आरसा नसता तर – मराठी निबंध • Aarasa Nasta Tar Nibandh Marathi •

प्रस्तुत लेख हा आरसा नसता तर (Aarsa Nasta Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. जर आरसा नसेल तर आपले भौतिक जीवन कसे असेल आणि कोणकोणत्या घटना घडतील व घडणार नाहीत अशा बाबींचे विस्तृत वर्णन या निबंधात केलेले आहे.

आरसा नसता तर निबंध मराठी | Aarasa Nasta Tar Nibandh Marathi

आज सकाळी माझ्या चेहऱ्याला जखम झाली आणि मी ती आरशात पाहिली. आरशात पाहून त्यावर मलम लावून थोडा आराम केला. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. आत्ता आरसा होता म्हणून मला जखमेवर उपचार करणे शक्य झाले. परंतु जर आरसा नसताच तर काय झाले असते…

आरसा नसता तर आपण कसे दिसतो, आपली हालचाल कशी होते, आपली सुंदरता – कुरूपता अशा बाबी आपल्याला समजल्या नसत्या. आरसा नसता तर आपण आपल्या चेहऱ्याची व शरीराची व्यवस्थित काळजी घेतलीच नसती.

आरसा प्रत्येक व्यक्तीसाठी खूप उपयुक्त ठरत असतो. आपण कसे दिसतो, कसा पेहराव करतो यावरून सध्या आपले व्यक्तिमत्त्व पारखले जात असल्याने प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आरशाचे महत्त्व खूपच वाढलेले आहे.

आपण सुंदर आणि नीटनेटके दिसावे अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने बाजारात सौंदर्य प्रसाधनांची रेलचेल असते. ही सौंदर्य प्रसाधने आपण आरशाच्या मदतीनेच शरीरभर थोपत असतो. आरसा नसता तर सौंदर्य प्रसाधने कोणी विकतच घेतली नसती.

आज केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, हॉटेल्स, मोठमोठे मॉल्स अशा सर्व ठिकाणी चकचकीत आरशांची सजावटच केलेली असते. आपले शरीर सुंदर असो की नसो, प्रत्येकजण हा आरशांत स्वतःला पाहून सुंदरतेचा दिलासा मात्र देत असतो. आरसा नसता तर अशा ठिकाणांचे महत्त्वच राहिले नसते.

सध्या प्रत्येकाच्या घरी आरसा आहे. काहींच्या घरी तर प्रत्येक खोलीत आरसा असतो. कोणालाही न पाहवणारे असे आपले नखरे, नृत्य आणि वेडेवाकडे चाळे आपण आरशात पाहूनच करत असतो. आरसा नसता तर असे नखरे आपण केलेच नसते.

आरसा असल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झालेले आहेत. प्रत्येक मनुष्य केस, त्वचा आणि इतर शारिरीक अवयवांची काळजी घेऊ लागला आहे. स्वतःचे वागणे आणि असणे हे आपण आरशातच न्याहाळत असल्याने आरसा नसेल तर आपल्या शारिरीक अस्तित्वाची दिशा नक्कीच बदलून जाईल.

आरसा नसता तर काही फायदेही झाले असते. सध्या व्यक्ती आंतरिक सौंदर्यापेक्षा फक्त  शारिरीक सौंदर्याला महत्त्व देऊ लागला आहे. त्यामुळे शारिरीक अस्तित्व खूपच मजबूत होऊन स्वतःला सुंदर दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. आरसा नसेल तर या गोष्टी घडणारच नाहीत.

तुम्हाला आरसा नसता तर हा मराठी निबंध (Aarasa Nasta Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment