जलसंधारण मराठी निबंध ! Water Conservation Essay in Marathi|

जल संधारण किंवा जल संवर्धन निबंध (Water Conservation Essay in Marathi) माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालयात असताना लिहावा लागतो. पाण्याचे महत्त्व सर्वजण जाणतात परंतु त्याचा शब्दात व्यक्त केलेला प्रत्यय म्हणजे पाणी या विषयावरचा निबंध! हा निबंध लिहताना घ्यावयाची काळजी म्हणजे सुयोग्य वाक्यांची आणि मुद्द्यांची मांडणी!

जलसंधारण हा विषय खूप खोल आणि विस्तार पूर्ण असा आहे. त्याचा प्रत्येक समाजात आणि प्रत्येक देशात केला जाणारा उपयोग हा वेगवेगळ्या स्तरावर असू शकतो. चला तर बघू मग नक्की काय आहे जल संधारण आणि त्या विषयावर कसा लिहावा निबंध!

जलसंधारण निबंध ! Jal Sandharan Marathi Nibandh |

पाणी म्हणजे अर्थातच जीवन! अशी उक्ती प्रत्येकालाच अनुभवात देखील आहे. रोज वापरण्यात येणारे पाणी व्यक्ती परत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असेल परंतु त्याचा सुयोग्य वापर करणे आज कर्तव्य बनून गेले आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत एक व्यक्ती जेवढे पाणी वापरतो, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

स्वयंपाकघर, कपडे-भांडी धुणे, अंघोळ, आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर होत असतो. पाणी या सर्व कामांसाठी गरजेचे देखील आहे पण त्याचा अपव्यय होत असल्यास काय करावे लागेल, याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. आज लोकसंख्या आणि जलप्रदूषण या समस्या भेडसावत असल्याने पाण्याचा नियंत्रित वापर ही काळाची गरज होऊन बसली आहे.

प्रत्येक देश आणि त्याचे सरकार हे जल संधारण याबाबतीत विचार करतेच आणि त्याबाबतीत धोरण आणि योजना ठरवत असते. त्याघडीला असलेली लोकसंख्या, उपलब्ध जलस्त्रोत आणि त्याचे नियोजन व पुरवठा या सर्व गोष्टी सरकारला स्वतःच्या धोरणात ठरवाव्या लागतात. पाऊस ज्या क्षेत्रात जास्त पडतो तेथे जल प्रकल्प उभारणे आणि जेथे दुष्काळ किंवा पाणीटंचाई असते, त्या विभागात पाणी पुरवठा करणे अशा धोरणांनी जल संधारण यशस्वी ठरत असते.

मागील दोन दशकात झालेले प्रयत्न उल्लेखनीय असे आहेत. भारतात तरी वीजनिर्मिती आणि पाणी पुरवठा योग्य स्वरूपात पुढे आणला गेला आहे. मोठ्या नद्यांवर उभारलेले वीजप्रकल्प आणि धरणे या दोन्ही मार्फत त्या संपूर्ण राज्यातील वीज समस्या टाळली गेली आहे आणि धरणामुळे शेतीविकास शक्य झाला. त्यामुळे लहान खेड्यातील घटक देखील आज शेतीवर उपजीविका करून एक चांगले आयुष्य जगत आहेत.

जलसंधारण किंवा जल नियोजन करण्यासाठी पाणी बारा महिने उपलब्ध असणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे, या गोष्टीला आपण नाकारू शकत नाही. त्यावरील कारणे शोधताना आपण लोकसंख्या देखील विचारात घेतली पाहिजे. निसर्ग का लयीस चालला आहे? का जंगले तोडली जात आहेत? का हवा आणि पाणी दूषित बनत चालले आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना लोकसंख्यावाढ हा मुद्दा नेहमी मागे सारला जातो आणि नुसत्या उपाय योजना पुढे आणल्या जातात ज्याद्वारे निसर्गाचा नाश होत असतो. जल संधारण करणे आवश्यक आहेच परंतु पाण्याचा प्रवाह रोखणे आणि निसर्ग प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे हे काही मान्य असणार नाही. पाणी समुद्राला जाऊन मिळणे, नंतर पाण्याची धूप होऊन पुन्हा तीच पाऊस स्वरूपात पृथ्वीवर पुन्हा येणे हे जलचक्र सर्वांना माहीत आहे.

जल प्रदूषण आणि नियोजनातील अडथळे दूर सारून जलसंधारण व्यवस्थितरीत्या करता येईल. कोणत्याही राज्याच्या विकासात उद्योगधंदे, शेती, विज्ञान तंत्रज्ञान यांची मोलाची साथ मिळत असते. अशा उत्पन्नाच्या साधनांना पाणी उपलब्ध करून देणे यासाठी जलसंधारण करणे आवश्यक आहे. योग्य जल व्यवस्थापन केल्यास संपूर्ण राज्य आणि पर्यायाने देश सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील यात शंकाच नाही.

जलसंधारण करताना भौगोलिक आधार लक्षात घ्यावा लागतो. निसर्गनिर्मित सरोवरे, तळी, नाले यांचा ही विचार करावा लागतो कारण बारा महिने पाणी पुरवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो. अशा प्रदेशात पाणी अडवा – पाणी जिरवा, शेततळे, माळरानावर चऱ्या खोदून पावसाचे पाणी जिरवणे असे प्रकल्प उभारल्यास तेथील क्षेत्र आणखी विकसित होऊ शकते.

भूगर्भातील पाणी यामुळे आपण नेहमीच उत्तम शेती करू शकलो आहे. विहिरी, बोअर वेल याद्वारे सतत पाण्याची उपलब्धता होऊ शकते. पण त्यासाठी त्या क्षेत्रात पाणी जिरवणे खूप आवश्यक ठरते. त्यासाठी जलसंधारण करताना पाणी जमिनीत जिरवणे, पाणी पावसाळ्यात जास्त वाया न घालवता ते साठवणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या
जातात.

एकंदरीत विचार केल्यास असे लक्षात येईल की भूगर्भात जलसाठा वाढवणे, पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करणे, पाणी पुरवठा, पाणी नियोजन, पाणी प्रदूषण प्रतिबंध अशा काही संकल्पना जलसंधारण करताना आवश्यक ठरतात. सरकार अशा योजना आणि प्रकल्प राबवत असते परंतु सामान्यांचा सहभाग आणि सहयोग तेवढाच आवश्यक आहे. पाण्याचा जपून वापर करणे, अपव्यय टाळणे अशी कामे व्यक्ती स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर होणे गरजेचे आहे.

तुम्हाला जल संधारण मराठी निबंध ( Water Conservation Essay in Marathi ) निबंध कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा… धन्यवाद!

Leave a Comment