फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण – मराठी निबंध | Pollution Due to Firecrackers Essay |

प्रस्तुत लेख हा फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण (Fatakyanmule honare pradushan nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. फटाके वाजवणे ही अत्यंत मजेशीर कृती आहे परंतु फटाक्यांची आतषबाजी ही अतिप्रमाणात झाली तर मात्र प्रदुषण होत असते, याचेच विस्तृत वर्णन या निबंधात करण्यात आलेले आहे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण – मराठी निबंध | Pollution due to Firecrackers Essay In Marathi |

सध्या लोकसंख्या वाढीमुळे कोणताही सण – उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. दिवाळी देखील त्यापैकीच एक सण आहे जो अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्यावेळी वाजवले जाणारे फटाके हे एकाच वेळी वातावरणात प्रदुषण निर्माण करत असतात.

फटाके फोडायला सर्वांनाच आवडतात. दिवाळी व्यतिरिक्त इतर शुभकार्य प्रसंगी जसे की लग्नकार्य, वाढदिवस, मिरवणूक, जयंती, यात्रा अशा अनेक प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी होत असते. फटाके फोडले गेल्याने प्रामुख्याने हवा आणि ध्वनी प्रदुषण होत असते.

फटाके बनवण्यासाठी जे रासायनिक घटक वापरले जातात ते फुटल्यावर एक कर्णकर्कश आवाज होत असतो आणि त्यामधून विशिष्ट गंध असलेला धूर बाहेर पडतो. हा रासायनिक धूर शुद्ध वातावरणासाठी घातक ठरत असतो. तसेच नाकावाटे तो धूर आपल्या शरीरात देखील प्रवेश करू शकतो.

फटाके हे नायट्रेट, चारकोल आणि सल्फर या रासायनिक घटकांपासून तयार केले जातात. जेव्हा फटाक्याची वात पेटवली जाते, तेव्हा ती जळत जाऊन रासायनिक घटकांचा स्फोट होत असतो. त्या स्फोटातून नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड व पोटॅशिअम सल्फाईड हे प्रदुषण करणारे हानिकारक घटक बाहेर पडतात.

फटाके फोडणे ही मानवासाठी अत्यंत आनंददायी बाब असली तरी पाळीव जनावरे, इतर पशू – पक्षी व छोटे सजीव यांना त्याचा त्रास जाणवतो. फटाक्यांच्या आवाजाने ते घाबरतात. पशू – पक्षी हे अत्यंत संवेदनशील असल्याने फटाक्यांचा आवाज व धूर हा त्यांना नकोसा वाटतो.

लहान मुले फटाके वाजवल्यावर अत्यंत आनंदी होत असतात. त्यांच्यासाठी फटाके फोडणे हे एक साहसी कृत्य असते. मुलांनी फटाके वाजवणे व आनंद साजरा करणे हे अगदी साहजिक कृत्य आहे. पालकांनी हानिकारक नसलेले फटाके अल्प प्रमाणात विकत घेऊन दिले तर मुलेही प्रमाणात फटाके वाजवतील आणि आनंदी होतील.

सुजाण व्यक्ती जेव्हा मोठ्या प्रमाणात फटाके वाजवतात तेव्हा ते अतिप्रमाणात असतात. लांबच लांब फटाक्यांच्या माळा, कर्णकर्कश बॉम्ब, आकाशात फुटणारे फटाके असे आवाज आणि धूर निर्माण करणारे फटाके लोकांनी जाणूनबुजून वाजवले तर मात्र प्रदुषण होणे हे निश्चितच असते.

फटाके हे काही प्रमाणात का होईना पण निसर्ग व आरोग्यासाठी बाधा निर्माण करतात. त्यामुळे मोठ्या लोकांनी जागरूकता ठेवून फटाके अतिप्रमाणात न वाजवणे व लहान मुलांना धोकादायक नसलेले फटाके वाजवू देणे हीच सर्वांसाठी हितकारक व आनंददायी बाब असेल.

तुम्हाला फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण हा मराठी निबंध (Fatakyanmule honare Pradushan Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment