नेतृत्व – मराठी निबंध | Leadership Essay In Marathi

प्रस्तुत लेख हा नेतृत्व या विषयावर आधारित मराठी निबंध (Leadership Essay In Marathi) आहे. नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व हा गुण कसा विकसित होऊ शकतो, या बाबींची चर्चा या निबंधात करण्यात आलेली आहे. हा निबंध लिहताना अतिशयोक्ती करू नये, अतिशय सूचक आणि मुद्देसूद वर्णन असावे.

नेतृत्वगुण निबंध मराठी | Netrutva Nibandh Marathi |

प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व हा गुण नेहमीच महत्त्वाचा मानला गेला आहे. आजपर्यंतच्या मानवी इतिहासात ज्या ज्या लोकांनी आपली विधायक छाप सोडलेली आहे ते नक्कीच महान होते. अशा लोकांनीच वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडवून आणलेला आहे. त्यांच्या अंगीच नेतृत्व हा गुण असल्याचे दिसून येते.

पूर्वीच्या काळी राजे – महाराजे, योद्धे, साधू – संत तसेच मागील काही दशकांत नेते, खेळाडू आणि समाजसुधारक होऊन गेले त्यापैकी किती जणांच्या अंगी नेतृत्व हा गुण होता, याचा आपल्याला विचार करावा लागेल. नेतृत्व हे समस्या सोडवणारे असते. प्रत्येक प्रकारच्या संकटांना सामोरे जात गरजेनुसार सामाजिक बदल घडवून आणत असते.

आपण सध्या पाहतो की कला – क्रीडा आणि राजकारण क्षेत्रात वंशपरंपरागत नेतृत्व मिळत जाते. परंतु त्याचा परिणाम सामाजिक मनावर होत नाही. समाज अशा नेतृत्वाचा स्वीकार खूप जड अंतःकरणाने करत असतो आणि काळाच्या ओघात असे पिढीजात नेतृत्व हरवून देखील जाते.

नेतृत्व हा गुण विकसित करायचा असल्यास सुरुवातीला स्वतःच्या समस्या सोडवाव्या लागतील. शारिरीक अथवा मानसिक क्षमतेचा विकास करावा लागेल. त्यानंतरच स्वतःवर असा विश्वास निर्माण होत जातो जो अढळ असतो. अशा व्यक्तीतच मग इतर लोक नेतृत्व पाहत असतात.

नेतृत्व हे जागरूकतेने आणि इतरांप्रती सद्भावना जोपासून निर्माण होत असते. वास्तविक परिस्थितीचा आणि संकटांचा योग्यरित्या सामना करून नेतृत्वगुण विकसित होऊ शकतो. स्वतःचे अनुभव इतर व्यक्तींतही बाणवण्याचा प्रयत्न नेतृत्वशाली व्यक्ती करत असते त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यात सुध्दा यश प्राप्त होत असते.

नेतृत्वशाली व्यक्ती व्यक्तिगत स्तरावर विकास करत असतोच शिवाय फक्त स्वार्थासाठी काम न करता इतरांच्याही पंखांना बळ देण्याचे काम करत असतो. लोकहिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात अशी व्यक्ती यशस्वी होत असते. त्यामुळे समाज स्वतःहून अशा व्यक्तीस नेतृत्व सोपवत असतो.

कौशल्य, निर्णयक्षमता व कृतीशीलता अशा गुणांनी युक्त असणारा व्यक्ती नेतृत्व करण्याचे सामर्थ्य बाळगतो. ज्या क्षेत्रातील नेतृत्व मिळणार आहे त्या क्षेत्रातील कौशल्य असणे ही तर मूलभूत बाब आहे. त्याशिवाय व्यक्तीने घेतलेले निर्णय आणि त्यानंतर केलेली कृती या दोन बाबी किती यशस्वी ठरलेल्या आहेत याचीही पारख नेतृत्व मिळताना होत असते.

नेतृत्व मिळाल्यावर विरोध होतच असतो शिवाय विपरीत परिस्थिती देखील उद्भवत असते परंतु त्यामुळे नेतृत्व डगमगता कामा नये. शांत, संयमी आणि प्रभावशाली नेतृत्वाचा विकास हा संकटसमयीच होत असतो. जेवढे मोठे संकट तेवढीच व्यक्तिमत्त्वाला धार येत असते. अशा प्रकारचा नेतृत्वशाली व्यक्ती मग सामान्य राहूनही असामान्य कर्तुत्व करून दाखवतो.

तुम्हाला नेतृत्व हा मराठी निबंध (Leadership Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment