शिक्षक दिन – मराठी निबंध | Teachers Day Essay In Marathi |

संपूर्ण जगभरात शिक्षक दिन हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. “जागतिक शिक्षक दिन” हा ५ ऑक्टोबर तर भारतात “राष्ट्रीय शिक्षक दिन” हा ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षक दिन कसा साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण देणारा शिक्षक दिन हा निबंध (Teachers Day Essay In Marathi) विद्यार्थ्यांना शालेय जीवनात लिहावा लागतो.

शिक्षक दिन निबंध मराठीमध्ये | Teachers Day Marathi Nibandh |

आई वडीलांनंतर शिक्षकच हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात. विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यामागे शिक्षकांचे खूप मोठे योगदान असते. अशा योगदानाचा आणि शिक्षकांच्या परिश्रमाचा योग्य सन्मान व्हावा म्हणून भारतात प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. ते नेहमी शिक्षणाला महत्त्व देत असत. ते स्वतः एक दार्शनिक आणि उत्तम शिक्षक होते. शिक्षक दिनी त्यांच्या जीवन कर्तुत्वाचा योग्य तो सन्मान केला जातो.

भारतात सर्व शाळांमध्ये आणि इतरही शैक्षणिक क्षेत्रांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. सध्या कार्यरत असणाऱ्या तसेच निवृत्त झालेल्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथायोग्य आदर सत्कार केला जातो. तसेच शिक्षकदिनी विद्यार्थ्यांद्वारे विविध उपक्रम साजरे केले जातात.

कला क्षेत्रातील काही उपक्रम म्हणून रांगोळी, चित्रकला, नृत्य, नाटक स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि विविध खेळांच्या स्पर्धांचे नियोजन सुद्धा केले जाते. वर्गात काही विद्यार्थीच शिक्षक बनून तासिका घेतात आणि दिवसाच्या शेवटी त्यांच्या शिकवणीचे मूल्यांकन केले जाते.

शिक्षकदिनी भाषण आणि निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये एखाद्या मान्यवर व्यक्तीचे सुद्धा भाषण समाविष्ट असते. निबंधाचे आणि भाषणाचे विषय देखील शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असतात. अशा प्रकारे सर्व उपक्रमांतून शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले जातात.

लहानपणी मुलं शिक्षकांकडून सर्व काही आत्मसात करत असतात. त्यांना अक्षर ओळखीपासून ते उदात्त जीवन जगण्याची प्रेरणा देईपर्यंत शिक्षक सहाय्यक ठरतात. त्यांचे व्यक्तिगत आणि सामाजिक भवितव्य निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.

देशातील भविष्यातील पिढी निर्माण करण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. आजची मुले ही साक्षर बनून स्वतःसाठी एक उत्तम काम निवडतात. ते काम योग्यरित्या पार पाडून देशाचा विकासच घडवत असतात. 

अशा प्रकारे नैतिक, वैयक्तिक आणि सामाजिक विकास साधायचा असेल तर मुले शिक्षित होणे फार गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षकांचे कर्तृत्व आणखीनच महत्त्वपूर्ण बनते. शिक्षकांच्या अशा क कर्तुत्वाप्रती आपण सर्वजण नतमस्तक होऊयात आणि शिक्षकदिनी त्यांना सन्मान देऊयात.

तुम्हाला शिक्षक दिन हा मराठी निबंध (Teachers Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment