शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध । Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh

प्रत्येकासाठी शाळा हा खूप जाणिवेचा विषय आहे. ज्ञान, शिक्षण आणि जगण्याची कला शिकवणारी शाळा म्हणजे सतत आठवणीत राहणारे ठिकाण आहे. त्यामुळे शाळेचा निरोप घेताना (Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh) या निबंधात शाळेबद्दलचा आत्तापर्यंतचा अनुभव कथन करायचा असतो. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा हा निबंध!

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | Shalecha Nirop Ghetana Marathi Nibandh |

आज शाळेबद्दलच्या सर्व आठवणी अचानक उचंबळून आल्या. त्याला कारणही तसेच होते. आज शाळेचा निरोप द्यावा लागत होता. शाळेचा निरोप घेणे हा काही कुठल्या ज्ञानाचा भाग नव्हता पण ज्या ठिकाणी आयुष्याची सुरुवातीची महत्त्वपूर्ण वर्षे व्यतित केली तेथून काढता पाय घेणे अवघड वाटत होते.

राजापूरमधील आमचे आदर्श विद्यालय हे खूप नावाजलेले शैक्षणिक संकुल आहे. आज दहावीतून बाहेर पडताना मी जे जे काही शिकलो, जे ज्ञान मिळवले त्याबद्दल त्या शाळेचा मी नेहमीच ऋणी राहीन. मातीच्या गोळ्याला कुंभार जसे घडवत असतो तसेच अपरिपक्व मुलांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून शाळाच घडवत असते.

मला दहा वर्षापूर्वीचा शाळेतील पहिला दिवस आजही आठवतो. मला सर्व काही अपरिचित होते. सर्व रस्ते, मुले, शिक्षक आणि वर्ग! वर्गात गेल्याबरोबर मला भीती वाटू लागली ती म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका पाटील मॅडम यांची! त्यांनी पहिल्याच तासाला असे काही दरडावले की सर्व मुले शांत बसली आणि मी एकटाच रडू लागलो. इतका रडलो की त्यांनी मला घरीच पाठवले.

त्या संपूर्ण पहिली इयत्तेतील माझे खूप सारे दिवस लपून छपून आणि सर्वांपासून लांब लांब राहत भित्रेपणातच संपले. दुसऱ्या इयत्तेपासून मी थोडा धीट होऊ लागलो. सर्वांशी मिळून मिसळून वागू लागलो. शिक्षणात माझी प्रगती होऊ लागली.

आत्तापर्यंत दहा वर्षातील माझे खूप सारे क्षण अविस्मरणीय असे होते. माझा वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक आल्याने झालेला सत्कार असो, किंवा धावण्याच्या स्पर्धेत मला मिळालेले पदक असो, तसेच पाचवीत असताना मला वर्गमंत्री देखील बनवले होते तो अनुभव असो! सर्व काही खूपच सुखदायक होते.

संपूर्ण दहा वर्षात शाळेतील सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन मला लाभले. पाटील मॅडम, मोरे सर यांनी मला नेहमी प्रेरित केले. तसेच शारिरीक शिक्षणाचे कदम सर हे मला विशेष आवडत असत कारण त्यांनी खेळाबरोबर जीवनाचे धडे देखील दिले. रोजच्या रोज खेळणे, व्यायाम तसेच कवायत प्रकार यांनी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होत गेलो.

शाळेमध्ये असताना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वयानुरूप मिळत गेली आणि मी घडत गेलो. मला भविष्यात धावपटू किंवा शिक्षक बनायचे आहे. ही दोन्ही स्वप्ने माझ्यात रुजवण्यामध्ये शाळेचा बहुमूल्य वाटा आहे असे मी समजतो. माझ्याप्रमाणे इतर मित्रांनाही जीवनाची दिशा मिळण्यामागे इथले शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाला त्याचे श्रेय आहे.

शाळेत पाठवल्यावर पालक नेहमीच आपल्या पाल्याला उत्तम घडवण्याचे स्वप्न पाहतात. मी, माझे आई वडील आणि कुटुंबीय देखील माझ्या घडण्याने शाळेबद्दल नेहमी कृतज्ञ असतील. एक विद्यार्थी घडण्यामागे एखादी शाळा खूप प्रयत्नशील असते. सर्व ज्ञानी शिक्षकांचा त्याठिकाणी संपूर्ण कस लागलेला असतो.

शाळेचा निरोप घेताना गहिवरून येणे सहजच आहे कारण सुंदर आणि संस्कारीत आयुष्याची सुरुवात इथूनच झालेली असते. आयुष्यभराचे मित्र आणि आदर्श इथेच बनत असतात. स्वतःच्या स्वप्नांना बळ मिळण्याचे काम शाळेत होत असते. या प्रकारचे सर्व विचार एकत्र मनात गर्दी करू लागले की मी शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती नतमस्तक होतो.

तुम्हाला शाळेचा निरोप घेताना (Shalecha Nirop ghetana Marathi Nibandh) हा निबंध कसा वाटला? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा! संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment