शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Haravle Tar Marathi Nibandh |

आपण बोलतो तेव्हाच आपल्या भावना आणि बोलण्याचा अर्थ इतरांना कळतो. बोलण्यासाठी भाषा उपयुक्त ठरते आणि त्या भाषेसाठी शब्द! हे शब्दच नाहीसे झाले तर.. अशा कल्पनेचे वर्णन शब्द हरवले तर (Shabd Haravle Tar Marathi Nibandh) या निबंधात करायचे असते.

शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Haravle Tar Essay In Marathi |

घरचे सगळे गावी गेले होते. मी आणि आजी फक्त घरी होतो. त्यामुळे कामाव्यतिरिक्त बोलण्याचा काही संबंध आलाच नाही. मग मी चित्र काढत बसलो. ते चित्र काढताना मी एवढा मग्न झालो की माझ्या मनातले विचारसुद्धा थांबले होते. अशा विस्मयकारक अनुभवाने मी भारावून गेलो आणि त्यानंतर विचार करू लागलो की शब्द हरवले तर…

शब्द आणि भाषा यांचा खूप जवळचा संबंध आहे. शब्दांची विशिष्ट पद्धतीत मांडणी आणि त्यांना दिलेला आवाज यामुळे आपण बोलू शकतो. आपल्या भावना आणि कृती दुसऱ्याला समजवू शकतो. परंतु शब्द नसतील तर असे काहीही होणार नाही.

शब्द नसल्याने जीवनातील अनेक त्रासदायक अनुभव नाहीसे होतील. चिंता, काळजी आणि व्यर्थ भीती वाटणारच नाही. सर्वजण स्वतः मध्ये मग्न होऊन जातील. परंतु त्याच स्थितीला एक दुसरी छटा देखील आहे.

माणूस म्हणून जगताना खूप साऱ्या गोष्टीत साहचर्य आवश्यक असते. त्यासाठी बोलणे आवश्यकच आहे. शब्द आणि भाषा नसतील तर ते साहचर्य टिकून राहणार नाही. मानवात भावना असल्याने एकमेकांना मदत करणे आणि सोबत राहणे शक्य आहे. त्या भावनांचा संपूर्णपणे डोलारा शब्दांवर टिकून आहे.

शब्द नसतील तर समाजात शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्था टिकणार नाही. माणूस एकत्र येऊन उत्सव, सण, आनंद साजरा करू शकणार नाही. त्यामुळे मैत्री, नाती वाढणे तर अशक्यच होऊन जाईल. म्हणजेच जगण्याचा नीट अर्थच कळणार नाही.

शब्द आणि भाषा नसेल तर आपण वाईट आणि चांगले यातील फरक करू शकत नाही. मानवी विकास खुंटला जाईल. जी समज आपल्याला लहानपणापासून येत असते ती समज येणारच नाही. पर्यायाने हिंसा वाढेल आणि समाज तर निर्माणच होणार नाही.

मनुष्य हा देखील एक मुक प्राणी होऊन जाईल. एकटा एकटा राहू लागेल. जगण्यातील सर्व व्यवस्थाच नाहीशी होईल. माणसाची जगण्याची गती आणि कर्तृत्व कमी होईल. यासाठी आपल्याला समजून घेतले पाहिजे की शब्द आणि त्यांचा आपण वापर करत आहोत तो जगण्यासाठी किती आवश्यक आणि मोलाचा ठरतो.

माणसाला मन आहे, भावना आहेत आणि तो त्या भावना व्यक्त करू शकतो म्हणून इतर प्राण्यांपेक्षा त्याचे वेगळेपण आणि जगण्यातील विविधता दिसून येते. प्रेम, स्नेह, मैत्री, अहंकार, ईर्ष्या असे गुण आणि दुर्गुण एकत्रितपणे माणसात असतात.

दुर्गुणांना समजून घेऊन सुगुण वाढवत जाणे ही शक्यता मानवी आयुष्यात आहे. परंतु ती शक्यता शब्द नसतील तर समजणार नाही आणि माणूस एकमेकांना कळणारच नाही. फक्त खाणे आणि झोपणे एवढेच काम त्याच्या आयुष्यात राहील. आदिमानवासारखी स्थिती निर्माण होईल.

विज्ञान, तंत्रज्ञान, आणि मानवी मुल्यांचा विकासच शब्दांवर अवलंबून आहे. त्यामुळे सहजच अशी कल्पना करणे की शब्द हरवले तर, हे योग्य ठरणार नाही. तर बोलण्यातील कच्चे दुवे लक्षात घेऊन मानवी प्रगती साधणे एवढेच आपल्या हातात आहे.

शब्द आणि भाषा असलीच पाहिजे! त्यामुळेच एका पिढीतील संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीत संक्रमित होत असते. भाषेमुळेच आपले कुतूहल वाढत जाते. नवनवीन शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. शब्द हरवले तर… अशी फक्त कल्पनाच छान वाटते. वास्तवात असे काहीही घडू नये.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला शब्द हरवले तर हा मराठी निबंध (Shabd Haravle Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment