छगन भुजबळांची होऊ शकते “घर वापसी”, पक्षात घेण्याबाबत मात्र शिवसेनेत दोन मतप्रवाह…

कॉंग्रेस आणि एनसीपीचे नेते एक-एक करून पार्टी सोडून जात असताना अजून एक नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि ते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ. बहुतेक सर्व नेते भाजप मध्ये जात असताना भुजबळ मात्र घरवापसी करण्यास उत्सुक असल्याचे कळते.

छगन भुजबळांसह अजून काही नेते शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश झालाच तर तो विधान सभा निवडणुकीच्या आधी होऊ शकतो. तथापि, भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ म्हणाले की, “हे सर्व मला प्रसारमाध्यमांद्वारे समजत आहे” अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु भुजबळांच्या एका निकटवर्तीयाने शिवसेना नेत्यांसोबत या विषयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

दुसर्‍या बाजूला, भुजबळांसोबत सुनील तटकरे यांचाही शिवसेनेत लवकरच समावेश होईल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच जर असे घडून आले तर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असू शकतो हे नक्की. दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना सांगितले कि, योग्य वेळ आल्यावर आपण यावर निर्णय घेऊ, कोणत्याही नेत्यांपेक्षा पक्ष मोठा असतो आणि यावर निर्णय घेण्याआधी पक्षाशी चर्चा केली जाईल.

बघायला गेलं तर यावेळी बहुतेक प्रवेश भाजपा मध्ये झाले असताना भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेनेसाठी फायद्याचा ठरू शकतो कारण शिवसेनेकडे ओबीसी चा कोणताही मोठा चेहरा नाही. परंतु भुजबळांना पार्टीत घेऊ नये या मताचा देखील एक मोठा वर्ग शिवसेनेत आहे. स्वर्गीय बाळासाहेबांना ज्या व्यक्तीने त्रास दिला त्याव्यक्तीला शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा आवाज शिवसेनेत उठत आहे. म्हणजेच भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश फायद्यासोबत डोकेदुखी सुद्धा ठरू शकतो.

छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या काही नेत्यांत याविषयी चर्चा झाल्याचे कळते. जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर छगन भुजबळ काही नेत्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील. याचाच अर्थ लवकरच भुजबळांची घरवापसी होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर शिवसेना यावर कोणती भूमिका घेतं, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसेनेत येण्यासाठी राज्यातील नेते उत्सुक

Leave a Comment