विद्यार्थी आणि मोबाईल (फायदे) – मराठी निबंध २ | Vidyarthi Ani Mobile Nibandh 2

प्रस्तुत लेख हा विद्यार्थी आणि मोबाईल (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

आजच्या विद्यार्थ्यांना मोबाईल हा वरदानच ठरत आहे. त्यांना असणाऱ्या शंकांचे समाधान हे मोबाईलमुळे सहज शक्य कसे काय झालेले आहे, अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात करण्यात आलेले आहे.

विद्यार्थी आणि मोबाईल – फायदे | Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi |

विद्यार्थ्यांना मोबाईल फोनचा खऱ्या अर्थाने फायदा व उपयोग हा कोरोना काळात झाला. ऑनलाईन तासिका आणि ऑनलाईन शिक्षणाच्या उद्देशाने सर्व पालकांनी आपल्या पाल्य विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घेऊन दिलेले होते. त्यानंतर विद्यार्थी अभ्यासासाठी मोबाईलचाच जास्त वापर करू लागले.

शाळेतील सर्व शिक्षण हे सध्या ऑनलाईन देखील उपलब्ध असल्याने विद्यार्थी मोबाईल सातत्याने हाताळू लागलेत. विद्यार्थी अभ्यासातील समस्या व प्रश्नांची उत्तरे मोबाईलवरूनच मिळवू लागलेत. यूट्यूब, गूगल तसेच अन्य शैक्षणिक मोबाईल ॲप्लिकेशन्स व वेबसाइट्सची मदत विद्यार्थी सहजरित्या घेऊ लागलेत.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून अनेक शैक्षणिक संस्था या ऑनलाईन शिक्षणसुद्धा उपलब्ध करून देऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे मोबाईलच्या वापराने विद्यार्थी घरबसल्या कला, क्रीडा, शालेय, तांत्रिक अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकत आहेत.

सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून उत्तर मिळवणे शक्य नसते. मोबाईलमुळे मात्र अभ्यासावेळी न समजलेली एखादी संकल्पना ही विद्यार्थ्यांना सहज समजत आहे. तीच संकल्पना विद्यार्थी वारंवार मोबाईलमधून समजून घेऊ शकत असल्याने त्यांचा अभ्यास हा सहजशक्य व तणावमुक्त झालेला आहे.

मोबाईलचा वापर हा इंटरनेटमुळे आणखीनच सोयीस्कर झालेला आहे. विद्यार्थी जगभरातील विविधता ऑनलाईन पाहू शकतात. सोशल मीडिया, ऑनलाईन सेवा व सुविधा, ऑनलाईन बँकिंग अशा विविध बाबींचा वापर विद्यार्थी लहान वयातच करू लागलेत. विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षणाची गरज मोबाईलमुळे सहज पूर्ण होत आहे.

मोबाईल आणि इंटरनेटमुळे कारकिर्दीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना कामाची माहिती लहान वयातच होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, कोडींग, डिजिटल मार्केटिंग अशी कारकिर्दीची निर्माण झालेली क्षेत्रे विद्यार्थ्यांसाठी मोबाईलमुळे खुली झालेली आहेत.

एक आभासी दुनिया आणि त्यातील नकली वावर हेच उद्याचे भविष्य आहे. सोशल मीडिया त्यादिशेने पाऊले उचलत आहे. विद्यार्थी जर मोबाईल हाताळू लागले तर त्यांनाही भविष्यात होणारे तांत्रिक बदल आत्ताच समजतील. मानवी जीवनात तंत्रज्ञान कसे काय बदल घडवून आणत आहे, याचीही प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना होऊ शकेल.

सध्याचे युग हे माहिती युग आहे, असे म्हटले जाते. मोबाईलमुळे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही माहिती मिळवू शकतात. त्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत आहे. सखोल ज्ञान व विस्तारित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास सोप्पे झाले आहे.

विद्यार्थ्यांचे ध्यान हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा मोबाईलच्या वापरावेळी लक्षात घ्यावा लागेल. मोबाईलच्या माध्यमातून ज्या सुविधा व सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलचे नकळत व्यसन जडत आहे. काही विद्यार्थी मोबाईल अतिप्रमाणात वापरत आहेत.

मोबाईलच्या अतिवापराने मात्र विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शारिरीक व मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थी हे स्वकेंद्री बनत आहेत. मोबाईलचा प्रमाणात वापर केला आणि आरोग्याची योग्य काळजी घेतली तर मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर अशी वस्तू ठरू शकेल.

तुम्हाला विद्यार्थी आणि मोबाईल हा मराठी निबंध (Vidyarthi Ani Mobile Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment