योगा मराठी निबंध ! योगासनांचे महत्त्व | Yoga Essay In Marathi |

योगा ( Yoga ) ही गोष्ट खूप व्यापक आहे. योगा म्हणजे एकता. सर्व सजीव निर्जीव घटकांची एकता! ती एकता नुसती शाब्दिक नाही तर अनुभवातून आलेली प्रचिती आहे. प्रत्येक क्षण उत्कंठेने जगत असताना पूर्णपणे आंतरिक स्थिरता अनुभवणे म्हणजे योगा. योगा ही संकल्पना लक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी “योगा” या विषयावर निबंध लिहणे अपेक्षित आहे. चला तर मग पाहूया कसा लिहायचा “योगा” निबंध (Yoga Essay).

योगा निबंध | Marathi Nibandh |

योग ही प्रक्रिया भारतीय संस्कृतीत खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे. आत्ताच्या काळात योगा हा संदर्भ फक्त योगासने करणे असा घेतला जातो. विविध आसने करून शरीर लवचिक आणि स्थिर बनवणे असा उद्देश त्यामागे असतो. शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग फायदेशीर आहेच परंतु ती फक्त अध्यात्मिक उन्नतीची प्राथमिक पायरी आहे.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. शरीर निरोगी राखणे हे अत्यावश्यक बनले आहे. निरोगी शरीर आणि मन हाच खरा यशाचा मंत्र आहे. योगासने केल्यावर निरोगी आयुष्य हा त्याचाच परिणाम आहे. योगा ही संकल्पना जशी पूर्वेकडील देशात समजली जाते त्याच्या बरोबर उलट्या पद्धतीने पश्चिमात्य देश त्याचे अनुकरण करत आहेत.

पाश्चिमात्य देश योगाचे डोळ्यांनी दिसते आहे तसेच अनुकरण करतात. योगासनांचा होणारा शारीरिक फायदा हाच फक्त त्यांनी समजून घेतला. त्यामागचे अध्यात्मिक अधिष्ठान समजून घेतले नाही. त्यामुळे योगा आज जसा फॅशन बनून गेला आहे तसा त्याचा अर्थ नाहीये. आज योगा करताना विविध आसने ही प्रमाणानुसार केली जात नाहीत. शरीराची योग्य गती योगा करताना राखली जात नाही.

अगोदर योगासने का आणि कशी निर्माण झाली ती पाहूया. भारतीय संस्कृतीत अध्यात्मिक प्रगतीसाठी शरीर निरोगी आणि लवचिक असणे गरजेचे मानले गेले आहे. शरीराची स्थिरता जर प्राप्त झाली तर त्यानंतर मानसिक आणि मग चेतनेच्या स्तरावर देखील स्थिर होता येते असा उद्देश योगासने करण्यामागे आहे. पूर्वी अध्यात्मिक गुरूंचे आश्रम असल्याने योगासने गुरुशिवाय कोणीही घेत नसे. शिष्याला किती प्रमाणात गरज आहे त्यापद्धतीने योगासने त्याच्याकडून करवून घेतली जात.

शरीरात ऊर्जेचा प्रवाह हा खेळता असला पाहिजे. त्यासाठी शरीरशुद्धी खूपच आवश्यक मानली जाते. शरीरात आणि मनात जर विकार असतील तर योगासने घातकही ठरू शकतात. एखादा प्रमाणित योगगुरू असेल तरच तो व्यवस्थित योगासने शिकवू शकतो नाहीतर तुम्ही व्हिडिओ बघून, कुठेतरी वाचून योगा करायला सुरुवात केली तर शरीराचे नुकसान करून घ्याल.

अध्यात्मिक दृष्टीने स्वयंप्रकाशित होण्यासाठी अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर स्थिर असणे आवश्यक आहे. योगा जर साधला गेला तर कितीही ऊर्जेचा संचार शरीरात झाला तरी शरीर तो ऊर्जेचा संचार सहन करू शकते. ऊर्जेची तीव्रता हळूहळू वाढू लागल्यानंतर आपण फक्त चेतना आहोत असा अनुभव येतो. तेव्हा शरीराची काहीही गरज वाटत नाही. अशावेळी शरीर पकडून ठेवण्यासाठी किंवा चेतनेला शरीरात वास्तव्य करण्यासाठी तेवढेच सक्षम शरीर आवश्यक असते.

ऊर्जेचा अनुभव अशावेळी एवढा मोठा असतो की तो अनुभव झाल्यानंतर शरीरात खूप वेदना निर्माण होऊ शकतात. त्या वेदना शारीरिक पातळीवर सहन होऊ शकतात आणि व्यक्ती स्थिर राहू शकतो. म्हणजे एकप्रकारे आपण योगा करून शरीराला अध्यात्मिक अनुभवासाठी तयार करत असतो. त्यासाठी योगा ही जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे. शरीर वाकडे तिकडे करून एक प्रकारचा व्यायाम करण्याकडे जर तुमचा कल असेल तर मात्र योगा तुम्हाला फायदेशीर ठरू शकणार नाही.

आज एवढी दगदग आणि स्पर्धा वाढली आहे की त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. विविध व्यसने, मनोरंजनाची साधने माणूस दिवसेंदिवस निर्माण करत आहे परंतु स्थैर्य मात्र त्याला प्राप्त झालेले नाही. ते स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अनेकजण योगा करतात. योगासने योग्यरीतीने केली गेली म्हणजे योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली केली गेली तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. योगा हा असा मार्ग आहे की ज्याद्वारे आनंद आणि समाधान प्राप्ती तर होतेच शिवाय स्वतःच्या अस्तित्वाचा शोध देखील तुम्ही घेऊ शकता.

तुम्हाला योगा मराठी निबंध ( Yoga Marathi Essay ) कसा वाटला ? याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय कळवा….. धन्यवाद!

Leave a Comment