रक्षाबंधन – मराठी निबंध | Raksha Bandhan Essay In Marathi |

बहीण भावाच्या अतूट बंधनाच्या वृद्धीचा सण म्हणजे रक्षाबंधन! रक्षाबंधन हा निबंध (Raksha Bandhan Essay In Marathi) लिहताना विद्यार्थ्यांना त्या सणाबद्दल सर्व प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. रक्षाबंधन सण का साजरा केला जातो, त्या सणाचे महत्त्व आणि संकल्पना, अशा सर्व बाबींची चर्चा या निबंधात करायची असते.

रक्षाबंधन – मराठी निबंध | Raksha Bandhan Marathi Nibandh |

महाराष्ट्रात रक्षाबंधन हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यात येणारा हा सण म्हणजे बहीण आणि भाऊ यांच्या नात्याचे अनमोल प्रतिक आहे. या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातील प्रेम आणि स्नेह वृद्धीस लागते.

रक्षाबंधन सणाला “राखी पौर्णिमा” असेही म्हणतात. या पौर्णिमेला बहीण भावाला आदराची वागणूक देते. ओवाळणी करताना त्याच्या माथी टिळा लावते, हाती राखी बांधते आणि दिप प्रज्वलन केलेल्या ताटाने ओवाळते. भाऊ भेटवस्तू म्हणून बहिणीला तिची आवडती वस्तू देतो.

रक्षाबंधनादिवशी बहीण आणि भाऊ सकाळी लवकर उठून तयार होतात. दोघेही नवीन वस्त्रे परिधान करतात. बहीण ओवाळण्यासाठी ताट तयार करते. त्यामध्ये छोटा दिप, हळदी – कुंकू, तांदूळ, साखर आणि इतर गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवलेले असतात.

स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आक्रमक नसल्याने तिला संरक्षण मिळणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे. एखादा पुरुष लहानपणी भाऊ या नात्याने स्त्रीशी बांधला गेला की बहिणीचे संरक्षण करणे आणि तिच्या जीवनात सहाय्यक ठरणे अशा जबाबदाऱ्या तो पेलू शकतो.

रक्षाबंधन हिंदू संस्कृतीतील एक पवित्र सण आहे. सामाजिक ऐक्य आणि कौटुंबिक स्नेह वाढवण्यासाठी अशा प्रकारचे सण उपयुक्त ठरतात. काहीवेळा सख्खा भाऊ नसलेल्या स्त्रिया कोणा एका ओळखीच्या व्यक्तीला भाऊ मानून त्याची ओवाळणी आयुष्यभर करतात.
 
राखीचा धागा हा वात्सल्य आणि मांगल्याचे प्रतिक आहे. तो दोन जीवांना आयुष्यभर एका सोज्वळ नात्यात बांधून ठेवत असतो. भावाला राखी बांधल्यावर भाऊ आणि बहिणीच्या जीवनात जबाबदारी, प्रेम, करुणा आणि स्नेहयुक्त आदराची जाणीव निर्माण होते.

रक्ताच्या नात्यात अथवा मानलेल्या नात्यात गोडवा निर्माण करणारा रक्षाबंधन हा सण भारतीय परंपरेत मानाचे स्थान ठेवून आहे. स्त्री आणि पुरूषाच्या आयुष्यात सामाजिक ऋणानुबंध टिकवून ठेवण्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

मोबाईल आणि तंत्रज्ञान विकसित झाल्याने रक्षाबंधन या सणाला सध्या ऑनलाईन शुभेच्छा दिल्या जातात. स्टेटस आणि चॅटिंगद्वारे रक्षाबंधन सणाची महती सोशल मीडियावर पसरवली जाते. भविष्यात या सणाची रूपरेखा बदलत जाईल परंतु नात्यातील प्रेम आणि वात्सल्य टिकून राहील, हे मात्र नक्की!

तुम्हाला रक्षाबंधन हा मराठी निबंध (Raksha Bandhan Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment