संत गाडगेबाबा – मराठी निबंध | Sant Gadage Baba Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा संत गाडगेबाबा (Sant Gadage Baba Marathi Nibandh) यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध आहे. संत गाडगेबाबा यांचे जीवन कार्य, त्यांनी आयुष्यभर मानवतेची केलेली सेवा, त्यांची स्वच्छतेची सवय अशा सर्व गोष्टींचे वर्णन या निबंधात केलेले आहे.

संत गाडगेबाबा – निबंध | Sant Gadage Baba Essay In Marathi |

महाराष्ट्राला संत, महात्मे आणि थोर पुरुषांची अखंड परंपरा लाभलेली आहे. संत गाडगेबाबा हे देखील त्याच परंपरेतील एक आधुनिक विचारशैलीचे समाजसुधारक व संत होते. संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेणगाव, जि. अमरावती येथे एका परीट (धोबी) कुटुंबात झाला.

संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव डेबूजी जाणोरकार होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखूबाई असे होते. त्यांचे लग्न कुंताबाई यांच्याशी झाले होते परंतु अध्यात्म आणि समाजसेवेची ओढ असल्याने त्यांनी आपले जीवन लोकोपयोगी कार्य करण्यात व्यतित केले.

गाडगेबाबा यांचा पेहराव फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा होता. अशा पद्धतीच्या राहणीमानामुळे त्यांना सर्वजण गाडगेबाबा म्हणू लागले. समाजातील अनैतिक चालीरीती, रुढी परंपरा यांना त्यांचा विरोध होता. लोकांचे अज्ञान आणि अंधश्रद्धा पाहून त्यांनी समाजसेवा आणि लोकशिक्षण देण्याचे ठरवले.

गाडगेबाबा यांची शिकवण ही कर्मकांड व अंधश्रद्धा वाढवणारी नव्हती तर समाज जीवनाच्या विकासावर आधारित होती. त्यांना भजन – कीर्तनाची देखील आवड होती त्यामुळे त्यांनी उपदेशासाठी कीर्तनाचा मार्ग निवडला. गाडगेबाबा हे अशिक्षित होते पण त्यांच्या भाषेत मात्र गोडवा जाणवत असे.

गाडगेबाबा यांचा उपदेश लोकजागृती घडवून आणत असे. अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे आपण धर्माचे देखील नुकसान करत आहोत याची जाण त्यांना होती. त्यांच्या कीर्तनात आणि उपदेशात नेहमी स्वच्छ आणि सुदृढ समाजाची संकल्पना असे.

मानवी जीवनातील एकदम साध्या व सरळमार्गी नीतीमुल्यांवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे स्वच्छता राखणे, चोरी न करणे, पशुबळी न देणे, व्यसन न करणे, अशा उपदेशांचा समावेश त्यांच्या बोलण्यात असे. उपदेश सुरू करण्यापूर्वी ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणाची स्वच्छता करण्याचे काम सर्वप्रथम ते करत असत.

गाडगेबाबांनी भौतिक सुख आणि संपत्तीचा मोह कधीच बाळगला नाही. त्यांना जर कुणी जास्तीचे दान दिले तर ते गोर गरीबांमध्ये वाटून टाकत असत. त्यांच्या अंगी भूतदया देखील होती. मानवाच्या स्वार्थासाठी, समाजाच्या अनैतिक रुढी परंपरेसाठी कोणाचाही बळी जाता कामा नये असे त्यांचे मत होते.

जातीभेद व अनिष्ट धार्मिक उहापोह या बाबींविरोधात ते नेहमी बोलत असत. महाराष्ट्रातील पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, आळंदी ई. धार्मिक स्थळी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर स्थापन केले. समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांना देणग्या देऊ केल्या.

गाडगेबाबा यांच्या जीवनात लोकोपयोगी उपदेश आणि समाजकार्य आढळते. त्यांचे कार्य हे त्यावेळी लोकांना हितावह ठरेल असेच होते. त्यांच्या अशा समाजोपयोगी आणि धार्मिक वृत्तीमुळे त्यांना संत म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. अशा या थोर आणि आधुनिक संताचे २० डिंसेंबर १९५६ साली निधन झाले.

तुम्हाला संत गाडगेबाबा हा मराठी निबंध (Sant Gadage Baba Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment