स्वामिनिष्ठ प्रतापराव गुजर आणि ‘ वेडात मराठे वीर दौडले सात..’ या कवितेचा संबंध!

सात मावळ्यांच्या महापराक्रमामुळे स्वराज्याच्या वाटचालीस एक नवीनच दिशा मिळालेली होती. एक ऐतिहासिक घटना ज्यात असे अविश्वसनीय शौर्य मराठ्यांनी दाखवले की पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरक अशी घटनाच बनली. कवी कुसुमाग्रज यांनी ” वेडात मराठे वीर दौडले सात..” अशी कविता देखील रचली. हे गीत आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत, परंतु याचा अर्थ काल्पनिक नसून ती धगधगती घटना जशी मावळ्यांचा ज्वलंत पराक्रम आहे.

शिवराय आणि काही मराठे यांनी मोगलांच्या खजिन्यावर छापा मारलेला होता. अशा वेळी आणखी कोणीतरी या खजिन्याचा लुटारू आणि भागीदार आहे असे कळताच शिवरायांनी त्याचा तपास घेतला. हा छापा मारणारे कुडतोजी आणि त्याचे अन्य साथीदार हे मराठीच आहेत आणि त्यांच्याशी वैर करून काय मिळणार असा समुपदेश केला. त्यांनादेखील स्वराज्याच्या स्वप्नात आणि लढाईत सामील करून शिवरायांनी कुडतोजी यांना सरसेनापती बनवले. त्यांच्या पराक्रमाला दुजोरा देऊन त्यांचे प्रतापराव गुजर असे नामकरण करण्यात आले.

बहलोलखान (बलोल खान) याने स्वराज्यावर आक्रमण केले होते. त्याचा अत्याचार आणि अन्याय याची खबर घेतलीच पाहिजे असा निर्धार करून त्याचा बंदोबस्त करण्याचे दायित्व महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवले. स्वतःची निष्ठा स्वराज्याप्रती आणि शिवरायांप्रती वाहून घेतलेले कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर यांनी ते दायित्व स्वीकारत गनिमी कावा करून बहलोल खानाच्या फौजेवर आक्रमण सुरू ठेवले. बहलोल खान जेरीस येऊन अखेर शरण आला आणि स्वतःचे जीवनदान मागितले. स्वराज्याला धक्का न लावता येथून निघून जाण्याचे वचन प्रतापरावांना दिले. प्रतापराव हे शूरवीर तसेच माणुसकी जपणारे योद्धा होते. त्यांनी बहलोल खानाच्या शब्दावर विश्वास ठेऊन त्याला सोडले.

शिवरायांना ही बातमी कळताच शिवराय कडाडून उठले. शत्रूने एवढा अत्याचार करून देखील त्याला सहजासहजी मुक्त केले याचा शिवरायांना संताप होता. बहलोल खानाला पकडल्याशिवाय मला तोंड दाखवू नका असा आदेश मिळताच प्रतापराव पेटून उठले. स्वतःकडून झालेली चूक सुधारण्यासाठी बहलोल खानाला पुन्हा पकडण्यासाठी निघाले. आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोल खानाचा तळ पडला आहे, असे त्यांना गुप्तहेरांकडून समजले. आक्रमण लगेच झाले पाहिजे अशी संधी सारखी सारखी मिळणार नाही याचा विचार करून प्रतापराव एकटेच निघाले. बाकी गुप्तहेरांना आक्रमण करण्याचे आदेश दिले. त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दिपोजी (दिपाजी) राउतराव, विठ्ठल पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल आणि विठोजी शिंदे हेदेखील मावळे निघाले.

या सात जणांनी आक्रमण करताच बहलोल खान पिसाळला. त्यांचे सैन्य सैरावैरा झाले. या सात मावळ्यांपुढे हजारोंचे सैन्य काही काळ हतबल वाटत होते. बारा ते पंधरा हजार सैन्य आणि हे सातजण अशी तुंबळ लढाई चालू असताना शेकडो सैन्य ठार झाले. परंतु शत्रू सैन्य संख्येने जास्तच असल्याने या सातही वीरांचा मृत्यू झाला. शिवरायांची योजना त्यांना असे आक्रमण करू देणारी नव्हती. योग्य सल्ल्यानुसार आणि व्यवस्थित योजना बनवून प्रतापराव बहलोल खानास पकडू शकले असते. शिवरायांना ही बातमी कळताच त्यांना अतीव दुःख झाले. प्रतापराव गुजर हे पराक्रमी होतेच परंतु शिवरायांचे ते संतापदायक शब्द आणि त्या शब्दांना जागलेले त्यांचे अफाट कर्तृत्व आणि त्यांची स्वामीनिष्ठा कोणीही विसरू शकत नाही.

या सातही वीरांचे स्मारक उभारण्यात आले. ते नेसरीजवळच आहे. त्यानंतर राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजे जानकीबाई यांच्याशी लावून दिला गेला. या घटनेचा दिवस २४ फेब्रुवारी १६७४ असा सांगण्यात येतो. या पराक्रमी घटनेवर कुसुमाग्रजांनी रचलेली ” वेडात मराठे..” ही कविता ऐकल्यावर किंवा वाचल्यावर एक वेगळेच स्फुरण अंगात शिरते अशी ही कविता पुढीलप्रमाणे ..

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

Leave a Comment