उन्हाळ्यातील सुट्टया सर्वांनाच आवडतात. अशातच उन्हाळयात कोणाची सहल असेल तर आनंदाला आणखीच उधाण येते. उन्हाळ्यातील सहल हा निबंध (Summer Trip Marathi Nibandh) लिहताना विद्यार्थ्यांनी सहलीचे वर्णन करायचे असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!
माझी उन्हाळ्यातील सहल | Majhi Unhalyatil Sahal Marathi Nibandh |
उन्हाळयात सर्व मुलांना, विद्यार्थ्यांना सुट्टया असल्याने हमखास सहल काढली जाते. उन्हाळ्यातील सहल त्यामुळेच आकर्षक वाटते कारण एकतर आपण दूर प्रवासाला जात नाही पण अशा प्रकारची सहल काढतो की त्यामध्ये जेवण, खेळ, मौजमजा, आणि एखादा सामाजिक उपक्रम समाविष्ट असेल.
सहसा कुटुंबासोबत किंवा जवळचे मित्र मैत्रीण अशा सर्वांसोबत ही सहल काढली जाते. अशीच या उन्हाळयात आमची सहल शेजारील गावातच गेली होती. आम्ही सर्व मित्रांनी तेथे जाऊन स्वच्छता आणि त्याबरोबर निर्धारित केलेल्या जागेत झाडे लावणे असे दोन उपक्रम हाती घेतले होते.
आमचे पाटील सर सोबत होते आणि त्यांनीच ही सहल नियोजित केली होती. दिवसाचा सर्व उपक्रम अगोदरच ठरला होता. आमच्या गावाशेजारील चंदनपुर हे गाव सहलीसाठी निवडण्यात आले. तेथे जाऊन प्रथम परिसराची साफसफाई, त्यानंतर जेवण, खेळ, मस्ती आणि नंतर सायंकाळी झाडे लावणे असा उपक्रम होता.
सहलीत उपक्रम असल्याने आम्ही सकाळी खूप लवकर म्हणजे सकाळी आठ वाजता निघालो. जाताना सर्वांनी डबे, खाऊ, पाण्याच्या बाटल्या व बॅगा घेतल्या. साफसफाई आणि झाडे लावण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तेथील गावकरी आम्हाला देणार होते. आम्ही या सहलीला चालतच निघालो कारण गाव फक्त पाच किलोमीटर होते.
सर्वजण एकत्र चालल्यामुळे खूप मज्जा आली. आम्ही यापूर्वी चालत कधी प्रवास केला नव्हता पण आज खूप छान वाटले. तेथील गावपरिसर काही ठिकाणी खूप अस्वच्छ होता. आम्ही सर्वांनी मिळून तेथील साफसफाई केली. सहलीला एकूण 26 जण होते. आम्ही त्यामध्ये तीन संघ बनवले आणि साफसफाई केली.
गावातच “कमला” नावाची बाग आहे. ती खूप सुंदर आहे. त्याच बागेत भगवान श्री कृष्णाचे मंदिर आहे. आम्ही एका मोठ्या झाडाखाली जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर सर्वजण खेळू लागलो. खो-खो, लपंडाव हे खेळ आणि संगीत अंताक्षरी खेळताना खूप मज्जा आली.
सायंकाळ झाली होती. शेवटी झाडे लावण्याची वेळ आली. बागेशेजारीच आम्ही छोटे खड्डे खणले. आम्ही आंब्याची छोटी रोपटी सोबतच घेऊन आलो होतो. त्यांना व्यवस्थित लावल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि घराकडे यायला निघालो.
या सर्व सहलीत आणि उपक्रमांत तेथील गावकऱ्यांची खूप मदत झाली. आम्ही सर्वांनी त्यांचे खूप आभार मानले. ही सहल फक्त सहल नव्हती तर सामाजिक उपक्रम देखील असल्याने आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही घरी येईपर्यंत पुरते थकलो होतो पण माझी या उन्हाळ्यातील ही सहल मी कधीच विसरू शकत नाही.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझी उन्हाळ्यातील सहल हा निबंध (Summer Trip Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…