माझा देश भारत मराठी निबंध ! Essay On India In Marathi | India Essay ।

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध राज्यांच्या प्रादेशिक सीमा, सांस्कृतिक इतिहास, भाषेतील वैविध्य या देशाला एकत्र बांधून आहे. भारत देशाची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वर्तमान माहिती सर्वांना माहीत असलीच पाहिजे, असा उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन “भारत” किंवा “माझा देश – भारत” ( Essay On My Country India ) या विषयावर निबंध लिहायला लावतात.

विद्यार्थ्यांना हा निबंध लिहताना भारत देशाबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. हा निबंध ऐतिहासिक संदर्भ आणि वर्तमान स्थिती यांनी जोडला गेला असला पाहिजे तसेच शब्दांची मुद्देसूद मांडणी आवश्यक आहे. अशा प्रकारच्या निबंधात अतिशयोक्ती करायची नसते. चला तर मग, पाहूया कसा लिहायचा भारत या विषयावर निबंध!

भारत निबंध | India Essay In Marathi | Majha Desh Bharat Marathi Nibandh |

भारत हा भूप्रदेश अशा भौगोलिक रचनेत स्थित आहे ज्याद्वारे येथील संस्कृती आणि परंपरा या खूप प्राचीन काळापासून टिकून आहेत. भारतीय संस्कृती ही कधीच विनाश न पावलेली संस्कृती आहे. येथील लोकांचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पाया मजबूत असल्याने भारताच्या अस्तित्वात एक प्रकारची सुसंगतता आणि नाळ आढळते. त्याबरोबर आज वैज्ञानिकता आणि आधुनिकतेचा पुरस्कारही भारताने केलेला आहे.

दहा ते पंधरा हजार वर्ष जुने असे ऐतिहासिक संदर्भ या भुमिबद्दल आढळतात. सतयुग, द्वापार युग, कलियुग असे हजारो वर्षांच्या कालावधीत असलेले युग येथे मांडले जातात. ज्योतिष आणि गणित यांचा सुरेख पद्धतीने उपयोग भारतातच प्रथमतः केला गेला. येथे घडलेला इतिहास हा सर्वकालीन ज्ञात आहे परंतु त्याला जास्त महत्त्व न देता त्यातून बोध घेण्याची वृत्ती भारतीय मानसिकतेत आहे.

भौगोलिक रचनेचा विचार करताना देशाची दक्षिण – पूर्व आणि दक्षिण – पश्चिम सीमा ही अथांग महासागराने व्यापली आहे तर उत्तरेत हिमालय पर्वत अडीग असा उभा आहे. पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने आणि निसर्गाची कधीच मोठी अवकृपा न झाल्याने शेती हा परंपरागत व्यवसाय या देशात केला जातो. कित्येक हजारो वर्षांची शेतकी परंपरा भारताला लाभलेली आहे.

पूर्ण जगात दोन ऋतु मानले गेले असताना येथे मात्र उन्हाळा, वर्षा आणि हिवाळा असे तीन ऋतु आढळतात. प्रत्येक राज्यात वातावरणातील बदलानुसार त्या तीन ऋतूंचे आणखी उपऋतु पडतात. एकूण 28 राज्ये भारतात आढळतात. प्रादेशिक भाषा ह्या देखील वेगवेगळ्या आहेत. पोशाख वेगवेगळे आहेत तरीही संपूर्ण भारत भूमी ही एक देश म्हणूनच संबोधली गेली आहे. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी अशा कितीतरी नद्या हजारो वर्षांपासून येथील जमीन फुलवत आहेत.

येथील पूर्वीपासून चालत आलेली राज्यव्यवस्था ही न्याय प्रदान करणारी अशी आहे. सम्राट अशोक, राजा राम, राजा हरिश्चंद्र असे प्रजादक्ष राजे येथे होऊन गेले आहेत. आत्ता सद्यस्थिती पाहता लोकशाही ही सर्वात कमी हिंसक आणि कायदेशीर अशी राष्ट्र व्यवस्था भारतात आहे ज्यामुळे एक नेता हा सर्व लोकांद्वारे निवडला जातो. त्याचा कारभार हा जनाधिष्ठीत असतो. भारतीय संविधान हे लोकांच्या जगण्याचा आणि राज्य व्यवस्थेत असणाऱ्या नितीमुल्यांचा पाया आहे.

भारत प्रत्येक शतकात वेगवेगळा भासतो. मागील काही शतकांत खूप मोठी परदेशी आक्रमणे भारतावर झाली. भारत हा देश परकीय सत्तेत होता ज्यामध्ये अफगाणी, इंग्रज, पोर्तुगिज अशा सत्तांचा समावेश होता. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगदी १६ व्या शतकापासून येथील विरपुत्रांनी आपले प्राण गमावले आहेत. भारत देश अनेक वेळा लुटला गेला पण येथील लोकांचे आत्मिक बळ आणि जगण्याचे नियम कोणी हिरावू शकले नाही.

संपूर्ण जगातील कितीतरी संस्कृती विखुरल्या गेल्या. त्यांच्या जगण्यात मूळ पाया हा फक्त भौतिक सुख हा होता. भारतात मात्र तसे नाही, भारत हा अध्यात्मिक अधिष्ठान राखून आहे. भक्ती, तर्क, तंत्र, ध्यान, योगा अशा विविध मानवी उन्नतीच्या कला भारतात पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्यामुळे भौतिक सुखाच्या पलिकडे जाऊन वैश्विक अस्तित्त्व आणि आनंद याचा शोध घेण्यात भारतीय लोक यशस्वी झाले.

शिक्षणाच्या अभावामुळे श्रद्धा ही अंधश्रद्धा बनत गेली आणि भारतीय लोकांना वेडे ठरवण्यात आले. शिक्षण आता सर्वत्र मिळू लागले आहे त्यामुळे ज्या गोष्टी खरोखर मूल्य राखून होत्या त्या पुन्हा एकदा संस्कृती म्हणून पाळल्या जाऊ
लागल्या आहेत. वैज्ञानिक प्रगतीही तेवढीच कौतुकास्पद आहे. चंद्र मोहीम, मंगळ मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली आहे. भारतातील शास्त्रज्ञ पूर्ण जगभरात स्थित आहेत. तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात भारतीय तरुण आपले स्थान आणखी मजबूत बनवत आहेत.

भारतीय लोकसंख्येला दिशा देण्याचे काम येथील सामाजिक व्यवस्था करत असते. सामाजिक स्थिरता लाभली असल्याने कोणी एक व्यक्ती समाजाला वेगळ्या आणि चुकीच्या मार्गावर नेऊ शकत नाही. भारतीय समाज आणि संस्कृती ही नेहमी शारिरीक सुखांच्या पलिकडे जाऊन अध्यात्मिक उन्नती करवून घेणारी आहे. याउलट पाश्चिमात्य देश आज किती हिंसेने आणि मानसिक निराशेने ग्रासलेले आहेत हे सर्वज्ञात आहेच.

भारत हा फक्त परंपरागत मूल्यांनी चालत आलेला देश नाही तर त्यामध्ये वैज्ञानिक सत्यता देखील आहे. अनेक रुढी परंपरा या वैज्ञानिक दृष्ट्या देखील सत्य आहेत आणि त्याची पुष्टी जगभरातील वैज्ञानिक देत आहेत. योगा, ध्यान, आणि आयुर्वेद आता सर्व देशांचे लक्ष वेधून घेत आहे. विज्ञान, कला, खेळ, शिक्षण, सर्वच क्षेत्रात भारताची होत असणारी प्रगती नावजण्यासारखी आहे. भारत हा येत्या काही वर्षात विश्वगुरु म्हणून उदयास येईल यात शंकाच नाही.

तुम्हाला माझा देश भारत मराठी निबंध ( Essay On India in Marathi ) कसा वाटला, हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा…..

Leave a Comment