ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Education Marathi Nibandh |

ऑनलाईन शिक्षण (Online Education) हा निबंध म्हणजे नव्याने रुजू झालेल्या डिजिटल शिक्षण पद्धतीचे फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी या सर्वांचे विश्लेषण करायचे असते. तंत्रज्ञान आणि माहितीचे जाळे किती व्यापक स्वरूपाचे असू शकते त्याद्वारे शिक्षण कसे काय घेऊ शकतो, याचेही वर्णन करायचे असते.

डिजिटल / ऑनलाईन शिक्षण | Digital Education Essay In Marathi |

2020 मध्ये आलेल्या कोरोना साथीमुळे संपूर्ण जगभरात ऑनलाईन शिक्षण प्रसारित झाले. मोबाईल, टॅब किंवा संगणक यांचा वापर करून नव्या पिढीतील विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ लागले. हे शिक्षण म्हणजेच ऑनलाईन शिक्षण किंवा डिजिटल शिक्षण!

आज प्रत्येक विद्यार्थी मोबाईल आणि संगणकावर शिकू लागलेला आहे तेही ऑनलाईन क्लासच्या निमित्ताने! शिक्षक व्हिडिओ सॉफ्टवेअरद्वारे इंटरनेटचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांशी जोडले जात आहेत. जसे शाळेत शिकवले जाते त्या पद्धतीतच ऑनलाईन देखील शिकवता येऊ शकते, याचा परिचय सर्वांना येऊ लागला आहे.

इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हा स्तर उपलब्ध आहे. सर्व विषय घरबसल्या शिकता येऊ शकतात याचे ज्ञान झाल्याने सर्व पालक आणि विद्यार्थी देखील आता अशाच शिक्षणाची मागणी करू लागले आहेत. इंटरनेट वापरामुळे मुलांच्या शंका देखील लगेच सोडवल्या जाऊ लागल्या आहेत.

घरी बसून सर्वात उत्तम शिक्षण उपलब्ध होणे, नावाजलेल्या शिक्षकांची ऑनलाईन तासिका, कोणत्याही विषयाची खोलवर माहिती, शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कौशल्य विकसित करणे, असे एक ना अनेक फायदे ऑनलाईन शिक्षणाचे आहेत.

शिक्षणाच्या या पद्धतीचे तोटे देखील भरपूर आहेत. वर्गात शिकवताना शिक्षक – विद्यार्थी नाते विकसित होत असते परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीत शिक्षक हा दूर असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांचा सहवास लाभू शकत नाही. शिक्षक आणि शिक्षणाबद्दल आदर निर्माण होऊ शकत नाही.

शिक्षण घेताना विद्यार्थाला मोबाईलचे व्यसन देखील लागू शकते. इंटरनेट चालू असल्याने विद्यार्थी इतर वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हाताळू लागले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद हा सोशल मीडिया वरून होऊ लागला आहे. त्यामुळे एकंदर विचार करता दिवसातून विद्यार्थ्यांचा खूप सारा वेळ मोबाईल वापरण्यात जात आहे.

आता परीक्षाही ऑनलाईन होत असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणात कस लागत नाही. भाषेचे ज्ञान होणे कठीण होऊन बसले आहे. त्याबरोबरच आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत कारण मोबाईल तासनतास वापरत असल्याने डोळ्यांचे विकार, मन एकाग्र न होणे, उदास वाटत राहणे, अशा समस्या डोके वर काढू लागल्या आहेत.

डिजिटल शिक्षणाचे फायदे आणि तोटे यांचा विचार केल्यास एक मध्यम पर्याय निघू शकतो तो म्हणजे काही तास ऑनलाईन शिक्षण आणि काही तास खेळ, व्यायाम व कला शिक्षण! नुसतेच ऑनलाईन शिक्षण देताना आपण विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहोत. त्यामुळे सर्वांगिण विकासाचा मुद्दा सर्वप्रथम विचारात घेतला पाहिजे.

इंटरनेट आणि मोबाईलचे विश्व नाकारता येणार नाही. शिक्षणही आता त्यामध्ये जोडले गेले आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी योग्य शिक्षक वर्ग आणि वेळोवेळी शिक्षण तज्ञांचा सल्ला हा डिजिटल शिक्षण प्रकारात उपयुक्त ठरू शकेल.

मोबाईल व संगणकाच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत त्यासाठी डॉक्टर व मानसोपचार तज्ञ हे आरोग्य विषयक काळजी घेण्यात मार्गदर्शक ठरू शकतील. ऑनलाईन शिक्षण हा इथून पुढच्या पिढ्यांसाठी असणारच आहे त्यामुळे नव्या शक्यतांबरोबर नव्या जबाबदाऱ्या देखील सर्वांना समजून घ्याव्या लागतील.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला ऑनलाईन (डिजिटल) शिक्षण (Online Education Marathi Nibandh) हा निबंध कसा वाटला? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

2 thoughts on “ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध | Online Education Marathi Nibandh |”

Leave a Comment