लोककल्याणकारी राजा, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज हा निबंध (Rajarshi Shahu Maharaj Marathi Nibandh) लिहावा लागतो. त्यांचे संपूर्ण जीवन संक्षिप्त रुपात आणि मुद्देसूद पद्धतीने या निबंधात मांडायचे असते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज निबंध | Rajarshi Shahu Maharaj Essay In Marathi |
छत्रपती, राजर्षी या उपाधीने नावाजले गेलेले शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले. त्याचे “शाहू” असे नामकरण करण्यात आले. शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे आणि न्यायप्रिय होते.
इ. स. १८८९ ते १८९३ या काळात शाहू महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १ एप्रिल १८९१ साली ते लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहबद्ध झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८९४ साली त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. संस्थानातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिले. स्त्री शिक्षणासाठी देखील ते नेहमी आग्रही होते. जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवणे बंद केले.
१८९६ साली पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर आलेली प्लेगची साथ, तशा संकटसमयी शाहू महाराजांनी दुष्काळी कामे, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले.
शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, राधानगरी धरणाची उभारणी, अशा समाजोपयोगी कामातून शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले. अशा सर्व कामांतून त्यांचा कृषी विकासातील दृष्टिकोन दिसून येतो.
शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. त्यांनी आपल्या जीवनकार्यात समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून घेतले. आपल्या अधिकारांचा फायदा बहुजन समाजाला मिळवून दिला. त्यांच्या न्यायासाठी आणि शिक्षणासाठी ते नेहमी झटले.
त्यांच्या सर्वाभिमुख विकासाच्या दृष्टिकोनामुळे इतिहासकारांनी त्यांची नोंद लोककल्याणकारी राज्यकर्ता म्हणून केली आहे. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आणि चालना दिली. अशा या राजर्षी व्यक्तिमत्त्वास मानाचे अभिवादन!
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध (Rajarshi Shahu Maharaj Marathi Nibandh) आवडला असल्यास तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…
This is so amazing 😍