माझी आई – मराठी निबंध | My Mother Essay in Marathi

प्रस्तुत लेख हा माझी आई (My Mother Essay In Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आईची रोजची दिनचर्या, तिचा कुटुंबातील सहभाग, कामे आणि सर्वांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम हे या निबंधातून व्यक्त करायचे असते.

माझी आई – निबंध क्र. १ [५०० शब्द]

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!” असे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. ते काही विनाकारण नाही. आई आपल्यासाठी दिवसभरातून पूर्णपणे कितीतरी कामे करत असते. तिचे निस्सीम प्रेम आणि समर्पण कुटुंबातल्या सर्वांप्रती असते. आईचे प्रेम हे शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. 

माझी आई कुटुंबातल्या सर्वांची खूप काळजी घेते. आमचे कुटुंब एकत्र कुटुंब आहे. कुटुंबात एकूण दहा लोक आहेत. माझ्या आईचे नाव सुमल आहे. आई आणि बाबांचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ते दुसऱ्या गावी राहत होते. माझे बाबा कामानिमित्त बाहेरगावी असायचे. मला एक मोठा भाऊ आहे. 

मला जसे आठवते तेव्हापासून मीच माझ्या आईचा लाडका आहे. मी लहान असताना मला दररोज खाऊ द्यायची. तिने खाण्यापिण्यात आमची कधीही हयगय केली नाही. बाबा रोज सकाळी कामाला जात असत. त्यामुळे तिची उठण्याची वेळ म्हणजे सकाळी ६ वाजता असते. आमची शाळा १० वाजता भरते. बाबांचा आणि आमचा डबा ती सकाळी उठल्या उठल्या बनवते. 

बाबा कामाला गेल्यानंतर ती सकाळी ७ वाजता  आम्हाला उठवते. सकाळी उठून दात घासणे, शौचाला जाणे, अंघोळ करणे अशा सवयी तिने आम्हाला लावल्या आहेत. अंघोळ झाल्यानंतर आम्ही एकत्र देवाची प्रार्थना म्हणतो. ती प्रत्येकवर्षी एक नवीन प्रार्थना आम्हाला शिकवते. ती प्रार्थना वर्षभर म्हणावी लागते. रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आत्तापर्यंत शिकवलेल्या सगळ्या प्रार्थना म्हणाव्या लागतात.

शाळेत जाताना आम्हाला ती तयार करते. पाण्याची बाटली आणि डबा भरून देते. बाहेरचे पाणी पिण्यास आम्हाला सक्त मनाई आहे. अजून मला बूट घालता येत नाही. मला बूटसुद्धा तीच घालते. आम्ही शाळेत गेल्यानंतर आजी आजोबांचे जेवण बनवणे, घराची साफसफाई ती करते. माझी काकी आणि आई दोघी मिळून मग घरातील उरलेली सर्व कामे पूर्ण करतात.

माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. तिचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. गोष्टीची आणि अध्यात्मिक पुस्तके ती वाचत असते. त्यामुळे आम्हाला देखील वाचनाची आवड निर्माण झाली. शाळेतून आल्यानंतर ती आम्हाला हातपाय धुवायला लावते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही खेळत असतो. तोपर्यंत बाबा कामावरून आलेले असतात.

७ ते ८ वाजेपर्यंत अभ्यास करणे हा घरात नियम आहे. आई आणि काकी आता एकत्र रात्रीचा स्वयंपाक करतात. आम्ही चुलत आणि सख्खे असे मिळून ४ भावंडे आहोत. आम्हाला रात्री साडे आठ वाजता एकत्र जेवण करावे लागते. जेवण झाल्यानंतर आई झोपताना रोज एक गोष्ट सांगते. गोष्टीचे तात्पर्य ऐकून आम्ही झोपून जातो. 

आई खूपच सोज्वळ स्वरूपाची आहे. तिचा साधेपणा सर्वांनाच आवडतो. साधे राहावे आणि शांत जगावे अशी तिची शिकवण नेहमी असते. शिवणकाम आणि वाचन असे तिचे छंद आहेत. बाबांसोबत ती कधीच वाद घालत नाही. टीव्हीमुळे मुले बिघडत आहेत अशी तिची समज आहे. त्यामुळे आम्हाला जास्त टीव्ही पाहू दिला जात नाही याउलट खेळ आणि वाचन मात्र भरपूर प्रमाणात करवले जाते. 

आठवड्यातून एकदा तरी आई आम्हाला बाहेर फिरायला नेते. मंदिरात, बागेत किंवा रानात फिरायला जाणे तिथे जेवण करणे असा क्रम ठरलेला असतो. सुट्टीच्या दिवसात आम्ही आईसोबत कॅरम खेळतो. उन्हाळ्याचे दिवस आम्हाला खूप आवडतात. आम्ही मामाच्या गावाला फिरायला जातो तसेच खूप मौजमजा करतो. आई वर्षातून दोनदा तरी माहेरी जात असते. 

आई सर्वकाही प्रेमातून करत असते. ती कधीकधी माझ्याकडून चुकी झाल्यावर रागावते आणि नंतर कुशीत घेऊन समजावून सांगते. तिचे समजावणे मला खूप आवडते. माझी आई खूप आनंदी आणि हसतमुख आहे. तिची प्रतिभा आणि तिचे संस्कार मला आयुष्यभर पुरतील असेच आहेत. 

तुम्हाला माझी आई हा मराठी निबंध (Majhi Aai Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “माझी आई – मराठी निबंध | My Mother Essay in Marathi”

  1. आम्ही शाळेत गेल्यानंतर आजी आजोबांचे जेवण बनवणे, घराची साफसफाई ती करते. हे वाक्य काही बरोबर वाटेना हा पण निबंध छान👌👌👌👌👌.

    Reply

Leave a Comment