थेंबे थेंबे तळे साचे – मराठी निबंध | Thembe Thembe Tale Sache – Nibandh |

प्रस्तुत लेख हा थेंबे थेंबे तळे साचे (Thembe Thembe Tale Sache Nibandh Marathi) या म्हणीवर आधारित एक मराठी निबंध आहे. कोणतीही गोष्ट थोड्या थोड्या प्रमाणात करत गेल्यास काही काळानंतर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो अशा आशयाचा हा निबंध आहे.

थेंबे थेंबे तळे साचे – मराठी निबंध | Thembe Thembe Tale Sache Essay In Marathi |

मराठी भाषेत अनेक म्हणी प्रचलित आहेत. मानवी जीवनातील सामाजिक अथवा वैयक्तिक वास्तविक अनुभवांवर आधारित अशा खूप साऱ्या म्हणी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे म्हणींचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार वागणे यातच हुशारी असते. थेंबे थेंबे तळे साचे ही त्यापैकीच एक प्रसिद्ध अशी म्हण आहे.

पाण्याचा एक एक थेंब जरी गोळा झाला तरी त्याचे एकदिवस मोठे तळे निर्माण होत असते. म्हणजेच थोड्या – थोड्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणत्याही क्षेत्रात आपल्याला एक दिवस नक्की यश मिळते. सुरुवातीला असाध्य वाटणारे असे ध्येय आपण रोजच्या दैनंदिन प्रयत्नांनी साध्य करू शकतो.

मानवी इतिहासातील अनेक व्यक्तींनी सातत्याने संघर्ष व प्रयत्न करून आपल्याला हवे ते साध्य केलेले आहे. निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने दररोज प्रयत्न करून असाध्य वाटणारे ते ध्येय प्राप्त केलेले आहे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत दररोज थोडी – थोडी पाऊले टाकत प्रवास पूर्ण केलेला आहे. 

आपण ठरवलेले लक्ष्य किंवा परिणाम हे एका दिवसात प्राप्त होऊ शकत नाहीत मात्र त्यासाठी प्रयत्न आपल्याला दररोज करावे लागतात. दररोज प्रयत्न करताना अगदी निराशा व थकवा जाणवतो. तरीही मनाला भरकटू न देता उत्साहाने त्याच कामात विविधता आणत ते पूर्ण करत राहणे एवढेच आपल्या हातात असते.

सातत्याने दिवसाचे कर्म पूर्ण करत राहिल्यास आपल्याला थोड्याशा यशाची चव लागत जाते. काही काळानंतर त्या यशाची सवयच जडून जाते. आपल्याला तेच काम करण्यात मज्जा येऊ लागते आणि त्या कामात आपण अगदी पारंगत होऊन जातो. यश आणि कौशल्य प्राप्त झाल्याने आपले काम हे खूप काळासाठी नियोजनबध्द होत असते.

नियोजनबध्द झालेले दररोजचे कर्म आणि त्यामुळे मिळत असलेले इच्छित परिणाम हेच मोठ्या तळ्याची उपमा दर्शवतात. म्हणजेच इच्छित परिणाम प्राप्त झाल्याने आपल्याला रोजच्या प्रयत्नांचे महत्त्व समजते. योग्य प्रयत्नांनी नियोजित ध्येय कसे प्राप्त कसे करायचे हेसुद्धा समजते.

प्रयत्न केल्यानंतर दोन शक्यता उपलब्ध असतात. एकतर यश प्राप्त होते किंवा अपयश प्राप्त होते. अपयश येत असेल तर प्रयत्नांची दिशा तपासून पाहणे आणि यश येत असेल तर प्रयत्न वाढवत नेणे अशा दोन मार्गांनी आपण आपले जीवन ध्येयाच्या मार्गावर चालवू शकतो आणि निश्चित परिणामांचे मोठे तळे साठवू शकतो.

पाण्याची एक संततधार मोठ्या दगडालाही फोडू शकते त्याचप्रमाणे वारंवार केली जाणारी छोटीशी कृती देखील मोठा परिणाम घडवून आणते. त्या परिणामाने आपले अवघे जीवनच बदलून जात असते. अशामुळे आपल्याला आपले जीवन उन्नत करणाऱ्या संगती व सवयी जडत जातात.

‘पाण्याची संततधार’ या उदाहरणाप्रमाणेच जीवनाला एक प्रगत दिशा देणाऱ्या अनेक कृती आणि सवयी सांगता येतील. दररोज पुस्तक वाचणे, रोजनिशी लिहणे, व्यायाम करणे, आवडता छंद बाळगणे अशा कृती केल्याने जीवनातील रोजचे थोडेसे प्रयत्न हे आपल्याला घवघवीत यश मिळवून देतात.

आपणही असा निश्चय करू शकतो की आपल्या क्षेत्रात एक छोटेसे कर्म जे आपल्याला भविष्यात हवा तो परिणाम घडवून आणेल ते कर्म सातत्याने करत राहणे आणि यशस्वी होणे. एकदा का मिळालेले यश हा आपला अनुभव बनला, तरच खऱ्या अर्थाने ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा अर्थ आपणांस उमगेल.

तुम्हाला थेंबे थेंबे तळे साचे हा मराठी निबंध (Thembe Thembe Tale Sache Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment