स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Veer Sawarkar Marathi Nibandh |

विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध (Veer Sawarkar Marathi Nibandh) लिहताना कल्पनिक विस्तार करायचा नसतो. त्यांचे जीवनकार्य मर्यादित शब्दात आणि वास्तववादी स्वरूपात मांडायचे असते.

प्रस्तुत निबंधात विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, लेखक अशा अनेक पैलूंचा आविष्कार आपल्या जीवनात घडवून आणणारे वीर सावरकर हे एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

वि. दा. सावरकर मराठी निबंध | V. D. Sawarkar Essay In Marathi |

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. अत्यंत परखड आणि ध्येयनिष्ठ म्हणून परिचित असणारे सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला.

त्यांचे वडील दामोदर सावरकर यांना तीन मुले होती. बाबाराव, विनायक आणि नारायण अशी तिन्ही मुलांची नावे होती. विनायक नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले.

वक्तृत्व आणि काव्यरचना यांत सावरकरांना लहानपणापासून रस होता. स्वदेशीचा फटका, आणि स्वतंत्रतेचे स्त्रोत ह्या रचना त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी रचल्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी किशोरवयातच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली.

त्यांनी महाविद्यालयीन जीवनात देशात आणि विदेशात आपल्या क्रांतिकारी विचारांनी सर्व तरुण वर्गाला प्रभावित केले होते. त्यावेळी “राष्ट्रभक्त समूह” ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली. पुढे या संघटनेचे प्रकट रूप म्हणून “मित्रमेळा संघटना” स्थापन केली.

इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव सावरकरांवर होता. जोसेफ यांची संघटना “यंग इटली” च्या नावावरून त्यांच्या मित्रमेळा संघटनेस “अभिनव भारत” असे नाव देण्यात आले होते. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध बंड म्हणून पुण्यात विदेशी कापडांची होळी केली होती.

पुढे शिक्षणासाठी लंडनला असताना त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. भारतातील क्रांतिकारकांना शस्त्रास्त्र पुरवठा करण्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली होती. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून त्यांनी उडी मारली.

त्यांचा पोहत जाण्याचा बेत पुरता फसला होता. फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतात खटला दाखल करून दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली. त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले.

जन्मठेपेची शिक्षा जर पूर्ण झाली तर भारतात सक्रिय काम करता येणार नाही आणि कैदेत असताना त्यांच्यावर अमानुष छळ देखील होत असल्याने त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य करीत स्वतःची सुटका करून घेतली. पण भारतात आल्यानंतर त्यांना राजकारणात सहभागी होता आले नाही.

भारतात आल्यावर त्यांनी समाजोपयोगी कार्य मात्र चालू ठेवले. लोकांना न्याय मिळवून देणे आणि अनिष्ट रूढी-परंपरा यांच्या विरोधात लिखाण चालू ठेवले. हिंदू धर्म खूप स्पष्ट स्वरूपात व्यक्त केला. मराठी भाषेतील सरकारी कार्यक्षेत्रात अनेक शब्द त्यांनी सुचवलेले आहेत.

सावरकर हे एक क्रांतिकारी असण्याव्यतिरिक्त उत्तम लेखक आणि कवी देखील होते. त्यांनी लहानपणी जी लेखणी पकडली त्याची साथ आयुष्यभर सोडली नाही. सावरकरांचे साहित्य आजदेखील अजरामर आहे. “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते” त्यांच्या या कविता आजही खूप प्रसिद्ध आहेत.

१९६६ मध्ये प्रकृती खालावत गेल्याने प्रयोपवेशन करून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. क्रांतिकारी, समाजसुधारक आणि साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवणारे वि. दा. सावरकर यांचे निधन २६ फेब्रुवारी १९६६ रोजी झाले. अशा या अजरामर स्वातंत्र्यवीरास माझे आणि आपणासर्वांचे विनम्र अभिवादन!

तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर हा निबंध ( Veer Sawarkar Marathi Nibandh) कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

Leave a Comment