विज्ञान शाप की वरदान । Vidnyan Shap Ki Vardan Essay in Marathi |

विज्ञान आपल्या जीवनात अनेक बदल घेऊन आलेले आहे. मागील शतकात झालेल्या प्रचंड अभ्यासाने भौतिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. अशावेळी विज्ञानाने झालेले फायदे आणि नुकसान ओळखून आपले पुढचे पाऊल कसे असले पाहिजे, याची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात झाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे.

निबंध लेखन प्रकारात विद्यार्थ्याच्या बुद्धीची वैचारिक आणि काल्पनिक कुवत ओळखली जाते. विज्ञान शाप की वरदान हा विषय म्हणजे त्यांच्या वैचारिक क्षमतेचे परिपूर्ण आकलन करून देणारे असते. विज्ञानाचे फायदे आणि नुकसान अशा दोन्ही बाजू या निबंधात लिहायच्या असतात.

Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh | विज्ञान शाप की वरदान – मराठी निबंध!

आपले रोजचे जीवन तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांनी व्यापून गेले आहे. त्याचा फायदा प्रत्येक जण करून घेत असतो. तुम्ही कुठल्याही पिढीतले असा, विज्ञानाचा उपयोग प्रत्येकाच्या आयुष्यात होतोच. मानवी जीवनातील इच्छा, सुखसुविधा सर्व काही विज्ञानाने पूर्ण केलेल्या आहेत.

विज्ञानाची आस धरून ठेवणे प्रत्येकाला जमत नसते. विज्ञानवादी आणि विज्ञानविरोधी असे दोन पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. जे विज्ञानाचे तोटे सहन करतायेत किंवा त्यांची जाणीव तरी ठेवतायेत त्यांना विज्ञान एक शाप वाटत आहे, याउलट ज्यांना असे वाटते की मानवी आयुष्य फक्त विज्ञानामुळे पूर्णपणे सुविधापूर्ण झालेले आहे त्यांना विज्ञान एक वरदान वाटत आहे.

विज्ञान तुमच्या भौतिक गरजांना खूप सोयीस्कर बनवून ठेवते. आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, संगणक यामुळे पूर्ण जग एकत्र जोडले गेले आहे. कुठलाही मुद्दा आज विश्वस्तरावर मांडला जाऊ शकतो. मानवी आणि नैसर्गिक समस्येची जाणीव संपूर्ण मानवजातीला करवून दिली जाऊ शकते, एवढी ताकत आज विज्ञानात आहे.

जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, तिथल्या सांस्कृतिक आणि भौगोलिक रचनेनुसार विज्ञान उपयोगात आणले जात आहे. आपण भारतात जर बघितले तर शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने येथे हरितक्रांती झाल्यापासून शेतकरी किती समृध्द बनत चालला आहे तसेच पर्यटनक्षेत्रही विकसित होत चालले आहे.

दळणवळण आणि प्रवासाची साधने वाढली आहेत. एका दिवसाच्या वेळेत तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकता, कुठलीही वस्तू पाठवू शकता. तिथल्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. विज्ञानाची प्रगती म्हणून आज आपण चंद्रावर आणि मंगळ ग्रहावर जाऊन आलेलो आहे, हा विज्ञानाचाच फायदा म्हणता येईल.

मागील साठ वर्षाच्या काळात जे जे रोग, आजार आले त्यावर विज्ञानाने सहज मात केली आहे. रोगनिदान करण्यासाठी शरीर आणि औषधाच्या चाचण्या सहजशक्य झाल्या. शस्त्रक्रिया करून शरीर लगेच बरे करण्यात येऊ लागले. याव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र देखील विज्ञानापासून दूर नाही.

आज आपण डिजिटल शिक्षण घेऊ लागलो आहोत. क्रीडाक्षेत्र जगभरात प्रसारित होऊ लागले. नवनवीन खेळ आणि खेळाडू विकसित होऊ लागले, हीदेखील विज्ञानाची कृपा म्हणावी लागेल. परंतु होणारे नुकसानही विचारात घेतले पाहिजे. नाहीतर चालत असलेली दिशा मानवी जीवनासाठी नुकसानकारक देखील ठरू शकते.

विज्ञान हा शाप कसा काय? विज्ञानाचा वापर नियंत्रित आणि नियोजित नसल्याने माणसाचे मानसिक संतुलन बिघडत आहे. आत्ता जेवढे शारीरिक आणि मानसिक आजार आहेत तेवढे कुठल्याच पिढीत नव्हते. सर्व सुविधा आल्याने शारीरिक कष्टाची कामे कमी झाली त्यामुळे शरीर आणि मन कमजोर होत चाललेले आहे. तसेच गाडी आणि तंत्रज्ञान वापरामुळे नैसर्गिक प्रदूषण कितीतरी प्रकारे वाढत चालले आहे.

रासायनिक खतांची निर्मिती काही प्रमाणात ठीक आहे परंतु आज सर्रास त्याचा वापर जमिनीची पोत आणि कस कमी करत आहे. जे आपण खातोय ते रसायन आहे आणि तेच विषदेखील साध्य होत आहे. हा एकप्रकारे शापच म्हणावा लागेल. निसर्ग सर्व मानवी गरजा पूर्ण करू शकतो परंतु मानवी हव्यास एवढा वाढला की प्रगती आणि विकासाच्या नावाखाली निसर्गावरच आक्रमण सुरू झालेले आहे.

आजची विध्वंसक अणुशक्ती सर्व देश बाळगून आहेत. विविध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांचा वापर युद्धात करणे हे विज्ञानाचे देयक आहे. आपापसात युद्ध करून माणूसच मारला जातो. त्यामुळे होणारे युद्ध हे निसर्गाचे आणि पर्यायाने माणसाचे नुकसान करत असते. अशी नुकसानकारक युद्धे फक्त विज्ञान प्रगतीमुळे शक्य झालेली आहेत.

शाप की वरदान किंवा फायदा की नुकसान अशा दोन्ही बाजू बरोबर आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे म्हणजे संभाव्य नुकसानाला आमंत्रण देण्यासारखे असते. तसेच विज्ञानाबाबतीतही झालेले आहे. खूप कष्टाने आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेली संस्कृती आणि परंपरा लोप पावत चाललेली आहे. विज्ञानाचा सुयोग्य वापर मानवी विकासात लाभदायक ठरला पाहिजे तेव्हाच विज्ञानाला वरदान म्हणता येईल.

4 thoughts on “विज्ञान शाप की वरदान । Vidnyan Shap Ki Vardan Essay in Marathi |”

Leave a Comment