आयुर्वेद – मराठी निबंध | Ayurveda Essay In Marathi

प्रस्तुत निबंध हा आयुर्वेद (Ayurved Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात आयुर्वेद म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि स्वरूप असे मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

आयुर्वेद – भारतीय वैद्यकीय शास्त्र | Ayurved Marathi Nibandh |

आयुर्वेद हे भारतातील प्राचीन औषधी शास्त्र आहे. आयुर्वेदाची उत्पत्ती भारतात सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जाते. आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ जीवनाचे शास्त्र असा आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र किंवा विद्या असा आयुर्वेद शब्दाचा अर्थ आहे.

आयुर्वेद हे मुख्यतः भारतीय विज्ञान आहे. गौतम बुद्धांच्या आणि त्यानंतरच्या काळात आयुर्वेदात अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली. आद्य – वैदय भगवान धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. पौराणिक कथांनुसार हे ज्ञान त्यांना खुद्द ब्रम्हदेवाकडून मिळाले होते.

आयुर्वेदात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार मुख्य वेद आहेत. परंतु आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्व वेदामधून घेतलेले आहेत. त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक आहे असे समजतात.

आयुर्वेदात शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्त राहणे, मनाने समाधानी राहणे, शरीर व मनावर नियंत्रण राखणे, मानवी जीवन विकसित करणे अशा बाबींचे शास्त्र सांगितले जाते. शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी प्रथमतः योगा आणि व्यायाम या गोष्टींवर भर दिला जातो.

आयुर्वेदात द्रव्ये, हवापाणी, संतुलित आहार, ऋतुचक्र, वनस्पती, भौगोलिक निसर्ग, मानवीय जीवन, सजीवसृष्टी, इत्यादी सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. आयुर्वेदात रोगाला ‘यक्ष्म’ म्हणतात. आयुर्वेदानुसार माणसांमध्ये वात, पित्त आणि कफ अशा तीन प्रकृती असतात.

ज्या व्यक्तीच्या तीनही प्रकृती समप्रमाणात असतात त्या व्यक्तीस उत्तम, आरोग्यपूर्ण आणि सक्षम माणूस समजले जाते. उत्तम आरोग्यदायी व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होईल, असे आयुर्वेदात सांगितले जाते. आयुर्वेदानुसार माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान हे शंभर वर्षे असायला हवे.

आयुर्वेदात जीवन म्हणजे शरीर, मन, आत्मा यांचे संयोजन आहे असे सांगितलेले आहे. आयुर्वेदानुसार मानवी शरीर तसेच सृष्टीतील कोणतीही वस्तू ही पाच मूल तत्वांपासून बनलेली आहे. त्यांना पंचमहाभूते असे म्हंटले जाते. पंचमहाभूतात पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश (पोकळी) या पाच तत्त्वांचा समावेश  होतो.

आयुर्वेदात रोगाच्या मुळाशी जाऊन रुग्णाचे निदान केले जाते. आयुर्वेदानुसार जिवंत मनुष्य हा वात, पित्त आणि कफ या तीन प्रकृतींचा तसेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सात मूलपेशींचा समूह असतो.

आयुर्वेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे. तसेच या ऋतुंनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांनुसार आपला आहारविहार कसा ठेवावा याचा खोलवर चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला जातो.

आयुर्वेदाला भारताचे प्राचीन वैद्यकीय शास्त्र म्हणून ओळखले जाते. आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक काळातही आयुर्वेदाला खूप महत्त्व दिले जाते. परदेशी लोक भारतात खास आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी येतात. आयुर्वेदा आणि योगा ह्या संकल्पना सध्या जगभरात जगण्याच्या पद्धती बनत चालल्या आहेत.

तुम्हाला आयुर्वेद हा मराठी निबंध (Ayurved Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment