Adulsa Information in Marathi | अडुळसा माहिती मराठीमध्ये!

अडुळसा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही अ‍ॅकँथेसी कुलातील सदाहरित वनस्पती आहे. आशिया खंडातील भारत, मलेशिया, श्रीलंका आणि म्यानमार या देशात ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर या वनस्पतीची शेती केली जाते. अडुळसा वनस्पतीची उंची सुमारे अडीच मीटर एवढी जास्तीत जास्त असू शकते.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करण्याचे तंत्रज्ञान होते. यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग मोठा होता. त्यांचा विविध प्रकारे उपयोग करून शरीरातील पाच तत्वे आणि तीन दोष नियंत्रणात आणली जाऊ शकतात याचे संपूर्ण विश्लेषण आयुर्वेदात आहे. जसजसे आपण आधुनिक होत आहोत त्याप्रमाणे रोगांची संख्या वाढत आहे. अशा सर्व रोगांचे समाधान आयुर्वेदात आहे तसेच अडुळसा ही वनस्पती बहुगुणी समजली गेली आहे. खोकला, दमा, श्वसन विकार या विकारांत प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

अडुळसा वनस्पती आपण सहज ओळखू शकतो. महाराष्ट्रात हिला अडुळसा, अडुसा, वासा, वसाका या नावांनी ओळखले जाते तसेच या वनस्पतीची पाने साधी आणि लांबट असतात. अडुळसा हा जास्त करून उत्पादित आहे तसेच कुठेतरी पडीक जागेतसुद्धा उगवलेला दिसून येतो. या वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फळ आणि फुल या सर्वांचा आयुर्वेदिक औषधीमध्ये उपयोग केला जातो. या वनस्पतीची फुले ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात येतात. फुले पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. फळ लांबट आणि टोकदार असते. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात.

अडुळसा – औषधी उपयोग

• प्रत्येक प्रकारच्या श्वसन समस्येवर उपाय म्हणून वापरले जाते.

• कफ, दमा, खोकला या आजारांत गुणकारी.

• खूप प्राचीन काळापासून आयुर्वेदात देखील या वनस्पतीचा औषधी संदर्भ आढळतो. या वनस्पतीच्या औषधी प्रक्रियेद्वारे अनेक दुर्धर रोग बरे होऊ शकतात. औषध चवीला कडू आणि उष्णताशमन करणारे असते.

• अडुळश्याच्या पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो.

• हृदयविकाराचा जर त्रास असेल तर अडुळशाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

• उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर या रोगांमध्ये देखील लाभदायक असे औषध आहे.

• तसेच रक्तशुद्धी करण्याचे काम अडुळसा करतो. याव्यतिरिक्त आयुर्वेदातील संदर्भानुसार कुष्ठरोग, दमा, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, मुखरोग या आजारांमध्ये ही वनस्पती उपयोगी आहे.

• या वनस्पतीची मुळे मुत्रविकार, खोकला, पित्त त्रास, नेत्रविकार आणि ताप या आजारांमध्ये गुणकारी आहेत.

• फुले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळे लागणे आणि कावीळ या आजारांमध्ये या वनस्पतीच्या फुलांचा वापर करू शकतो.

• स्वदेशी बनावटीचे खोकला किंवा दम्यावरचे आयुर्वेदिक औषध जर तुम्ही विकत घेतले तर हमखास तुम्हाला त्यामध्ये अडुळसा आढळेल.

• तसेच श्वासनलिकेचा दाहदेखील याच्या सेवनाने कमी होतो. त्यासाठी पानांचा रस आले आणि मधातून घ्यावा लागतो. हाच रस अतिसार, हिवताप आणि आमांशात वापरतात.

• वाळवलेल्या पानांचा उपयोग दम्यात होतो. वाळवलेली पाने बारीक करून सिगारेटप्रमाणे कागदात गुंडाळून ओढतात.

• जखमेची किंवा मुक्या माराची सूज असल्यास याच्या पानाचा आणि मुळांचा लेप तयार करून लावतात. सूज लवकर कमी होते.

Leave a Comment