एका जखमी सैनिकाचे मनोगत – मराठी निबंध | Jakhmi Sainikache Manogat Nibandh |

प्रस्तुत लेख हा एका जखमी सैनिकाचे मनोगत (Jakhmi Sainikache Manogat Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात एका चकमकीत जखमी झालेल्या सैनिकाचे अनुभव आणि त्यानंतर त्याला वाटणारा सार्थ अभिमान व्यक्त करण्यात आलेला आहे.

एका जखमी सैनिकाचे मनोगत निबंध मराठी | Jakhami Sainikache Manogat Essay In Marathi |

मी भरत केशव जाधव. भारतीय आर्मीत पाच वर्षांपूर्वी माझी निवड झाली होती. तेव्हापासून मला माझ्या अद्भुत आणि अभूतपूर्व जीवनाचा नेहमीच अभिमान वाटतो. परंतु दोन महिन्यांपूर्वी सीमेवर कार्यरत असताना शत्रुंसोबत झालेल्या चकमकीत मी जखमी झालो आणि माझ्या जीवनाला थोडीशी कलाटणी मिळाली.

तो प्रसंग आठवला की माझी छाती आजही अभिमानाने भरून येते. सायंकाळची वेळ होती. आमच्या सैन्याच्या तुकडीशेजारी असलेल्या झाडीतून मला काहीतरी सरकल्यासारखे जाणवले. मी आहे त्याच ठिकाणी खाली झोपलो. त्याक्षणी परकीय शत्रू चाल करून आलेले आहेत याची मला जाणीव झालेली होती.

आमच्या दलातील कोणालाही संपर्क साधणे शक्य नव्हते कारण शत्रू खूप कमी अंतरावर येऊन पोहचले होते. शत्रूंची संख्या एकूण पाच होती. त्यांच्यासोबत बंदुका आणि काही पिशव्या होत्या. ते माझ्या दृष्टिक्षेपात येताच मी सर्वप्रथम हवेत गोळीबार केला आणि आमच्या सैन्याला सावध केले.

मी आता लांबूनच त्यांचा प्रतिकार करत होतो. प्रतिकार करत असताना एक गोळी माझ्या पायाला लागली. मी कोसळलो. तोपर्यंत आमची पूर्ण सैन्य तुकडी तेथे आली होती. बंदुकांचा प्रतिकार सहन करूनही आम्हाला शत्रूंना पकडण्यात यश मिळाले होते. माझ्यासोबत इतर दोन जवान देखील जखमी झाले होते.

वैद्यकीय मदत लगेच उपलब्ध झाल्याने आम्हाला कोणताही मोठा धोका निर्माण झाला नाही. त्यानंतर पंधरा दिवस उपचारानंतर आम्हाला सोडण्यात आले. आता जेमतेम तीन महिन्यांच्या विश्रांतीची गरज असल्याने मला घरी येण्याची परवानगी मिळाली होती.

आम्ही शत्रूंचा खूप मोठा कट उध्वस्त करण्यात यशस्वी झालो होतो, याची माहिती मला घरी आल्यानंतर मिळाली. मला माझ्या कृत्याचा खूपच अभिमान वाटला. त्या अवघड प्रसंगी दाखवलेल्या हजरजबाबी वृत्तीमुळे सर्व क्षेत्रांतील अनेक मान्यवर लोकांनी माझे कौतुक केले.

विश्रांतीचे तीन महिने कसे व्यतित होतील याकडेच आता माझे संपूर्ण लक्ष लागून राहिलेले आहे. मी सध्या कुटुंबासोबत असल्याने माझी काळजी सर्वजण घेतच आहेत. माझ्या शरीरावरील इतर साधारण जखमा भरून निघालेल्या आहेत परंतु पायाची जखम मात्र भरून येण्यास वेळ लागत आहे.

विश्रांतीच्या काळात माझी मानसिक व शारिरीक स्थिती थोडीशी खालावली असल्याने मेहनतीचे काम करताना थोडासा त्रास जाणवतो. सध्या मी हळूहळू व्यायाम व हालचाल सुरू केलेली आहे. जखमी असलो तरीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे माझी देशसेवेची जिद्द काही कमी झालेली नाहीये.

तुम्हाला एका जखमी सैनिकाचे मनोगत हा मराठी निबंध (Jakhmi Sainikache Manogat Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment

close