शेतकऱ्याची आत्मकथा – निबंध क्र. 2 | Shetkaryachi Atmakatha Nibandh |

प्रस्तुत लेख हा शेतकऱ्याची आत्मकथा (Shetkaryachi Atmakatha Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात शेतकऱ्याचे जीवन व्यक्त करण्यात आलेले आहे. त्याच्या जीवनातील आनंद, कष्ट, दुःख, अडचणी अशा सर्व बाबींची चर्चा या निबंधात करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्याचे मनोगत – निबंध क्र. 2 | Shetkaryache Manogat Essay In Marathi |

भारतीय संस्कृती आणि परंपरा बहुतांशी शेतीवर टिकून आहे. आजही भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योग हे शेतीवर आधारित असेच आहेत. अशी सद्यस्थिती असतानाही शेतकरी मात्र कष्टप्रद आयुष्य का जगतो याचे कारण व्यक्त करण्यासाठी मी माझी आत्मकथा सांगणार आहे. मी एक शेतकरी आहे. माझे नाव सुकेश तात्याबा जाधव असे आहे. 

आमच्या कुटुंबात पिढीजात जमीन कसत असल्याने सर्वजण शेतीशी निगडित कामेच करतात. माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेले आहे. मी वाचन आणि लिखाण उत्तमरित्या करू शकतो. मला शेतीची तशी खूपच आवड आहे परंतु शिक्षण पूर्ण झाले नसल्याची खंत मात्र सतत जाणवते.

शेती हीच आमच्या संपूर्ण कुटुंबाची संपत्ती आहे. विभागून आलेली एकूण तीन एकर जमीन आम्हाला आहे. आम्ही कुटुंबात मिळून एकूण सात लोक आहोत. आमची उपजीविका शेतीवरच आधारित आहे. त्याव्यतिरिक्त दोन बैल आणि शेळ्या – म्हैशी सुद्धा आमच्याकडे आहेत.

शेतीत नियमित कष्ट असल्याने आम्हाला कधी कोणत्या आजाराची माहितीच नाही. एकदा शरीरातून घाम गेला आणि दोन वेळचे पोटभरून जेवण मिळाले की बस्स! आम्ही सगळे आनंदाने काम करण्यास पुन्हा एकदा तयार असतो. वर्ष – दोन वर्ष पुरेल एवढे धान्य आम्ही जमिनीतून एका हंगामात पिकवतो. धान्य उरत असेल तर त्याची विक्री करतो.

शेतीत जर निसर्गाची आणि पाऊसाची साथ मिळाली नाही तर मात्र आमच्यावर अवकृपाच होत असते. आमचा भूभाग हा ओसाड स्वरूपाचा असल्याने सर्व शेती पाऊसावर अवलंबून असते. मी लहान असताना एकदा सर्वांनी दुष्काळाचा सामना केला होता. त्यावेळी दोन वर्ष आम्ही अपार कष्ट भोगले होते.

निसर्गाची कृपा बिघडण्यामध्ये मानवी कृत्येच कारणीभूत आहेत. लोकसंख्या वाढ, वृक्षतोड, प्रदूषण आणि त्यामुळे होणारी तापमानवाढ यामुळे निसर्ग अगदीच रुसतो कधीकधी! त्यातच पाऊसाची एका हंगामात साथ न मिळणे म्हणजे आमच्या जीवाची नुसती धाकधूक होत असते.

रासायनिक शेतीचा प्रकारच मला आवडत नाही. आमची जमीन आज देखील कसदार स्वरूपाची आहे कारण आम्ही शेतीसाठी नैसर्गिकरित्या तयार झालेले शेणखत वापरतो. रासायनिक खते आणि औषध फवारणी केल्यास हळूहळू जमिनीचा पोत बिघडत जातो असा मला अनुभव आहे.

सध्या शेतकरी आत्महत्या करत असल्याचे चित्र खूपच भयानक आहे. शेती व्यतिरिक्त कमाईचा कोणताच आधार नसल्याने काही शेतकरी बांधवांना शेतीचे नुकसान सहन होत नाही. तसेच त्यांनी शेतीतील फायदा पाहून लोभापायी कर्ज काढून शेती केलेली असल्याने त्यांना ते कर्ज उतरवणे शक्य होत नाही मग ते आत्महत्येचा पर्याय निवडतात.

शेतकरी हे नियमित शेतात असल्याने त्यांचे जीवन हे इथल्या मातीशी निगडित आहे. ते अत्यंत भाबडे असतात. व्यापार त्यांना तितकासा समजत नाही. त्याचाच लाभ व्यापारी आणि राजकारणी मंडळी घेत असतात. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरलेले मी अनेकदा पाहिलेले आहे.

माझी आत्मकथा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की पाश्चिमात्य जीवनशैली अंगिकारून आधुनिक झालेले लोक हे शेतकरी लोकांना तुच्छ आणि अडाणी लेखतात याचे कधीकधी वाईट वाटते. भारतात एकूण सत्तर टक्के लोकांचा शेती हा व्यवसाय असताना देखील काही मूठभर लोक त्यांची निंदा करतात हेच या देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

आजही देशाच्या आर्थिक विकासात शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. शेतजमिनींमुळेच आपण एवढी वर्षे गुण्यागोविंदाने भारतीय संस्कृती आणि परंपरा जपत आलेलो आहोत. आपले सर्व सण – समारंभ हे देखील शेतीशी निगडित असेच आहेत. अशा एक ना अनेक कारणांनी मला शेतकरी म्हणवून घेण्यात एक विशिष्ट प्रकारचा अभिमान वाटत असतो.

तुम्हाला शेतकऱ्याची आत्मकथा हा मराठी निबंध (Shetkaryachi Atmakatha Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment