खुर्ची बोलू लागली तर – मराठी निबंध • Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi •

एखादी खुर्ची बोलायला लागल्यावर आपल्या जीवनात काय फरक पडेल आणि आपण त्या खुर्चीशी कसा काय संवाद साधू शकू, अशा कल्पनेचे वर्णन खुर्ची बोलू लागली तर (Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi) या मराठी निबंधात केलेले आहे.

खुर्ची बोलू लागली तर निबंध मराठी | Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi |

एकदा बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी मला खूप वेळ थांबावे लागले. तेथे जास्त कोणी ओळखीचे लोक नसल्याने आणि मोबाईलही बंद झाल्याने मी फक्त सर्वत्र निरीक्षण करत होतो. मी बसलेल्या खुर्चीवरच सर्वप्रथम माझे लक्ष गेले आणि मला वाटले की ही खुर्ची जर बोलत असती तर…

खुर्ची बोलू लागली तर अगदीच मज्जा येईल. तिच्यासोबत देखील आपल्याला काही गप्पा मारता येतील. आपण सर्वजण नेहमीच खुर्चीवर बसत असतो. परंतु खुर्ची बोलू लागली तर खुर्चीवर बसताना तिची परवानगी घ्यावी लागेल. काहीवेळा तर परवानगी मिळणारही नाही.

दोन खुर्च्या एकत्र असल्या तर त्यांचे देखील एक वेगळेच विश्व निर्माण होईल. स्वतःचे अनुभव त्या एकमेकींना सांगतील. स्वतःची निर्मिती, स्वतःचा उपयोग, स्वतःचा आकार – रंग अशा अनेक बाबींविषयी त्या एकमेकींशी खूप – खूप बोलतील. एखाद्या कार्यक्रमात जर हजारो खुर्च्या असतील तर त्याबद्दल काही सांगायलाच नको.

खुर्ची बोलल्याने तिचा वापर अगदी व्यवस्थित होईल. खुर्चीला विनाकारण कोणीही मोडणार नाही. खुर्चीला जर कशाही प्रकारे हाताळले गेले तर खुर्ची तक्रार करेल. त्याचप्रकारे जर खुर्चीला एकदम व्यवस्थित वापरले तर खुर्ची आपल्यासोबत मैत्रीही करेल. आपल्याशी सुसंवाद साधेल.

खुर्ची बोलू लागली तर आपल्याला काही तोटेही जाणवतील. सर्वप्रथम खुर्चीचा वापर कमी होईल. खुर्चीला विचार प्राप्त होतील. खुर्ची सर्व काही स्मरणात ठेऊ शकेल. खुर्ची त्यानुसार संस्कारित होत जाईल आणि तिचे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण होईल. एकदा तिचे स्वमत तयार झाल्यास ती असत्य देखील बोलेल.

खुर्ची बोलू लागली तर त्या गोष्टीचा लाभ तिला होईल. तिचे आयुष्य सुधारेल परंतु मानवी उपयोग हळूहळू नाहीसा होत जाईल. खुर्च्या देखील बोलत्या झाल्याने त्या एकमेकींशी नाते तयार करू लागतील. त्यांच्यात देखील नैसर्गिक विकासाची शक्यता निर्माण होईल.

खुर्ची बोलती झाल्याने आपण जरी आपल्या घरी शांत बसलो तरी खुर्ची मात्र बोलत राहील. त्यांच्यामुळे आपली झोप उडेल कारण खुर्च्या त्यांच्या मर्जीने कधीही बोलतील. खुर्च्यांच्या बोलण्याने त्यांची किंमत वाढत जाईल. खुर्ची ही एकदमच अनमोल वस्तू बनून जाईल.

आता मी खडबडून जागा झालो. विचारांतून बाहेर आलो कारण पाहुण्यांनी नुकताच चहा आणला होता. चहा पिताना पुन्हा एकदा “खुर्ची बोलू लागली तर..” याविषयीचे सर्व विचार मनात घुमत होते. पाहुण्यांचा निरोप घेऊन मी उठलो परंतु आता खुर्ची मला निरोप देते की काय, अशा विचारानेच मला हसू आले.

तुम्हाला खुर्ची बोलू लागली तर हा मराठी निबंध (Khurchi Bolu Lagli Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment