बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi |

मागील दशकात आणि आत्ताही सर्वात जास्त भेडसावत असलेली समस्या म्हणजे बालमजुरी ! आता त्याचे प्रमाण घटत आहे परंतु काही ठिकाणी त्याचा विपर्यास होतच आहे. बालवयात काम हाती आल्यावर होणारे अंधारमय भविष्य हे काही समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी चांगले नाही. याची समज येण्यासाठी विद्यार्थ्यांना बालमजुरी निबंध ( Child Labor Essay In Marathi ) लिहावा लागतो.

या निबंधात वास्तविकता जेवढी व्यक्त करता येईल तेवढी करावी. बालमजुरीमुळे बालकांचे होणारे नुकसान हे भविष्यातले धोके समोर ठेऊन व्यक्त करायचे असते. चला तर मग पाहूया बालमजुरी (Bal Majuri) हा निबंध!

बालमजुरी एक भीषण समस्या निबंध | Bal Majuri Marathi Nibandh |

भारताप्रमाणे अनेक देश हे मागील शतकात विकासाच्या मार्गावर होते. त्यावेळी कुटुंब नियोजन आणि एक देशभावना नुकतीच विकसित होत होती. त्याचा संबंध सर्व देशवासीयांच्या माथी नव्हता. खेड्याकडे आणि निमशहरी भागात उपजीविकेचे साधन नसल्याने आणि घरातच पालक शिक्षित नसल्याने शिक्षण हा मार्ग उपजिविकेसाठी नव्हताच. तेव्हा शेती उपलब्ध नसली की मजुरी हा पर्याय स्वीकारला जायचा.

अशा परिस्थितीत घरातील लहान मुले देखील कष्टाच्या आणि मजुरीच्या कामात वापरली जायची. सर्व कुटुंब किंवा ओळखीचा कोणी व्यक्ती जर कुठले शारीरिक कष्टाचे काम करीत असल्यास घरातील लहान मुले देखील थोड्याशा पैशासाठी कामाला नेली जात. जेथे देश प्रगतीसाठी मुले शिक्षित असणे खूप गरजेचे होते तेथेच मुले मजुरीच्या अंधारात ढकलली जात आहेत याचा अनुभव हळूहळू येऊ लागला.

देशावर परकीय सत्तांचे आक्रमण सतत होत राहिल्याने भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला होता. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून पुनश्च एकदा भारत खंबीरपणे उभा राहू लागला आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीय शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे. स्वतःचा आणि देशाचा विकास त्याला समजला पाहिजे. परंतु हे घडण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहे ते म्हणजे बालमजुरी हटवून लहान मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

कोणताही देश तेथील जबाबदार नागरिकांनी महान बनत असतो. जबाबदार पिढी घडवण्याची कृती लहानपणापासून होत असते. शिक्षण आणि नंतर उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या तर प्रत्येक व्यक्ती एक चांगला नागरिक बनतोच पण तरीही बाल मजुरी काही ठिकाणी पाहायला मिळतेय. ही बालमजुरी देशासाठी आणि समाजासाठी चांगली नसते. एकीकडे काही मुले उच्च शिक्षित होतात. कला, क्रीडा, व्यवसाय आदी क्षेत्रात नाव कमावतात आणि दुसरीकडे मात्र बाल मजुरिने काही मुले आपले भविष्य अंधारमय करून घेत आहेत.

एक पिढी जर समंजस असली तर पुढची पिढी त्यापेक्षा पुढचा विचार करू शकते. असाच प्रगतीचा मार्ग प्रत्येकाची निवड असली पाहिजे. मजुरी आणि लहानपणीच कष्टाच्या कामाने लहान मुलांचे भवितव्य घडू शकत नाही. प्रगतीचा मार्ग मग ते कसा काय निवडू शकतील. तेवढा बौद्धिक विकास लहानपणीच होणे गरजेचे असते.

स्वतःच्या गरजा भागल्या की समाजाप्रती काही देणे असते, ते दान दिल्यावर आपण उज्ज्वल भविष्य घडवत आहे अशी जाणीव होत असते. बालमजुर, समाज आणि देश या संकल्पना मनात कसा काय रुजवू शकेल? त्याला अक्षर ओळखच नसेल आणि पूर्ण दिवस फक्त तो कामच करत असेल तर तसेच संस्कार आयुष्यभरासाठी त्याच्यावर होतील. मजुरांवर केले जाणारे अन्याय आणि त्यांना दिली जाणारी वागणूक एका मुलाला लहानपणीच मिळाली तर तो दुसऱ्याच्या फायद्याचा कसा विचार करेल?

व्यक्तिगत फायदे आणि पैसा यासाठी तो काहीही करेल. मजुरांना असतात ती सगळी व्यसने त्याला लहानपणीच जडतील. तंबाखू, गुटखा खाणे, दारू पिणे हे त्याचे नित्यनियमाचे काम होऊन जाईल. एकदा का बालमजूर मोठा झाला मग त्याला संस्कारित करणे अवघडच काम आहे. लहान असताना हाती पुस्तकं मिळण्याऐवजी जर फक्त कष्ट मिळाले तर तो इतरांनाही कष्टाचंच जीवन देईल. त्याच्या संपर्कात येणारे लोकही मग त्याच्या असण्याने खुश असणार नाहीत.

त्याची पुढची पिढी, त्याची मुलेबाळे तरी शिक्षणाची वाट धरतील का? हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. याचा सारासार विचार आता प्रत्येक देश करू लागला आहे. बालमजूर कायदा निर्माण करून लहान मुलांना कष्टाचे काम लागणार नाही आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च ही केला जाईल अशी तरतूद सरकार करत असते. प्रत्येक सरकारी धोरणात हा मुद्दा मांडलेला असतो.

भारतभूमी ही अध्यात्मिक आणि वैश्विक सत्य जाणणारी भूमी आहे. संपूर्ण विश्वाला प्रेरित करेल अशी संस्कृती भारताला लाभली आहे. त्याचा विपर्यास आपण भविष्यात करता कामा नये. त्यासाठी लहान मुले अत्याचार आणि बाल मजुरी यापासून मुक्त झाली पाहिजेत. आज बालमजूर कमी पाहायला मिळतात पण त्यांचे प्रमाण काही ठिकाणी आहेच तेही समूळ नष्ट झाले पाहिजे. हॉटेल्स, बांधकाम संस्था, खाजगी कारखाने व सार्वजनिक उद्योगधंदे अशा ठिकाणी बालमजूर पाहायला मिळतात. तसे आढळल्यास सरकारला ते निदर्शनास आणून द्या आणि एक सुजाण नागरिक बना.

तुम्हाला बालमजुरी मराठी निबंध ( Child Labor Essay In Marathi ) कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!

Leave a Comment