राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी निबंध | Tukdoji Maharaj Marathi Nibandh |

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनाबद्दल माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा निबंध (Tukdoji Maharaj Marathi Nibandh) लिहावा लागतो. त्यांच्या जीवनकार्याबद्दल संक्षिप्त माहिती या निबंधात लिहायची असते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | Tukdoji Maharaj Essay In Marathi

तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. सर्वजण त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखत असत. भजन आणि कीर्तनाद्वारे त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. आपल्या लिखाणातून अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन आणि आत्मिक विकास ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली, जि. अमरावती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळाबाई होते. त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे केले.

संपूर्ण देशभर फिरून त्यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. बहुतांश भारत देश हा खेड्यात वसलेला आहे त्यामुळे राष्ट्राचा विकास करावयाचा असेल तर ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, जुन्या रुढी परंपरेपासून मुक्त झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खेड्यातील जीवन मानवी मुल्यांनी संस्कारित झाल्यास ते स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकेल, ही समजच त्यांच्या कार्याची केंद्रबिंदू होती. त्यासाठी भोळेपणा, अंधश्रद्धा, जातीभेद हे समाज मनातून नष्ट झाले पाहिजेत असे त्यांना मनोमन वाटत असे.

सर्वधर्मसमभाव, महिलांचे सशक्तीकरण, तरुणांची बलोपासना, आणि अध्यात्मिक विकास हे समाज सुदृढ करणारे त्यांचे मापदंड होते. गुरुकुंज आश्रमाद्वारे त्यांनी अनेक लोकहिताची कामे केली. एकनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते घडवले.

देशातील तरुण आणि महिला हे देशोन्नतीला कसे काय सहाय्यक ठरू शकतील याचे प्रबोधन वारंवार ते आपल्या कीर्तनातून करत असत. कुटुंबव्यवस्था व समाजव्यवस्था जर सुधारली तर खऱ्या अर्थाने भारत देश गुलामगिरीतून बाहेर येऊ शकेल, अशी त्यांची मान्यता होती.

खंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी प्रथमच त्यांना “राष्ट्रसंत” म्हणून संबोधले होते. ग्रामगीता हा त्यांचा ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे. ग्रामविकासाचे प्रबोधन त्यांनी या ग्रंथात केलेले आहे. तुकडोजी महाराजांनी आपले वैविध्यपूर्ण लिखाण मराठी आणि हिंदी भाषेत केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते. तुकडोजी महाराजांचे निर्वाण ३१ ऑक्टोबर १९६८ रोजी मोझरी, अमरावती येथे झाले. अशा या महापुरुषाच्या जीवनकार्यास त्रिवार अभिवादन!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी निबंध (Tukdoji Maharaj Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment