माझ्या शाळेतील स्वच्छता मोहीम – मराठी निबंध | Swacchata Mohim Nibandh Marathi

प्रस्तुत लेख हा माझ्या शाळेतील स्वच्छता मोहीम (Majhya Shaletil Swacchata Mohim Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. स्वतःच्या शाळेत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे वास्तववादी वर्णन या निबंधात अपेक्षित असते.

माझ्या शाळेतील स्वच्छता मोहीम निबंध मराठी | Majhya Shaletil Swacchata Mohim Nibandh Marathi

मी प्रतिक अनंत भोसले. माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय, शहाजीपूर असे आहे. यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या शाळेत स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा या मोहिमेत सहभाग असल्याने स्वच्छता मोहीम ही माझ्या कायमची आठवणीत राहील अशीच होती.

सर्व शाळेची व आसपासच्या परिसराची स्वच्छता करूनच या वर्षीचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा अशी संकल्पना आमच्या प्राचार्यांनी मांडली. त्या संकल्पनेला सर्वांनी मान्यता दर्शवली. स्वातंत्र्य दिनाअगोदर आठवडाभर तरी शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जावी असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

दररोज एक तास याप्रमाणे सायंकाळची चार ते पाच ही वेळ ठरवण्यात आली. तसेच प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले.  स्वच्छतेची ठिकाणे देखील ठरवली गेली. प्रत्येक गटाने झाडू व स्वच्छतेची इतर साधने शाळेत येताना आणणे सक्तीचे होते. प्रत्येक गटाला एक गटप्रमुख म्हणून शाळेतीलच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

पहिल्याच दिवशी शाळेतील व परिसरातील कचरा गोळा करण्यात आला आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली. काही गट हे शाळेबाहेरील कचरा गोळा करत होते तर काही गट हे शाळेतील व वर्गातील कचरा साफ करत होते. सर्वांनी उत्साहाने काम केल्याने मोहिमेचा पहिलाच दिवस अत्यंत छान व्यतित झाला.

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शाळेचा सर्व परिसर व्यवस्थित वाटेल अशी साफसफाई करण्यात आली. त्यामध्ये काही अनावश्यक झुडुपे समूळ नष्ट करणे, शाळेतील बागेची व मैदानाची स्वच्छता तसेच गवत कापणे इत्यादी कामे करण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी काम केल्यानंतर आम्हाला नाश्ता मिळाल्याने आम्ही अत्यंत खुश होतो.

स्वच्छता मोहिमेच्या चौथ्या दिवशी काही मान्यवरांना आमंत्रित केले गेले. ते सर्व मान्यवर पर्यावरण व स्वच्छता क्षेत्रातील तज्ज्ञ होते. त्यांनी दिलेली स्वच्छता व पर्यावरण विषयक भाषणे ही आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून गेली. आपल्या जीवनात स्वच्छता किती महत्त्वाची आहे याची जाणीव सर्वांना झाली.

स्वच्छता मोहिमेत वृक्ष लागवड हा उपक्रम नव्हता. परंतु चौथ्या दिवशी झालेल्या भाषणानंतर आम्ही तो उपक्रम राबवला. शाळेच्या परिसरात एकूण वीस झाडे लावून आमच्या गटाने सर्वांची प्रशंसा मिळवली. पाचव्या दिवशी केलेल्या कामाने तर विद्यार्थ्यांमध्ये अतिउत्साह संचारला होता. 

सहाव्या व सातव्या दिवशी स्वच्छतेसोबतच स्वातंत्र्यदिनाची तयारी देखील करण्यात आली. शेवटच्या दिवशी स्वच्छता या विषयावर निबंध, भाषण, रांगोळी, समूहगीते व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मी स्वतः निबंध स्पर्धेत सहभागी झालो होतो. “माझी स्वच्छतेची कामे” या विषयावर मी निबंध लेखन केले.

स्वच्छता मोहिम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्वांचे प्रयत्न हे अथक अशा स्वरूपाचे होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व स्वच्छता गटांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याचा अभिमान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

तुम्हाला माझ्या शाळेतील स्वच्छता मोहीम हा मराठी निबंध (Majhya Shaletil Swacchata Mohim Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment