तंबाखूचे दुष्परिणाम मराठी निबंध । Tobacco Effects Essay In Marathi ।

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम हा निबंध (Tobacco Effects Essay In Marathi) लिहिताना विद्यार्थ्यांना त्याबद्दल विस्तृत माहिती असणे गरजेचे आहे. तंबाखूची सवय, आरोग्यावर त्याचे कालांतराने होणारे परिणाम, तंबाखू सुटण्यासाठी करावे लागणारे उपाय या सर्वांची चर्चा या निबंधात करावी लागते. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा हा निबंध !

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम मराठी निबंध| Tobacco Bad Effects Marathi Nibandh ।

“तंबाखूच्या नियमित सेवनाने कर्करोग होऊ शकतो” अशी सूचना तंबाखूच्या पाकिटावर लिहलेली असते. तरीही माणूस असा आहे की जी सवय लागते ती त्याला सुटता सुटत नाही. एकदा का जिभेला आणि शरीराला तंबाखूची सवय लागली की त्याची तलप झाल्यावाचून राहत नाही. मग नुकसानीची पर्वा न करता तंबाखूचे सेवन केले जाते.

तंबाखू खाल्ल्याने कर्करोगाव्यतिरिक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार जडतात. पूर्ण जगभरात तर तंबाखू खाण्याचे प्रमाण एवढे आहे की त्यामुळे दर 8 सेकंदाला एक मृत्यू होत आहे. जीवनाचा अंत एका व्यसनामुळे व्हावा असे कोणाचेच नशीब नसावे, परंतु आपण ते स्वतः आपल्या हाताने घडवत असतो.

आज सर्वत्र इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही जर तंबाखूमुळे कर्करोग कसा होतो असे सर्च केल्यावर देखील बरीचशी माहिती मिळू शकेल. तंबाखू सुरुवातीला मज्जा म्हणून खाल्ली जाते किंवा आपल्या वडीलधाऱ्या लोकांचे किंवा समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे अनुकरण करून खाल्ली जाते.

सेवन करणारा व्यक्ती सुरुवातीला शरीर आणि बुद्धीने लहान असल्याने ती खायची नाही एवढी समज त्याच्याकडे नसते आणि “एकदा खाल्ल्याने काय होतंय?” किंवा “आयुष्य एकदाच मिळते, मज्जा करायची असते.” असे असंगत सिद्धांत देऊन तो स्वतःच खायला सुरुवात करतो.

धूम्रपान किंवा तंबाखू सेवनाने फुफ्फुसाचे आजार जडतात. रक्तदाब अचानक वाढू लागतो. छातीत दुखणे, हृदय विकाराचा झटका येणे, मेंदूचे विकार, पायाचा गैंग्रीन हे रोग होतात. तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, किंवा किडनीचा कर्करोग होऊ शकतो.

तंबाखू खाणारा व्यक्ती हा शरीराचे नुकसान तर करतच असतो शिवाय त्याच्या कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. संदीप माहेश्वरी हे आजच्या तरुणाईत एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी एकदा असे म्हटले होते की पूर्ण समाजाचा परिणाम एका व्यक्तीवर होतो आणि एका व्यक्तीचा परिणाम पूर्ण समाजावर होत असतो.

याच अनुषंगाने एक व्यक्ती तंबाखू खात असेल तर त्याचे अनुकरण नक्कीच त्याचा मुलगा व आसपास राहणारी इतर मुले करू शकतात. सर्वात अगोदर तोच व्यक्ती कोणाला तरी पाहूनच तंबाखू खायला शिकला असणार आणि आता त्याचे अनुकरण भावी पिढी करू शकते.

आजचा विद्यार्थी हा जर तसेच अनुकरण करत राहिला तर त्याचे शैक्षणिक नुकसान तर होईलच शिवाय जीवन उदात्त आणि प्रगती पथावर नेण्याचे तो प्रयत्नही करणार नाही. त्यामुळे तंबाखू खाणे हे स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, तसेच पर्यायाने देशाच्या हितासाठी चांगले नाही.

तंबाखू किंवा कुठलेही व्यसन सोडण्याचा एकमेव उपाय आहे. तो म्हणजे, जीवनात स्वतःचे स्वप्न आणि ध्येय कुठल्याही व्यसनापेक्षा मोठे असले पाहिजे. ते ध्येय पूर्ण करण्याची धमक अंगी बाणवली पाहिजे तर आणि तरच ते व्यसन सुटू शकते.

तुम्ही इतरही उपाय पाहता पण त्याचा फायदा होईलच हे सांगता येत नाही. “तंबाखूवरून लक्ष हटवून इतर ठिकाणी मन रमवा”, “चांगल्या सवयी लावून घ्या”, “खेळ खेळा”, “मनोरंजन करा”, हे सर्व वरवरचे उपाय आहेत. या उपायांनी तंबाखू सुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

जीवनात जबाबदारीची जाणीव होऊन जीवन आणखी सुंदर कसे काय बनवू शकतो त्यानुसार स्वप्न जर आयुष्यात बाळगले तर वाईट सवयी, व्यसने आपोआपच सुटतात. जीवनात मोठे स्वप्न असल्याशिवाय कोणतेच व्यसन सहज सुटणे शक्य नाही.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तंबाखूचे दुष्परिणाम हा निबंध (Tobacco Effects Essay In Marathi) कसा वाटला? याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.

3 thoughts on “तंबाखूचे दुष्परिणाम मराठी निबंध । Tobacco Effects Essay In Marathi ।”

  1. This essay is very nice ! and very helpful for fight with “tobacco” .
    I like it,and I share this essay or this nice message.well done!

    Reply

Leave a Comment