिल्या दोन टक्के विद्यार्थ्यांमध्ये होती आणि तिला ” व्हूज व्हू अमंग अमेरिकन हायस्कूल स्टुडंट्स” या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले. प्रीती श्रीनिवासन या वार्षिक गुणवत्ता यादीतील अग्रस्थानी असायच्या. १९ वर्षांखालील तामिळनाडू महिला क्रिकेट संघाच्या त्या कर्णधार होत्या. त्यांनी स्वत: राज्य संघाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व देखील केलेले आहे. त्याशिवाय त्या राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूही होत्या. त्यांनी ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
त्या आत्ता “सोल फ्री” सह कार्यरत आहेत .
अशी उत्तुंग यशे प्राप्त करत असताना एकदा पाँडिचेरीत समुद्रकिनाऱ्यावर त्या खेळत असताना अचानक त्यांना शारीरिक आघात झाला ज्यामुळे त्यांचे मानेखालील शरीर लुळे पडले. त्यांना हालचाल करता येत नव्हती. अशातच त्यांनी श्वास रोखून धरल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. त्यांचा इलाज होत नव्हता. परंतु चेन्नईतील दवाखान्यात त्यांना “स्पायनल कॉर्ड इंजूरी” झाल्याने त्यांचे शरीर लुळे पडले असे निदर्शनास आले. एका खेळाडूसाठी हा किती मोठा धक्का असेल याचा विचार आपण करू शकतो. काहीही हालचाल यापुढे करता येणार नव्हती. काही कॉलेजेसनी त्यांना शिक्षणाला नकार देखील दिला. परंतु परिस्थितीशी दोन हात करत, झगडत त्यांनी बी. एस. सी. ( वैद्यकीय समाजशास्त्र ) आणि एम. एस. सी. ( मानस शास्त्र ) असे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वतःला जो आजार झाला तसेच कितीतरी लोक अशा आजाराने झगडत असतील आणि त्यांना देखील आधाराची गरज असेल अशा विचारातून आणि आईच्या प्रेरणेतून त्यांनी सोल फ्री ही संस्था स्थापन केली. काही वर्षांतच सोलफ्रीसाठी असंख्य मदतीचे हात पुढे येऊ लागले. बघता बघता सोल फ्री कुटुंब मोठे होऊ लागले होते. असंख्य निराधार आणि गरजू लोकांना आर्थिक मदत आणि स्वावलंबी कार्य या संस्थेने देऊ केले. स्पायनल कॉर्ड इन्जुरी या आजाराबद्दल जनजागृती करण्याचे कामदेखील ही संस्था करते. अशा निमित्ताने हा आजार झालेले लोक या संस्थेशी जोडले जात आहेत. त्यांनादेखील आर्थिक सहाय्य व आवश्यक असलेली मदत केली जाते. अशी ही वीरांगना आपल्या कर्तुत्वाने आसमंत गाजवत आहे. तिला तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा !
प्रीती श्रीनिवासन यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान –
टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीने “अमेझिंग इंडियन्स २०१५” म्हणून म्हणून नामित केले.
बेटर इंडिया समूहाने संकलित केलेल्या “दररोज आम्हाला प्रेरणा देणारे अपंग असलेले १६ प्रसिद्ध भारतीयांच्या” यादीमध्ये स्थान दिले.
विजय टीव्हीचा “सिगारम थोता पेंगल – रे ऑफ होप” पुरस्कार प्राप्त आहे.
रेन्ड्रोप्सचा “वुमन अचिव्हर ऑफ द इयर २०१४ ” पुरस्कार
फेमिना “पेन सक्ती” पुरस्कार २०१४ तामिळनाडूमधील पहिल्या दहा सर्वात प्रभावशाली महिलांना देण्यात आला.
एन्विसेज एबिलिटी अवॉर्ड २०१४
सुदेसी मासिकाचा सामाजिक कार्यात उत्कृष्टतेसाठी “ध्रुव पुरस्कार”
रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार “सेक ऑफ ऑनर”
जिल्हा रोटारक्ट कौन्सिल (रोटरी इंटरनॅशनल जिल्हा) कडून “एजंट ऑफ चेंज” पुरस्कार सन २०१४-१५ साठी.
बीबीसी हिंदीने निवडलेल्या पहिल्या १०० महिलांमध्ये यशस्वी ठरलेल्यांपैकी एक.
नॅसकॉम, एनएचआरडी, टीसीएस, गोल्डमॅन सॅक्स, व्हीएमवेअर, टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस, आयएसबीआर, रिअल इमेज मीडिया टेक्नॉलॉजीज, टोस्टमास्टर्स, रोटरी, आयडब्ल्यूए अशा नामांकित संस्थांद्वारे मान्यता प्राप्त आहे.