मराठी निबंध – वायूप्रदूषण | Air Pollution Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा वायू प्रदूषण (Air Pollution Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. वायू प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि उपाय अशा बाबींची चर्चा या निबंधात करायची असते. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा हा निबंध…

वायुप्रदूषण (हवा प्रदूषण) – एक गंभीर समस्या | Vayu Pradushan Marathi Nibandh |

आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झालेले आहे. त्यातच लोकसंख्या वाढ आणि भौतिक सुविधांचा वापर देखील वाढलेला आहे. परिणाम स्वरूप जलप्रदूषण, वायूप्रदूषण, आणि ध्वनिप्रदूषण वाढेलेले आहे. त्यातील वायूप्रदूषण मानवास अत्यंत धोकादायक ठरत आहे.

वायूप्रदूषण म्हणजे हवेची दूषित स्थिती! मानवी लोकसंख्या वाढ ही भौतिक संसाधनाच्या वाढीव वापरास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अशा संसाधनांचा वापर आणि निर्मिती हे हवेचे प्रदूषण घडवून आणत आहे. त्याचा परिणाम म्हणून नैसर्गिक हवा आणि पर्यावरण आज दूषित झालेले आहे.

वायूप्रदूषण घडण्यामागे विविध कारणे सांगता येतील. प्रथमतः औद्योगिक कारणे पाहुयात. मोठमोठे कारखाने आणि उद्योग यामध्ये ज्या रासायनिक प्रकिया होत असतात, त्यातून विषारी वायू बाहेर पडतात. ते खुल्या हवेत मिसळतात आणि हवा दूषित करतात.

वायूप्रदूषण हे वैयक्तिक स्तरावर देखील घडत असते. त्यामध्ये विविध प्रकारच्या वाहनांचा वापर समाविष्ट आहे. आज दळणवळण आणि प्रवास वाढल्याने वाहनांचा वापर अति प्रमाणात होत आहे. उद्योग वाढल्याने मालाची वाहतूक करणे, प्रवासासाठी खाजगी वाहन वापरणे, अशा बाबी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत.

उद्योगधंदे किंवा वाहनांचा वापर यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यातून बाहेर पडणारे विषारी वायू हे मानवी आरोग्य आणि पर्यावरण बिघडवत आहेत. सध्या शहरी भागात होणारे प्रदूषण पाहता तेथे स्वच्छ हवा मिळणे अशक्य झालेले आहे.

मानवास निरोगी राहण्यासाठी हवेतील ऑक्सिजन श्वासावाटे शरीरात जाणे आवश्यक आहे. परंतु प्रदूषित भागात कार्बनयुक्त विषारी वायू शरीरात जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून श्वसनाचे आजार वाढलेले आहेत. तसेच वायू प्रदूषणामुळे विषारी वायू ढगात मिसळले जाऊन आम्लपर्जन्य देखील होत आहे.

डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच विविध त्वचा विकार जडणे, असे काही वायू प्रदूषणाचे परिणाम आपल्याला जाणवत आहेत. म्हणजेच मानवी आरोग्य नक्कीच धोक्यात आलेले आहे. त्यावर उपाय म्हणून आपण वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर काही नियम नक्कीच पाळू शकतो ज्यामुळे वायूप्रदूषण आटोक्यात येऊ शकेल.

शहरी भागात वाहनांचा गरजेपुरता वापर करणे तसेच प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर टाळणे, जवळच्या ठिकाणी पायी चालत जाणे अथवा सायकल वापरणे, औद्योगिक वसाहत निर्मिती शहरापासून दूर करणे, असे काही उपाय असू शकतील ज्याद्वारे वायूप्रदूषण कमी होऊ शकेल.

प्रत्येक प्रकारचे वाहन आणि उद्योग यांवर काही पर्यावरण पूरक नियम आणि कायदे असायला हवेत. ते नियम वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर पाळले जाणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सद्यस्थितीत आणि भविष्यात सुद्धा वायूप्रदूषण हे मानवासाठी कधीच हितावह असणार नाही.

तुम्हाला वायूप्रदूषण हा मराठी निबंध (Air Pollution Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment