वर्तमानपत्राचे महत्त्व – मराठी निबंध | Newspaper Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा वर्तमानपत्राचे महत्त्व (Importance of Newspaper Essay In Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात वर्तमानपत्राचे फायदे, तोटे आणि महत्त्व अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आलेली आहे.

सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात काय काय घडामोडी चालू आहेत त्याबद्दल जाणून घेणे हे प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे प्रत्येकजण वर्तमानपत्र वाचणे पसंद करतो. अशा आशयाच्या मुद्द्यांचा विस्तार विद्यार्थ्यांनी या निबंधात करायचा असतो.

वर्तमानपत्र निबंध मराठी | Vartamanpatra Nibandh Marathi |

वर्तमानपत्र हा शब्द जरी ऐकला तरी मला प्रत्येक दिवसाची सुंदर वाचनीय सकाळ आठवते. लहानपणापासून आमच्या घरी वर्तमानपत्र येत असल्याने त्याचे वाचन करणे ही नित्यनेमाची सवयच झालेली आहे. वर्तमानपत्रातून आपल्याला जगभरातील चालू घडामोडी लगेच समजत असतात.

जेव्हा यांत्रिक आणि औद्योगिक विकास सुरू झाला, तेव्हा छपाईयंत्रे देखील निर्माण करण्यात आली. छपाई यंत्रामुळे सर्व शाब्दिक माहिती कागदावर छापू जाऊ लागली. त्यानंतर छपाई यंत्रांमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. आता तर वर्तमान पत्रात रंगबेरंगी शब्द आणि चित्रांचा सुद्धा समावेश असतो.

पत्रकार आणि प्रबोधनकार अगदी सुरुवातीला स्वतःची हस्तलिखित पाने छापून प्रसिद्ध करत असत. त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण वाढू लागल्याने माणूस वाचू लागला. त्यामुळे सामाजिक घडामोडी आणि ताज्या बातम्या जाणून घेणे सर्वांना महत्त्वाचे वाटू लागले. त्यातूनच वर्तमानपत्र वाचनाची गरज आणि सवय निर्माण झाली.

वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला राजकारण, कृषी, कला – क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, शिक्षण आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांतील माहिती सहज मिळते. तसेच सामाजिक पातळीवर निर्माण झालेल्या अडचणी आणि गरजा समजतात. त्यामुळे वर्तमानपत्र नियमित वाचल्याने आपल्याला समाजमन आणि सामाजिक व्यवस्था समजते.

समाजातील प्रत्येक वयोगटातील लोकांना वर्तमानपत्र वाचणे फायदेशीर ठरते. वर्तमानपत्रांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात उपयोग होतो, तरुण पिढीला जगण्याची प्रेरणा मिळते तर वृद्ध व्यक्तींना जीवनाचे सार मिळत असते. वर्तमानपत्र वाचनातून आपली चौकस बुद्धी विकसित होते. जीवन आणि समाजाविषयी आपले विशिष्ट मत तयार होते.

विशिष्ट मत तयार झाल्याने जगण्याची पद्धत आणि दिशा समजत जाते. काही वर्तमानपत्रांतून मात्र फक्त आणि फक्त नकारात्मकता पसरवली जात असते. राजकारण आणि गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडी वारंवार ठळक करून सांगितल्या जातात. त्यामुळे समाजात वैमनस्य पसरण्यास मदत होते.

वर्तमानपत्र हे समाजावर विधायक परिणाम घडवून आणणारे माध्यम असले पाहिजे तर आणि तरच आपण एका आनंदी समाजाची अपेक्षा करू शकतो. जर तसे घडले नाही तर वर्तमानपत्र वाचनातून फक्त समाजात कलह आणि शत्रुता वाढत जाईल. ज्याचा परिणाम पुन्हा एकदा गुन्हेगारी स्वरूपात जाणवत राहील.

सध्या आपण तंत्रज्ञान युगात जगत असल्याने मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सहज उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या बातम्या डिजिटल स्वरूपात वाचायला मिळत आहेत. नामांकित वर्तमानपत्रे ही ऍप्स आणि वेबसाईट स्वरूपात आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसत आहेत.

वर्तमानपत्रे कागदी स्वरूपात असो की डिजिटल स्वरूपात, चालू घडामोडी जाणून घेणे हाच समाजमनाचा उद्देश्य राहिलेला आहे. त्यामुळे वर्तमानपत्राचे महत्त्व हे कधीच कमी होणार नाही कारण वाचन करणे आणि समजून घेणे हे मानवी बुद्धीचे प्राथमिक लक्षण आहे.

तुम्हाला वर्तमानपत्राचे महत्त्व हा मराठी निबंध (Importance of Newspaper Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment