झाडे लावा झाडे जगवा / झाडांचे महत्त्व ! Zade Lava Zade Jagva Essay In Marathi

झाडांचे महत्त्व अनादी काळापासून सर्वजण जाणतात. झाडांचे आणि सजीव जीवनाचे अतूट नाते आहे. तरीही मानव काही बाबतीत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. त्याचे परिणाम, तोटे आणि त्यावर उपाय म्हणून झाडे लावणे अपेक्षित आहे. हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला गेला तर भविष्यात आपण निसर्ग समृद्ध करून प्रदूषण कमी करू शकू. 

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेत किंवा शालेय उपक्रमात हा निबंध लिहायला लावतात. त्याची मुद्देसूद रचना आणि सुसंगत मांडणी असावी लागते. चला तर पाहूया हा निबंध कसा लिहावा. सदर निबंध हा एक नमुना आहे. तुम्ही तुमचे मुद्दे त्यामध्ये जोडू शकता.

झाडे लावा झाडे जगवा किंवा झाडांचे महत्त्व ! मराठी निबंध | Marathi Nibandh |

अनेक संत, महात्मे, समाज सुधारक झाडांचे महत्त्व सांगून गेले. झाड आणि कुठलेच जीवन वेगवेगळे नाही. झाडांचे जे कार्य चालते ते सजीवसृष्टीला सांभाळून आहे. झाडांची निर्मिती आणि निसर्गचक्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. 

एखादे बीज रुजवले की त्याचे रोप बनते. त्यासाठी सुयोग्य जमीन, खत आणि पाणी यांची आवश्यकता भासते. झाड ऑक्सिजन निर्मिती करते. तो ऑक्सिजन माणसाला जगण्यासाठी खूपच आवश्यक असतो. माणूस श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तोच वायू झाडे स्वतः शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. 

झाडे आणि हालचाल करणारे सजीव हे एकमेकांना श्र्वासाची आदानप्रदान करतात असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. माणूस जो श्वास घेतो तो झाडांपासून प्राप्त होतो. निसर्गचक्रात शुद्ध हवेची कमतरता झाडे भरून काढतात.

 झाडे ज्या प्रदेशात जास्त आहेत त्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो याचा अर्थ म्हणजे झाडांसाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि झाडांमुळे त्या प्रदेशात पाऊसाचे वातावरण सतत निर्मिले जाते. म्हणून दुष्काळी भाग जर आपल्याला समृद्ध करायचा असेल तर झाडे लावणे खूप आवश्यक आहे. 

झाडांचे महत्त्व जर समजले असेल तर झाडांची होणारी तोड आणि नवीन वृक्ष लागवड यासंदर्भात नक्कीच आपण पाऊल उचलले पाहिजे. आपण आज महाराष्ट्रात किंवा देशभरात दुष्काळ आला असे ओरडतो किंवा पाऊस जास्त पडला असे ओरडतो, परंतु निसर्गाची अवकृपा का होत आहे याचे कारण कधी जाणून घेतले आहे का? 

निसर्ग व्यवस्थित काम करतच असतो. परंतु मानवी दुष्कृत्यामुळे निसर्गचक्रात अडथळा निर्माण होतो. वृक्षतोड हे त्याला पहिले कारण म्हणावे लागेल. वृक्षतोड का केली जाते? यामागचे कारण सर्वांनाच ज्ञात आहे पण कृती कोणीच करीत नाही. 

अमर्याद लोकसंख्यावाढ झालेली आहे त्यामुळे जीवनात लाकडांची गरज भासत असते, त्यातून केलेली वृक्षतोड; शहरीकरण आणि औद्योगिकीकरण करण्यासाठी केलेली वृक्षतोड; एक वृक्ष तोडण्यास काही वेळ पुरेसा आहे. परंतु तो मोठा होण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी लागत असतो. या समस्येवर पर्याय न शोधता सहज वृक्ष तोडले जातात. जंगले नष्ट केली जातात. डोंगर खोऱ्यात वणवा पेटवून दिला जातो. 

वरील समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा! हे घोषवाक्य खूप सार्थकी ठरू शकते. वृक्षसंवर्धन करण्यासाठी प्रत्येक सरकार पाऊले उचलत असते मात्र त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून जगवल्यास लोकसंख्या आहे तेवढी झाडे उत्पन्न होऊ शकतात. वायू प्रदूषणदेखील आटोक्यात आणले जाऊ शकते. 

भारतात सद्यस्थितीत अनेक सरकारी किंवा खाजगी संस्था अशा आहेत ज्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यात पुढाकार घेतलेला आहे. तुमच्या आसपास जर अशा संस्था असतील तर त्यांना नक्की मदतीचा हात द्या. झाडे लावून आपला परिसर सुंदर बनवा. कोणी झाड तोडत असेल तर त्याला आळा घाला.

परिसरात झाडे असणे म्हणजे सुंदरतेचे ते प्रतीक असते. एखाद्यावेळी कोकण, ईशान्य आणि दक्षिण भारत फिरून या; त्यावेळी समजेल की हे प्रदेश किती सुंदर आणि विविधतेने नटलेले आहेत. त्यांची सुंदरता आणि हवामान जास्त करून घनदाट जंगलामुळे आहे. निसर्ग, पक्षी, प्राणी किती तादात्म्य साधून आहेत, फक्त माणूस निसर्गापासून तुटत चालला आहे. त्यामुळे आजच निर्धार करूया आणि एकसाथ पुन्हा ते घोषवाक्य म्हणुया, झाडे लावा आणि झाडे जगवा!

1 thought on “झाडे लावा झाडे जगवा / झाडांचे महत्त्व ! Zade Lava Zade Jagva Essay In Marathi”

Leave a Comment