Chhatrapati Shivaji Maharaj Information | युगपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज !

संपूर्ण जगभरात ज्यांचे गुण गायले जातात, कुठलाही प्रशासक अगोदर ज्यांना वंदन करून कार्यभार स्वीकारतो, महाराष्ट्रात तर ज्यांना देवाप्रती पुजले जाते असे युगपुरुष शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Shivaji Maharaj speech Introduction –
प्रस्तावना :

अखंड स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत, रयतेचा राजा, स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री. शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे नाव कोण ओळखत नाही! इ. स. १८१८ पर्यंत मराठा साम्राज्य जवळजवळ पूर्ण भारतभर पसरले होते त्याची पायाभरणी शिवाजी राजांनी केली होती. पूर्ण भारतवर्ष मोगलांच्या, आणि काही अफगाण सम्राटांच्या ताब्यात असताना आपला महाराष्ट्र हा स्वराज्य बनला पाहिजे असे स्वप्न आयुष्यभर जगणारे आणि प्रत्येक माणसाच्या मनात तेच स्वप्न रुजू करणारे असे छ्त्रपती पुन्हा होणे नाही. आपल्यातील स्वाभिमान, आकांक्षा गहाण ठेवून गुलामगिरीत हा महाराष्ट्र कधीपर्यंत जगणार! स्वतः सरदार असूनदेखील सत्तेविरुद्ध बंड करून स्वतः मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची ज्योत अखंड तेवत ठवणारे असे छ्त्रपती पुन्हा होणे नाही. छत्रपती संभाजी रूपात दुसरे छत्रपती घडवणारे असे शिवाजी राजे एक महान योद्धा, उत्तम प्रशासक, युद्धनितीकार, सदैव जनतेचे भले योजणारे महाराज होते. हे गुण ज्यांनी हेरले ते मावळे त्यांच्यासाठी व स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण देण्यास देखील तयार होते. इ. स. १६७४ मध्ये त्यांनी ” छ्त्रपती ” म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. रायगड ही राजधानी बनवून स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली. महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी यांना शिवाजी महाराज, शिवाजी राजे, शिवबा, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी संबोधले जाते.

काटेकोर प्रशासन व संघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. साम, दाम, दंड , भेद अशा अनेक नीति त्यांनी प्रत्येक वेळी वापरल्या. शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे आणि त्यांच्यावर गनिमी काव्याने आक्रमण करणे अशी युद्ध कौशल्ये महाराजांना अवगत होती. स्वराज्याची सुरुवात होती तेव्हा पुरेसे मावळे सोबती नसताना देखील मोठमोठ्या राजांना आणि त्यांच्या सेनेला पराभूत करण्याचे धाडस आणि धमक शिवाजी महाराजांकडे होती. अनेक गडकिल्ले राज्याची कमान असल्याची जाण त्यांना होती. स्वराज्याचे चारी दिशेने सुरक्षा करण्याचे अद्भुत तंत्र त्यांच्याकडे होते. विश्वासू सरदार आणि मावळे यांना सोबत घेऊन अनेक गडकिल्ले जिंकत स्वराज्याची सीमा त्यांनी अटकेपार पोहचवली. मराठी भाषा आणि चलन विकसित केले.

Shivaji Maharaj Birth
शिवाजी महाराजांचा जन्म –

शिवाजी राजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गड हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. महाराजांची जन्मतारीख याबद्दल इतिहासकार व पंचांग जाणकार यांच्यात मतभेद होते. तो वाद मिटवून आता महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३० ही शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. हा निर्णय २००१ साली घेण्यात आला. इतर काही तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ ही एक जन्मतारीख मानली जाते. महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अजून देखील ६ एप्रिल ( वैशाख शुद्ध तृतीया ) याच दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती मानतात. एका आख्यायिकेनुसार असे सांगितले जाते की शिवनेरी गडावरील शिवाईदेवीला राजमाता जिजाऊंनी, शक्ती युक्तीने श्रेष्ठ असा पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले.

मार्गदर्शक आणि जडणघडण –

अनेक इतिहासकार असे मानतात की शिवाजी महाराजांवरचे संस्कार हे जिजामाता त्यांच्याजवळ असतानाच झालेले आहेत. वडील शहाजीराजे भोसले हे अगोदर निजामशाहीत सरदार म्हणून कार्यरत होते. लढवैय्या सरदार म्हणून ओळख असलेले शहाजीराजे काही काळानंतर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार म्हणून रुजू झाले. यावेळी शिवाजी राजांचा सांभाळ करण्याचे दायित्व संपूर्णपणे जिजाऊंकडे होते. आदिलशहाने पुण्याची जहागिरी दिल्यानंतर शहाजीराजे पुण्याला रहायला आले. शहाजीराजे आणि तुकाबाई यांचा दुसरा विवाह झाल्यानंतर आणि पुढच्या मोहिमेसाठी शहाजीराजे दक्षिणेत निघून आले. तेव्हा जिजाबाईंनी पुण्याची जहागिरी सांभाळली.

जिजाबाई यांनी थोड्याशा सहकारी आणि विश्वासू अधिकाऱ्यांसोबत बाळ शिवाजीचे शिक्षण सुरू केले. दादोजी कोंडदेव यांना सोबत घेऊन पुण्याची जबाबदारी स्वीकारली. पुण्यावर मोगलांचे आक्रमण चालूच होते. तेव्हा जिजाबाईंनी आपल्या कुशल नेतृत्वाने अनेक राजकीय निर्णय सत्यात उतरवून दाखवले. याचाच परिणाम आणि असेच संस्कार शिवाजी राजांवर होत होते. शिवाजी राजे लहान असताना आणि मोठे झाल्यावर देखील अनेक प्रसंगात जिजाऊंचे मार्गदर्शन त्यांना लाभले. रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ आणि त्यातले योद्धे कसे घडले, त्यातला धार्मिक विचार, राजकीय समतोल असे अनेक पैलू आणि कथा याद्वारे बाळ शिवाजीचे शिक्षण चालूच होते.

स्वतःचा फायदा साधून घेण्यासाठी अनेक जणांनी खोटा इतिहास जनतेसमोर आणला. नक्की मार्गदर्शक कोण कोण होते. शिक्षण कसे पूर्ण झाले. युद्धकला, शस्त्रकला, राजकारण, गनिमीकावा अशा अनेक गुणांत पारंगत असलेले शिवाजी राजे कसे घडले? याबाबत दुमत आढळते. अनेक व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याने नक्की एक गुरू इतिहासात मिळत नाही. शहाजीराजे, दादोजी कोंडदेव, राजमाता जिजाऊ, अशी तीन नावे प्रामुख्याने शिवाजीराजांच्या जडणघडणीत आढळतात. अनेक धार्मिक पुरुष आणि संत यांचे विचार जिजाऊंनी बाळ शिवाजीच्या मनावर बिंबवले. यातूनच मग स्वराज्याची, स्वातंत्र्याची ऊर्मी छत्रपती शिवाजींच्या मनात घर करू लागली होती. स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरणे हे फक्त द्योतक होते. खरे दान तर त्यांना लहानपणीच अहोभाग्य मिळाले होते.

Leave a Comment