माझी दिनचर्या – मराठी निबंध | Majhi Dincharya – Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा माझी दिनचर्या (Majhi Dincharya – Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात प्रत्येक विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असते याचे वेळेनुसार वास्तविक वर्णन करणे अपेक्षित असते.

माझी दिनचर्या निबंध | My Daily Schedule Essay In Marathi

माझे नाव संकेत पाटील आहे. मी इयत्ता सहावीत शिकत आहे. मागील वर्षी मी अनेक दिवस आजारी होतो. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माझी दिनचर्या बदलण्याचे ठरवले. मला सुरुवातीला एक दोन आठवडे दिनचर्या सांभाळणे जमले नाही परंतु काही दिवसांनी ती दिनचर्या मला खूपच आवडू लागली.

दिनचर्येनुसार जेवणे, खेळणे व अभ्यास यांच्या वेळा ठरवल्या गेल्या आणि आहारातील काही बदल सुचवले गेले. आमच्या शाळेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते. मला सुचवण्यात आलेली सकाळी लवकर उठण्याची सवय खूपच फायदेशीर ठरली.

सकाळी सहा वाजता लवकर उठून वैयक्तिक कामे उरकून व्यायाम अथवा योगा करणे, त्यानंतर नाश्ता आणि शाळेत जाण्यापूर्वी अभ्यास करणे असा बदल सुरुवातीला माझ्या दिनचर्येत करण्यात आला. सकाळी व्यायाम आणि अभ्यास करण्यामुळे मला दिवसभर स्वस्थ अनुभव येतो.

शाळेत गेल्यावर व्यवस्थित बोलणे, कोणाशीही भांडण न करणे या गोष्टी माझ्या दिनचर्येत आहेत. तसेच एकाग्रता साधण्यासाठी प्रत्येक विषयाच्या तासाला शांत बसणे ही सवयदेखील मी मागील वर्षापासून लावून घेतली आहे. तेव्हापासून माझ्या अभ्यासात कमालीचा फरक पडलेला आहे.

आमच्या शाळेत सायंकाळी खेळाचा तास असतो तेव्हा आम्ही खूप आनंदी मनाने आणि उत्साहाने खेळतो. मला कबड्डी आणि खो – खो हे खेळ खूप आवडतात. खेळल्यानंतर अत्यंत प्रसन्न असा अनुभव येत असल्याने माझे दुपारी जेवल्यानंतर फक्त खेळाच्या तासाकडेच लक्ष असते.

शाळेतून घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुणे आणि नंतर थोडा अभ्यास करून बरोबर आठ वाजता जेवायला बसणे अशी माझी रात्रीची काही कामे आहेत. जेवण झाल्यावर मी आणि माझे शेजारचे मित्र आमच्या गल्लीतून फेरफटका मारतो. त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचायला मदत होते.

शाळेला जेव्हा सुट्टी असते म्हणजेच शनिवार आणि रविवार असेल तर माझे बाबा मला फिरायला घेऊन जातात. तसेच अभ्यासा व्यतिरिक्त गोष्टीची पुस्तके वाचणे असा वेगळा उपक्रम देखील मी करत असतो. सुट्टी दिवशी आमच्या गावातील मोठ्या मैदानात आम्ही सर्व मित्र मिळून क्रिकेट खेळतो.

उन्हाळ्याची अथवा दिवाळीची सुट्टी असेल तर माझी दिनचर्या थोडीशी वेगळ्या स्वरूपाची असते. आम्ही कधीकधी सहकुटुंब गावी गेल्यावर माझी दिनचर्या मला लक्षात सुद्धा राहत नाही. सुट्टीत फक्त खेळायला जास्त वेळ दिल्याने इतर गोष्टी सहजच मी विसरतो पण रोजची दिनचर्या आणि सवयी ध्यानात आणून द्यायला आई आहेच की!

तुम्हाला माझी दिनचर्या – मराठी निबंध (Majhi Dincharya Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment