प्रस्तुत लेख हा मैत्री (Friendship Essay In Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात मैत्री विषयी सर्व संकल्पना जसे की मैत्रीचे महत्त्व, गरज, फायदे आणि उपयोग अशा बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.
मैत्री निबंध मराठी | Maitri Marathi Nibandh |
मैत्री म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर मैत्री केल्याशिवाय आणि ती टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांशिवाय जाणून घेता येत नाही. मैत्री ही एक प्रकारे साधनाच आहे. जीवनातील आपल्या अनुभवांवरून आणि गरजेनुसार इतर कोणत्याही व्यक्तीला आपलेसे करून घेणे आणि समजून घेणे म्हणजे मैत्री!
मैत्री ही एखादे नाते सांभाळण्यासारखीच असते. नाते टिकावे म्हणून आपण आपल्या गरजा, उपयोग, भावना अशा बाबी दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडतो त्याच पद्धतीने मैत्री साधण्यासाठी देखील आपल्याला मेहनत घ्यावीच लागते. सुरुवातीला मात्र मैत्री ही सवयीनुसार आणि एकमेकांतील गुणांनुसार जुळली जाते.
मैत्रीमध्ये आपले वागणे, बोलणे आणि साहचर्य कसे आहे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपण स्वतःशीच प्रामाणिक नसलो तर आपण मैत्री देखील निभावू शकणार नाही. त्यामुळे मैत्री करण्याचा उद्देश्य हा थोडा उदात्त असणे गरजेचे आहे. आपण आपल्या फायद्यासाठी इतरांना सोबत न ठेवता जीवनात आनंद निर्माण व्हावा म्हणून मैत्री करायला हवी.
जीवनातील सुख – दुःखाच्या प्रसंगी मैत्रीचे नाते खूप उपयोगी ठरते. आपल्यासोबत खरे मित्र – मैत्रिण असल्याने त्यांचा आपल्या आनंदात सहभाग असतो आणि आपणही त्यांच्या आनंदात सोबती असतो. आयुष्यातील काही कटू प्रसंगात आपण पालकांची मदत न घेता मित्रांकडेच आशेच्या नजरेने पाहत असतो.
लहानपणापासून आपले मित्र नियमित बदलत गेलेले असतात. जसे आपण संस्कारित होत असतो, जशा आपल्याला सवयी असतात त्याचप्रमाणे आपण मित्र निवडत असतो. म्हणजेच आपल्यासारखेच आपले मित्र असतात. त्यामुळे आपल्या सर्व भावना आणि विचार यांना आपले मित्र योग्य पद्धतीने समजून घेऊ शकतात.
मनुष्याला स्वतःच्या भावनिक, मानसिक आणि शारिरीक गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी तो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणावर तरी विश्वास ठेवतच असतो. त्यामुळे गरजेनुसार इतर व्यक्तींसोबत मैत्रीचे नाते जोडले आणि टिकवले जाते.
आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आपण जर सर्वांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण करू शकलो तर आपले जीवन आनंदमय होऊन जाईल. आपल्या व्यर्थ अपेक्षा आपण कोणावर लादणार नाही शिवाय नात्यात आपण फक्त उपयोग पाहणार नाही तर वास्तविकपणे आपुलकी, काळजी आणि प्रेम आपल्या जीवनात उतरेल.
निःस्वार्थपणा, कृतज्ञता, आदर आणि एकमेकांची गरज अशा बाबी समजून घेतल्या की मैत्री फुलायला वेळ लागत नाही. त्यामुळे संकुचित विचारशैली आणि जीवनपध्दती न बाळगता थोडे उदात्त जीवनाचे स्वप्न ठेवून आपण आपल्यासाठी मैत्री हा गुण नक्कीच जोपासायला सुरुवात करू शकतो.
तुम्हाला मैत्री हा मराठी निबंध (Friendship Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…