प्रस्तुत लेख हा सरदार वल्लभ भाई पटेल (Sardar Vallabh Bhai Patel Essay In Marathi) यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध आहे. त्यांचे जीवनकार्य व जीवनातील महत्त्वाच्या घटना यांचे थोडक्यात वर्णन या निबंधात करायचे असते.
कोणत्याही व्यक्तीविषयी निबंध लिहत असताना अतिशयोक्ती आणि काल्पनिक विस्तार टाळावा. घडलेल्या घटनांचे वास्तविक चित्रण करावे. निबंधात अत्यंत मुद्देसूद वाक्यरचना असावी.
सरदार वल्लभभाई पटेल – मराठी निबंध | Sardar Vallabh Bhai Patel Marathi Nibandh |
भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल यांना सर्वजण भारताचे लोहपुरुष म्हणून देखील ओळखतात. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
वल्लभ भाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण खूप उशिरा सुरू झाले. तरुण होईपर्यंत ते आपल्या घरीच वडिलांना शेती कामात मदत करत असत. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते.
अगम्य कर्तुत्वाने आपला ठसा उमटविणारे वल्लभभाई हे पेशाने वकील होते. वकिली करत असताना त्यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांचा खूप मोठा प्रभाव पडला. त्यांनी गुजरातमधील खेड्यातील लोकांना संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रह केला, तेव्हा ते पूर्ण राज्यात प्रसिध्द झाले.
सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अग्रगण्य नेते होते. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची पक्षनिष्ठा आणि समाजसेवा अत्यंत प्रभावशाली होती. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होऊ शकले.
गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या निर्वासितांना मोठे सहकार्य केले. फाळणीचे दुष्परिणाम जाणून फाळणीनंतर शांती प्रस्थापित करण्याचे कार्य केले.
भारतातील पाचशेहून अधिक अर्धस्वायत्त संस्थानांचे एकसंध भारत देशात विलीनीकरण करून घेतले. यावेळी वल्लभभाई यांनी शांतता आणि गरज पडल्यास आक्रमकता दाखवली. अशा त्यांच्या कणखर स्वभावामुळे त्यांना लोहपुरुष म्हटले जाऊ लागले.
वल्लभभाई हे मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्कांना दुजोरा देणारे व्यक्तिमत्त्व होते. भारतीय लोकांची एकता आणि निष्ठा यासाठी ते आजीवन आग्रही होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीत मोलाचे सहकार्य केले.
सरदार वल्लभ भाई पटेल हे भारताचे सक्षम नेतृत्व होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यात भारताच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी भरपूर प्रयत्न केले. अशा या महान लोहपुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल हा मराठी निबंध (Sardar Vallabh Bhai Patel Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…