प्रस्तुत लेख हा आनंदाचे डोही आनंद तरंग या अभंगाच्या ओळींवर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात आनंदाचे महत्त्व, गरज आणि स्वरूप स्पष्ट करण्यात आलेले आहे.
आनंद हा जीवनाचा स्वभाव आहे. आनंदी क्षणात आपण जीवनाचा खरा अनुभव घेत असतो. आनंद या विषयावर निबंध लिहताना जीवनाचा अनुभव सुखद कसा काय असू शकतो आणि जीवन आनंदी कसे बनू शकते, याचे विस्तारपूर्वक वर्णन विद्यार्थ्यांनी करायचे असते.
आनंद – मराठी निबंध | Anand Marathi Nibandh |
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात व्यस्त आहे. आनंद खरोखर असतो की ती फक्त एक संकल्पना आहे याचा विचार आपल्याला सर्वप्रथम करावा लागेल. असा विचार पुढे नेताना सुख, दुःख आणि आनंद अशा तिन्ही व्याख्या एकदम सविस्तर जाणून घ्याव्या लागतील.
आपल्या जीवनाचा उत्तम अनुभव हीच आनंदी जीवनाची कसोटी आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला परिणाम मिळत असतात. जर चांगले कर्म केले तर चांगले परिणाम आणि वाईट कर्म केले तर वाईट परिणाम मिळतील. त्यामुळे अशा सुखद अथवा चांगल्या परिणामाची अनुभूती म्हणजेच आनंद म्हणता येईल.
आनंद हा परिणाम स्वरूप मिळत असतो. त्यामुळे आपण कोणती कृती करून आनंद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. फिरणे, खेळणे, जेवणे, काम करणे, वस्तू आणि पैसे प्राप्त करणे तसेच नाती, मैत्री, प्रेम सांभाळणे अशा बाबी करण्यात मनुष्य व्यस्त असतो. या सर्वांची समज वाढत जाणे म्हणजेच जीवनात आनंद निर्माण होत असतो.
आपल्या सवयी ह्या सुखद परिणाम निर्माण करणाऱ्या असल्या पाहिजेत. एकदा सुखद परिणाम आला की तशा कृतीतून आनंद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. याउलट आपल्याला दुःखी – कष्टी बनवणाऱ्या कृती न करणे म्हणजेच आनंदाची अनुभूती सातत्याने घेत राहणे होय.
आनंदी राहणे हे कोणी कोणाला शिकवू शकत नाही. स्वतःचा आनंद हा फक्त व्यक्त होऊ शकतो म्हणजेच परिणाम म्हणून बाहेरून आपल्याला आनंदाच्या रुपात कोणताही व्यक्ती दिसून येत असतो. परंतु आनंदाच्या क्षणी आपण आपल्या आतून खूप प्रसन्न अनुभव करत असतो.
आनंद ही आंतरिक अनुभूती असते. आपल्याला जीवनात समाधानी वृत्ती आणि शांतता अनुभवात येत असेल तर आपण आनंदी आहे असे म्हणता येईल. याउलट शरीर, मन आणि भावना या स्तरांवर आपण जे सुख अनुभवत असतो ते क्षणिक असल्याने त्याला आपण आनंद म्हणू शकत नाही.
आज बहुसंख्य लोक सुखाला आनंद समजतात. त्यामुळेच खरा गैरसमज निर्माण होत असतो. आनंदाचे उदाहरण म्हणून आपण लहान मुलाचे निरीक्षण करू शकतो. लहान मूल हे नैसर्गिकरित्या आनंदी असते. त्याला आनंदी आणि हसतमुख राहणे हे शिकवावे लागत नाही. जीवन तीव्रतेने आणि उत्साहीपणे जगणे यातून आपण आनंद जाणून घेऊ शकतो.
आपण वैचारिक आणि भावनिक स्तरावर सुखी आणि दुःखी होऊ शकतो पण आपले अस्तित्व मात्र आनंदी आहे. त्यामुळे त्या अस्तित्वाची जाणीव करून घेणे यातच आनंदाचे मूळ आहे. बाहेरील भौतिक जगातील कोणतीच वस्तू आणि व्यक्ती आपल्याला आनंदी बनवू शकत नाही तर स्वतःचे जीवन सुखद पद्धतीने अनुभवत जाणे यातच खरा आनंद आहे.
याशिवाय नाती दृढ करत जाणे, अत्यंत उत्साहात जगणे, निर्विचार पद्धतीने जीवनाचा स्वीकार करणे, मूलभूत गरजा प्रामाणिकपणे प्राप्त करणे या आणखी काही अशा बाबी आहेत, ज्यांद्वारे जीवनातील आनंदाचा पाया तयार होत असतो. वरील सर्व बाबी लक्षात घेतल्या तर आनंदाचे डोही आनंद तरंग हे तुकारामांच्या अभंगातील वाक्य समजू शकेल.
तुम्हाला आनंदाचे डोही आनंद तरंग हा मराठी निबंध (Happiness Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…