मी पतंग बोलतोय – मराठी निबंध | Mi Patang Boltoy Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा मी पतंग बोलतोय (Mi Patang Boltoy Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी पतंग उडवण्याची मज्जा घेतलेलीच असते.

पतंग जरी एक वस्तू असला तरी तो बोलू लागला आणि त्याने आपले मनोगत व्यक्त केले तर, ही कल्पनाच किती मजेशीर वाटते. अशा कल्पनेचे विश्लेषण आपल्याला या निबंधात करायचे आहे. चला तर मग पाहुयात पतंग आपल्याशी काय बोलू पाहत आहे ते!

मी पतंग बोलतोय निबंध मराठी | पतंगाचे मनोगत निबंध | Essay on Kite In Marathi |

मी पतंग बोलतोय! अनेक दिवसांपासून मला माझं मन मोकळं करायचं होतं परंतु ती संधी आज मिळालेली आहे. पतंग उडवण्याची स्पर्धा संपलेली असल्याने मला आता घरी आणले गेले. रोहनने दिवसभर मला आकाशात उडवले होते. माझ्या अंगाला दोरी बांधून मला उंचच उंच भरारी देत आकाशात विहारत ठेवले होते.

आजची स्पर्धा जिंकल्याने रोहन माझ्यावर अगदी खुश होता. मला त्याने व्यवस्थित घरी आणले आणि लटकवून ठेवले. माझे काम संपल्याने उद्यापासून कदाचित माझ्याकडे कोणीही पाहणार नाही. परंतु पुन्हा एकदा शाळेला सुट्ट्या लागल्यावर माझी आठवण येईल एवढे मात्र नक्की!

प्रत्येक वर्षी माझी निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते. अनेक ठिकाणी विशिष्ट काळात पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित केली जात असल्याने त्यावेळी माझी मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अनेक पतंग बनवणाऱ्या लघुउद्योगी कंपन्या माझी निर्मिती करण्यात व्यस्त असतात.

माझा आकार हा चौकोनी असतो. माझे एक टोक वर करून माझ्या अंगावर बांबूच्या बारीक काड्या जोडल्या जातात. त्या काड्यांचा आधार घेऊन दोरीचा मांझा तयार केला जातो. त्या मांझ्याला पुन्हा एक नवीन दोरीचा गुंडा जोडून आकाशात वर उडवले जाते. वाऱ्याची दिशा व प्रवाह पाहून मला उडवण्याचा प्रयत्न केला जातो.

काही कलाकार मुले प्लास्टिक अथवा कागदाचा वापर करून माझी निर्मिती घरच्या घरी करतात. मला भली मोठी शेपटी देखील जोडतात. ज्यांना पतंग उडवण्याची कला ज्ञात नसते ते मला घेऊन रस्त्यावरून फक्त धावत सुटतात.

बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळ्या रंगांचे पतंग हे सर्वांनाच आकर्षक वाटतात. असे विविधरंगी पतंग विक्रीसाठी आले रे आले की खरेदीसाठी नुसती गर्दीच गर्दी असते. खरेदी झाल्यावर लहान मुलांना कधी एकदा पतंग उडवतो अशी घाई झालेली असते.

माझी प्रतिकृती ही खेळण्यातील सामानांत आढळते. माझी चित्रे ही मुलांच्या पुस्तकात देखील असतात. माझ्यावर अनेक कलाप्रेमी कविता रचतात, माझी चित्रे काढतात, माझ्यावर गाणी तयार करतात. मला अनेकवेळा चित्रपटांतून देखील दाखवले गेले आहे.

कधीकधी उडत असताना वाऱ्यामुळे मला हेलकावे देखील खावे लागतात. अशावेळी मी एखाद्या काटेरी झाडीत अडकलो की माझ्या शरीराचा कागद फाटतो. तसेच काही मुलांना पतंग उडवता आला नाही की ते मला फाडून – तोडून टाकतात. अशा प्रसंगी मला खूप दुःख होते.

पतंग ही लहान मुलांच्या खेळण्याची म्हणजेच आकाशात उडवण्याची वस्तू असली तरी काही मुलांच्या भावनेचा देखील विषय असतो. कित्येक मुलांनी मला उडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले असतात. पतंग उडवल्यानंतर दोरा गुंडाळणे, पतंग उडवण्यासाठी गच्ची किंवा मोकळे मैदान शोधणे अशी कितीतरी इतर कामे देखील मुलांना करावी लागतात.

पिढ्यान् पिढ्या मी सर्व मानव जातीला आनंद देत आलेलो आहे. तरुण मुले – मुली देखील पतंग उडविण्यात विशेष सहभागी होताना दिसून येतात. शाळेला सुट्टी असल्यावर आणि विशेषतः मकर संक्रांती सणाला माझी खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला अगदी समाधानी वाटते.

तुम्हाला मी पतंग बोलतोय हा मराठी निबंध (Mi Patang Boltoy Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment