फुले बोलू लागली तर – मराठी निबंध | Phule Bolu Lagli Tar Nibandh

प्रस्तुत लेख हा फुले बोलू लागली तर (Phule Bolu Lagli Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. माणसाप्रमाणे जर फुले देखील एखादी भाषा बोलू लागली तर काय होईल? अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात केलेले आहे.

फुले बोलू लागली तर…

मी कधीकधी वाचन करण्यासाठी बागेत जात असतो. बागेत अनेक फुलझाडे आहेत. वाचन झाल्यानंतर त्यांचे निरीक्षण करणे मला खूप आवडते. निरीक्षण करताना कधीकधी मी फुलांशी संवाद साधण्याचा अभिनय देखील करतो. त्यावेळी नेहमीच मला एक विचार मनात येत असतो तो म्हणजे जर फुले खरोखर बोलू लागली तर…

फुले बोलू लागली तर किती मज्जा येईल! आपल्याला आवडणाऱ्या फुलांशी आपण संवाद साधू शकू. फुलांजवळ आपण आपले मन मोकळे करू आणि फुलेदेखील त्यांचे विचार व भावना आपल्याजवळ व्यक्त करतील. अशा नियमित संवादाने फुले आणि मनुष्य एकमेकांशी जवळीक साधू शकतील.

फुले बोलू लागल्यानंतर त्यांना अस्तित्वाची जाणीव होत राहील. त्यांना जिवंत असल्याचा अनुभव विचारांनी येत राहील. फुलांचा विकास हा विशिष्ट पद्धतीने होईल ज्यामध्ये त्यांचे संरक्षण देखील ते करू शकतील. फुलांमध्ये स्मृती आणि कल्पनासुध्दा हळूहळू निर्माण होईल.

फुलांना जे जे दिसेल आणि अनुभवात येईल अशा बाबी ते शब्दांत व्यक्त करू शकतील. त्यामुळे फुलांमध्ये तर्क आणि बुद्धीचा विकास होऊ शकेल. मनुष्याप्रमाणे फायद्याच्या व तोट्याच्या गोष्टींना ते ओळखू शकतील आणि त्यापद्धतीने स्वतःची जीवनपद्धती ठरवतील.

फुले बोलू लागली आणि वेगळ्या पद्धतीने जगू लागली की मनुष्य त्यांचा वापर करू शकणार नाही. फुलांना तोडणे तर अशक्यच होईल. सर्व फुले देखील त्यासाठी संघर्ष करतील. फुलांचा सुगंध मिळणेही कठीण होऊन बसेल. म्हणजेच फुले हळूहळू संकुचित जीवन जगू लागतील.

सर्व फुले मिळून बोलू लागली की बागेत आणि परिसरात एक कोलाहल माजेल. त्यांना गप्प बसवले जाणे अशक्य होईल. फुलांना भावना निर्माण झाल्याने एक वेगळा स्व निर्माण होईल जो स्वतःचे संरक्षण प्रत्येक क्षणी करू लागेल. त्यामुळे कीटक, पक्षी आणि माणसापासून फुल स्वतःला वेगळे करून घेईल.

स्वतःला वेगळे मानले तर फुलांची सुंदरता आणि कोमलता नाहीशी होईल. आपापसांत फुले तुलना करू लागतील. स्वतःच्या सौंदर्याच्या चर्चा करू लागतील. फुलांच्या जीवनात कलह आणि अहंकार निर्मिती होईल ज्यामुळे फुले पूर्ण क्षमतेने उमलणार नाहीत आणि परिसरात सुगंध दरवळणार नाही.

फुलांच्या बोलण्याने त्यांचे संरक्षण आणि विकास कदाचित शक्य होईल परंतु निसर्गात एक विसंगती निर्माण होईल. सत्य परिस्थिती पाहता निसर्ग नियमांविरुद्ध जाणे कोणालाही शक्य नसल्याने फुलांचे सध्याचे जीवन हेच अगदी आकर्षक आणि सुंदर आहे. त्यामुळे फुलांचे बोलणे हे फक्त काल्पनिकदृष्ट्या एकदम छान दृश्य असेल.

तुम्हाला फुले बोलू लागली तर हा मराठी निबंध (Phule Bolu Lagli Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment