आपला राष्ट्रध्वज तिरंगा – मराठी निबंध | Tiranga Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा आपला राष्ट्रध्वज – तिरंगा (Apla Rashtradhwaj Tiranga Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. तिरंगा झेंड्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व अशा बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध मराठी | Majha Tiranga Majha Abhiman Nibandh Marathi |

तिरंगा हा शब्द सर्वप्रथम मी बालपणी शाळेत ऐकला. त्यानंतर जसजसा मी मोठा होत गेलो तसतसे मला भारतीय तिरंग्याचे महत्त्व समजू लागले. तिरंगा म्हणजेच आपल्या भारत देशाचा प्रतिकात्मक झेंडा होय. या झेंड्याला आपण राष्ट्रीय दिनांवेळी नेहमीच मानवंदना देत असतो.

तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. तो सर्व देशवासियांसाठी अभिमान आहे. देशातील कोणताही नागरिक जेव्हा देशासाठी महत्कार्य करतो, तेव्हा त्याला तिरंग्याने सजवले जाते. त्यामुळे एक मानाचे चिन्ह म्हणून देखील तिरंग्याची ओळख आहे.

प्रत्येक खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व स्वीकारून आपापल्या क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त करतो तेव्हा देखील सर्व प्रेक्षक आणि देशवासिय तिरंगा झेंडा फडकवत असतात. आपल्या देशातील एखादा जवान जेव्हा वीरगतीला प्राप्त होतो तेव्हा सुद्धा त्याला तिरंगा अर्पण केला जातो.

भारत देशाचे अखंडत्व टिकवणारा असा हा तिरंगा झेंडा प्रत्येकाला नवीन ऊर्जा प्रदान करत असतो. तिरंगा हा आकाराने आयताकृती असतो. त्यात प्रामुख्याने केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग असतात. झेंड्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोकचक्र असते.

तिरंगा झेंड्यात सर्वात वर केशरी रंग असतो. तो शौर्य, तप व त्यागाचे प्रतीक आहे. तिरंग्यात मध्यभागी पांढरा रंग असतो. तो शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. तिरंग्यात सर्वात खाली हिरवा रंग आहे. तो समृद्धी व संपन्नता यांचे प्रतीक आहे. मध्यभागी असणाऱ्या निळ्या रंगाच्या अशोकचक्रात चोवीस आरे असतात.

भारत जेव्हा स्वतंत्र होणार होता तेव्हा तिरंग्याचा भारत देशाचा झेंडा म्हणून स्विकार करण्यात आला. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगा ध्वज’ हा भारताचा राष्ट्रीय ध्वज असावा अशी मान्यता देण्यात आली. तेव्हापासून भारताची एकात्मता टिकवण्याचे काम तिरंगा नक्कीच करतो आहे.

भारतीय तिरंगा हा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती यांच्या हस्ते आणि स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांच्या हस्ते फडकवला जातो. संपूर्ण भारतात सर्व प्रकारच्या शैक्षणिक व औद्योगिक संस्थांत तसेच ग्रामपंचायत व इतर सेवाभावी संस्थांत देखील तिरंगा फडकवला जातो.

तिरंगा हा ध्वज भारत देशाच्या एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. आपल्या मनात तिरंगा झेंड्याबद्दल थोडीही अनादराची भावना असू नये. फक्त स्वांतत्र्य आणि प्रजासत्ताक दिनीच तिरंग्याविषयी अभिमान बाळगण्याऐवजी वर्षाच्या प्रत्येक दिवशी आपल्या मनात तिरंग्याप्रती अभिमान असायला हवा.

तुम्हाला आपला राष्ट्रध्वज – तिरंगा हा मराठी निबंध (Apla Rashtradhwaj Tiranga Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment

close