केल्याने होत आहे रे – मराठी निबंध | Kelyane hot aahe re essay in marathi

प्रयत्न करणे सर्वांच्या हाती असते. असे कोणतेच कार्य नसेल जे अथक प्रयत्नांनी शक्य होणार नाही. कर्माचे आणि प्रयत्नांचे महत्त्व लहानपणीच विद्यार्थ्यांना समजण्यासाठी “केल्याने होत आहे रे..” किंवा ” प्रयत्न हाच परमेश्वर” या विषयावर निबंध लिहायला लावतात.

विद्यार्थ्यांना निबंध लिहताना मुद्देसूद रचना करावी लागेल. निबंध वैचारिक असल्याने लिहताना वाहवत जाणे अपेक्षित नाही. एका मुद्द्याला धरून ठेवून त्यावर थोडासा विस्तार करावा लागेल. खालील निबंध हा एक नमुना आहे. त्यादृष्टीने तुम्ही तुमचे मुद्देही मांडू शकता. चला तर मग पाहूया हा निबंध !

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ! मराठी निबंध ! Kelyane hot ahe re – marathi nibandh

आळस झटकून देऊन कामाला लागा मग तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत एकदिवस नक्कीच पोहचाल. असा विचार जर सत्यात उतरवायचा असेल तर प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! असे समर्थ रामदासांचे कटू वाटणारे पण तितकेच खरे शब्द प्रत्येकाला कर्माची प्रेरणा देऊन जातात.

वयाच्या उत्तरोत्तर जर कर्म करीत राहिलात तर एक दिवस कर्म हे बंधन न राहता जीवनाचा आवश्यक भाग होऊन जातो. असे कर्म आणि प्रयत्न हेच आपले देव बनतात. मानवी जीवनात कष्टाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची परिणीती आजच्या जीवनात होताना दिसत नाही परंतु तेच सत्य आहे.

आळसात आणि उन्मादात जीवन व्यतित करणे हे भविष्यात किती कष्टदायक असू शकते याचा नमुना तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांत पाहू शकता. जीवनभर कष्ट करण्याची तयारी न दाखवता पडून राहणे ज्यांना आवडते ते उतारवयात नरकयातना भोगत असतात.

फक्त शरीराचा विचार केल्यास कर्म हे कष्ट व व्यायाम या स्वरूपात ध्यानात घेतले पाहिजे मात्र कर्म करताना येणाऱ्या अडचणी आणि अडथळे ओळखून त्यावर मात करीत चांगल्या कामाला सुरुवात करणे हेच अनेकवेळा अपेक्षित असते. सुरुवातच काही जणांना कष्टप्रद वाटल्याने काहीजण कामच हातात घेत नाहीत मग ते पूर्ण कसे काय होईल?

केल्याने होत आहे रे, म्हणजे सुरुवातीला प्रत्येकाला प्रेरणेची आवश्यकता भासत असते. त्यामुळे समर्थ रामदास इथे असे म्हणतात की आधी करून तर बघ, अशक्य असे मग काहीच नाही. लोक स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगत नसल्याने काम करताना काचकुच करीत राहतात त्यांच्यासाठी हा विचार अनमोल ठरू शकतो.

आज विज्ञानाची प्रगती ही संपूर्णपणे प्रयत्नांवर अवलंबून आहे. जेवढे प्रयत्न मानवी जीवन सुखी बनवण्यासाठी केले गेले आहेत त्यामध्ये या शतकात सर्वस्वी तंत्रज्ञान वापरले गेले आहे. विज्ञानाची आस हे मागील पिढीतले प्रयत्न आहेत. माणूस आज प्रयत्नांमुळे चंद्र आणि मंगळावरही जाऊन आलेला आहे.

स्वतःचे हित घडवून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येक पिढीत आणि प्रत्येक मानवात आहेच मात्र त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी. समर्थ रामदास याबाबतीत हाच विचार मांडतात. त्यांचा भर प्रयत्नांवर असलेला दिसून येतो.

अनेक संत, महापुरुष हे प्रयत्नांनी महान बनू शकले. शास्त्रज्ञ, लेखक, कलाकार, खेळाडू हे तर प्रयत्न केल्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाहीत. आजचे सुखमय जीवन हे अनेक लोकांच्या प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे आपले जीवन उदात्त बनवण्यासाठी आणि उत्तम प्रकारे जगण्यासाठी प्रयत्नांची आस धरा.

स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांना नावे ठेवतो. काम न होण्याबद्दल त्यांना दोषी ठरवतो. अशावेळी स्वतःचा आळस पाहणे हेदेखील आवश्यक आहे. यश प्राप्त करण्यासाठी, दुनियेत उत्तुंग काही करून दाखवण्यासाठी आधी कृती करायला सुरुवात करा आणि मनात हा विचार रुजवा,”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!”

Leave a Comment