संत बाळूमामा – मराठी निबंध | Sant Balumama Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा संत बाळूमामा (Sant Balumama Nibandh Marathi) यांच्या जीवनावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात संत बाळूमामा यांच्या कर्तुत्वाविषयी आणि अध्यात्मिक जीवनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

संत बाळूमामा मराठी निबंध | Sant Balumama Essay In Marathi |

पूर्ण बाह्यांचा शर्ट, स्वच्छ धोतर, डोक्यावर फेटा, हातात धनगरी काठी व पायी चामडी चप्पल असा पेहराव असलेले सामन्यातील असामान्य असे संत बाळूमामा हे धनगर समाजातील एक संचारी संत होते. धनगर समाजातील जन्म असला तरी सर्व जाती – धर्मांतील लोक त्यांना पूज्य मानत असत.

सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे बाळूमामांचे जन्मगाव आहे. त्यांचा जन्म आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ म्हणजे ३ ऑक्टोबर १८९२ रोजी झाला. बाळूमामांच्या वडिलांचे नाव मायप्पा आरभावे तर आईचे नाव सत्यवा असे होते. 

बाळूमामा हे लहानपणापासूनच अध्यात्मिक स्वभावाचे होते. त्यांचा स्वभाव घरच्या लोकांना विचित्र वाटत असे. त्यांच्या वागण्यात बदल व्हावा म्हणून अक्कोळ इथल्या चंदुलाल शेठजी या व्यापाऱ्याकडे त्यांना चाकरीसाठी ठेवण्यात आले.

शेठजींच्या घरच्या बकऱ्या रानात चरवून घरी घेऊन येणे असे काम बाळूवर सोपवण्यात आले. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत असताना त्यांचा एकांतवास मात्र आई वडिलांना चिंता देऊन जात होता. त्याचाच विचार करून त्यांनी बाळूमामांचे लग्न लावून दिले.

संसारात बाळूमामांचे मन रमत नव्हते. काही काळानंतर मुळे महाराजांनी दर्शन दिल्याने बाळूमामांच्या जीवनाला एक नवीन दिशाच प्राप्त झाली. त्यांनी बकऱ्या चरवत अनेक गावी प्रवास केला. अनेक तीर्थक्षेत्रे व मंदिरांना भेटी दिल्या. या काळात बाळूमामांच्या उपदेशातून कळत – नकळत लोकांचे भले होत होते.

बाळूमामांची वाणी ही परखड आणि सत्यवचनी असल्याने लोकांना त्यांच्याशी संवाद साधणे आवडत असे. लोकांच्या समस्या या बाळूमामांच्या सानिध्यात दूर होत होत्या. त्यांचे अस्तित्व हे लोकांना पवित्र भासत असे. त्यामुळे लोक बाळूमामांना देव स्वरूप मानू लागले होते.

बाळूमामा हे बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक गावांत फिरले. बाळूमामा यांची वाणी व सहवास या बाबी प्रसन्नता निर्माण करणाऱ्या असल्याने त्यांच्या भोवती लोक जमू लागले. काही लोकांनी त्यांच्यासोबतच फिरत राहण्याचा निर्णय घेतला.

कानडी व मराठी ग्रामीण भाषेत त्यांनी धर्माचरण व नैतिक उपदेश दिल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. बकऱ्यांचा कळप घेऊनच ते वास्तव्यास थांबत असल्याने सायंकाळच्या वेळी ते लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करत असत. गरीब – श्रीमंत तसेच जात – पात न पाहता बाळू लोकांच्या समस्या सोडवत असत.

जनमानसांत भक्ती जागृत व्हावी व गोरगरिबांना अन्नदान होण्याच्या उद्देशाने त्यांनी सुरू केलेला ‘भंडारा उत्सव’ खूपच प्रसिध्द आहे. माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची अत्यंत महत्त्वाची शिकवण होती. आपल्या शिकवणीतून व लीलेतून त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला.

बकऱ्या चरवणे, लोकोपदेश तसेच नैतिक आचरण असे आपले कर्मक्षेत्र ठरवलेल्या बाळूमामांनी आदमापुर येथे ४ सप्टेंबर १९६६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी समाधी घेतली. आजचे आदमापुर हे बाळूमामांच्या भक्तांसाठी जणू दुसरे पंढरपूरच झालेले आहे.

तुम्हाला संत बाळूमामा हा मराठी निबंध (Sant Balumama Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment